Sunday, May 10, 2020

मालती गुंधाए केश प्यारे घुनगवारे -- आणि राग बसंत !

मालती गुंधाए केश प्यारे घुनगवारे -- आणि राग बसंत !
‘बाबा, नवीन चित्रपट व त्यातील गाणी तुम्ही ऐका, छान असतात !’ माझी मुलगी. सध्याच्या सक्तीच्या सुटीतील एक दिवसातील माझा व मुलीचा संवाद सुरू होता.
‘काहीतरीच काय ? नवीन चित्रपट ठीक आहे, कारण आता पूर्वीपेक्षा तंत्र सुधारले आहे. निर्मीतीला भरमसाठ पैसा खर्च केला जातोय ! हो, अलिकडे त्याचे विषय पण वेगळे असतात, बऱ्याच वेळा ! — पण त्यातील गाणी ? हे मात्र शक्य नाही, कठीण आहे जरा ! पूर्वी चित्रपट कसलाही असला, तरी फक्त त्यातील मस्त गाण्यांवर, त्यांनी तुफान धंदा केला आहे. अजून लक्षात आहे ना, ती गाणी ? आता तर, चित्रपट पाहतांना थिएटरमध्ये ऐकलेले गाणे, चित्रपट संपल्यावर थिएटरबाहेर आले, की लक्षात रहात नाही, असे आताचे संगीत !’ मी.
‘सगळं जुनंच चांगलं, हे बरोबर नाही. मी सांगते, ते ऐकाच तुम्ही !’ माझी मुलगी.
‘हा चित्रपट बघीतलाय का तुम्ही ?’ माझी मुलगी.
‘तीन-चार वर्षात सिनेमाला गेले नाही आम्ही. बघ, रस्ता ओलांडला की एक टाॅकीज, आणि पाच मिनीटे पायी चालले, की दुसरी टाॅकीज आहे. पण नाही !’ मी काही उत्तर देण्याच्या आंत, परस्पर उत्तर कोणी दिलं असेल, हे मी सांगत नाही.
‘अग, कोणता चित्रपट ? ते तर समजू दे !’ माझा प्रयत्न !
‘देवदास ! सन २००२ मधला आहे.’ माझी मुलगी.
‘सन २००२ मधला, म्हणजे नवीन ? देवदासची कथा कोणाची आहे, कल्पना आहे ? प्रसिद्ध बंगाली साहित्यिक शरदचंद्र चटोपाध्याय यांची सन १९१७ मधील ! चित्रपट व कथा दोन्ही तर जुनी आहेत. गाण्याला पण अठरा वर्षे झालीत.’ मी.
‘सिनेमा बघा ! गाणी ऐका ! मग सांगा मला.’ माझी मुलगी.
‘पहिले जेवून घ्या ! मग बघा. विनाकारण उशीर होतो मग !’ सौ. गप्पा सुरू झाल्या, की तिचे काम लांबते, हा तिचा नित्याचाच अनुभव !
मुलीने ही आठवण दिली, तर ‘शरदचंद्र चटोपाध्याय’ या साहित्यिकाचे आणि ‘देवदास’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबरीचे नांव ऐकल्यावर, मी पोहोचलो थेट सन १९७५-७६ सालात ! मी आठवी-नववीत असेन त्यावेळी ! आमच्या रावेरचे ‘राजे रघुनाथराव देशमुख वाचनालय’ खूप चांगले, त्याचा मी चौथीपासून सभासद ! तिथून रोज वेगवेगळी पुस्तके वाचायला आणायची, आणि शाळेतून घरी आल्यावर वाचायची, हा नित्यनेम ! त्या दरम्यान मी डाॅ. सुमती क्षेत्रमाडे यांची शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या जीवनावरची कादंबरी वाचायला आणली होती, ‘जीवन स्वप्न’ नांवाची ! डाॅ. सुमती क्षेत्रमाडे या वास्तविक वैद्यकीय क्षेत्राच्या डाॅक्टर ! मात्र त्यांची ग्रंथसंपदा आणि लिखाणाचा दर्जा बघीतला, तर त्या साहित्य क्षेत्रातील डाॅक्टर असाव्यात, हा समज होणे स्वाभाविक आहे. मी ही कादंबरी आणली, त्यावेळी कल्पना नव्हती, की ही चरित्रात्मक कादंबरी आहे म्हणून ! नांवावरून तसा समज होण्याचा प्रश्न नव्हता. तसेच बंगाली साहित्यिक, शरदचंद्र चटोपाध्याय हे नांव मी तोपर्यंत ऐकले पण नव्हते. मात्र ही कादंबरी वाचायला सुरूवात केली, आणि झपाटल्यासारखाच वाचत गेलो. त्यांनी त्यांच्या आयुष्यात भोगलेल्या वेदना, त्यांना दिलेले तोंड, नंतर मिळालेला मानमरातबात ! ती पूर्ण करूनच हातावेगळी केली. ते केवळ बंगाली साहित्यातलेच नाही, तर भारतीय साहित्यातले अग्रगण्य नांव आहे, हे लक्षात आले.
ही कादंबरी वाचल्यावर मग शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या श्रीकांत, देवदास, चरित्रहीन, परिणीता, गृहदाह, बडी दीदी, निष्कृती, दत्ता वगैरे कादंबऱ्यांची नांवे समजली. त्यातील श्रीकांत आणि देवदास, ही नांवे माझ्या चांगलीच लक्षात राहिली. या दोन्ही साहित्यकृती १९१७ सालातीलच ! त्यांच्या कथावास्तुतील दम लक्षात घेऊन, त्या कादंबऱ्यावर आधारीत काही चित्रपट तयार झालेत. सन १९५३ साली परिणीता, सन १९६९ साली बडी दीदी तसेच मझली बहन, सन १९७४ साली चरित्रहीन !
‘देवदास’ या गाजलेल्या कादंबरीवर तर विविध भाषांमध्ये, सन १९२८ सालाच्या मूकपटापासून ते आजपावेतो निदान अठरा वेळा तरी, विविध भाषांत चित्रपट निर्माण झाले आहेत. अगदी भारताबाहेर पाकिस्तान, बांग्लादेश इथे देखील, या कादंबरीवर चित्रपट तयार झाले आहेत. तीन हिंदी चित्रपट विविध काळात निर्माण झाले. पहिले - सन १९३६ मधे पी. सी. बारूआ दिग्दर्शित व कुंदनलाल सेहगल, राजकुमारी आणि जमुना बारूआ यांचा, दुसरा - सन १९५५ मधे बिमल राय दिग्दर्शित व दिलीपकुमार, वैजयंतीमाला आणि सुचित्रा सेन यांचा आणि तिसरा - सन २००२ मधे संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला शाहरूख खान, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय यांचा !
‘देवदास’ या शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या कादंबरीने रसिकांवर कमालीची मोहिनी घातली आहे. देवदास या तरूणाचे, पार्वती म्हणजे पारोवर असलेले, मात्र सफल होऊ न शकलेले प्रेम ! तिचा दुसऱ्याशी, विधुराशी म्हणजे बिजवराशी होणारा विवाह, त्यातून देवदासची होणारी कुचंबणा ! नंतर देवदासचा चंद्रमुखीशी, एका कोठेवालीशी होणारा आणि वाढत जाणारा परिचय ! यांतून त्याला लागणारे व निरंतर वाढत जाणारे दारूचे व्यसन ! समाजाच्या कठोर चालीरिती, त्यातून निर्माण होणाऱी प्रेमी जीवांची तगमग, प्रेमाची परिणीती विवाहात न होणे, त्यातून आयुष्याची भग्नावस्था, हा दु:खांत या कथेत दाखवला आहे. त्यातील नाट्यमयता, कथाबीज, मानवी स्वभाव, परिस्थितीने होणारी तगमग व अगतिकता, आयुष्याची दुर्दैवी कलाटणी, प्रेम व साध्य न झाल्याने त्यातील वैफल्य, व्यसनाधीनता अशा आयुष्यातल्या असंख्य कंगोऱ्यांना या कादंबऱीने स्पर्श केला आहे. माणसाचे नियतीपुढे प्रकर्षांने जाणवणारे क्षुद्रत्व, ही कादंबरी अधोरेखीत करते.
बघताबघता मन किती मागे जाते नाही, त्याच्या वेगाला कसली मर्यादा नाही, सीमा नाही. जेवताजेवता, मला हा एवढा कालखंड पटकन आठवला, डोळ्यांसमोर झरकन उभा राहीला. जेवण झाले. मुलगी माझ्यासोबतच जेवायला बसली होती. आम्ही हात धुतले. मुलीला चैन पडतच नव्हती. तिनं संगणक सुरू केला, आणि ‘बाबा, आता शांतपणे ऐका ! गडबड करू नका, काही बोलू नका, ऐकतांना.’ मुलं आपल्या आईवडिलांना सांगतात, आणि प्रेमापोटी ते ऐकतात बिचारे ! तिने ‘देवदास’ या अलिकडच्या संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटातील, ‘मालती गुंधाए केश प्यारे घुगवारे’ ही सुरूवात असलेले, आणि ‘काहे छेड मोहे’ या नांवाने तिला माहीत असलेले गाणे युट्यूबवर लावले.
मला, ‘काही बोलायचे नाही, फक्त ऐकायचे’ असे तिने सांगीतले असले तरी - या गाण्यासाठी माधुरी दीक्षितने तीस किलो वजनाचा लेहेंगा घातला होता. हे एवढे वजन पेलत पण, तिने खूप सुंदर नृत्य केले आहे. बघाच तुम्ही !हा नाच पं. बिरजू महाराजांनी बसवला आहे. गाण्याचे संगीत संजय लीला भन्साळी यांनी दिले आहे. वगैरे ती सांगू लागली. मी गाणे पाहू लागलो, ऐकू लागलो. गाणे ऐकतांना मनाने लगेच नोंद घेतली, या गाण्याचे संगीत संजय लीला भन्साळी यांचे नाही.
गाणे समोर दिसत होते. सुरूवात केली, जॅकी श्राॅफ यांनी ! माधुरी दीक्षितची अदाकारी दिसत होती. लोभवणारी वाटत होती. शाहरूख खान गप्प गप्प दिसत होता.
आणि कानावर स्वर पडले, राग बसंतचे ! आणि मग माझे मन मात्र त्या स्वरांनी, अजून दूर व खूप मागे गेले होते, माझ्या गांवी असलेल्या, जुन्या घरात ! मला आठवत होता, तो बडा ख्याल - नाबी के दरबार ! आणि ती चीज - ‘फगवा ब्रीज देखन को चलो री’ ही बसंत रागातील ! बसंत हा पूर्वी थाटातला राग ! यांवर श्री रागाचा प्रभाव जाणवतो. मध्य व तार सप्तकांत याचे चलन आहे. उत्तरांग प्रधान हा राग आहे. आरोहात रिषभ व पंचम वर्ज्य, येतांना अवरोहात रिषभ आणि धैवत कोमल घेतात, तर मध्यम हा तीव्र घेतात. ओढव संपूर्ण जातीचा हा राग ! याचा वादी षड्ज तर संवादी पंचम ! रात्रीच्या दुसरा प्रहर गाण्यासाठी मानला गेला, तर वसंत ऋतूत केव्हाही म्हणता येतो, ही भावना ! षड्ज गंधार, षड्ज पंचम गंधार यांवर क्षणभर थांबल्यासारखे दाखवतात. याचा रस शृंगार व विरह !
माझी आई काही वेळा हा राग म्हणायची, आणि बसंत पंचमीला तर हमखास म्हणायचीच ! बसंत पंचमी, म्हणजे माघ शुद्ध पंचमीला ! स्नान झाले, की मी आपला घरी असेल तर, सकाळी पारावरच्या गणपतीच्या दर्शनाला जायचे, नाहीतर संध्याकाळी ! आंब्याचा मोहोर, गव्हाची ओंबी गणपतीला अर्पण करायची. नमस्कार करायचा, आणि घरी यायचे. आईचा स्वयंपाक बहुधा आटोपलेला असायचा. आईने हार्मोनियम काढलेली असायची. पूर्वी घरी तबला नव्हता, तेव्हा तीच एकटी म्हणायची आणि आम्ही ऐकायचो. तबला घेतल्यावर, मला तबला घ्यायला लावायची, आणि म्हणायची, ‘अरे, आज बसंत पंचमी ! हजेरी लावायला हवी. ऐक. बसंत राग आहे हा. धर ठेका धर !’ मग बसंत रागातील ख्याल - नाबी के दरबार आणि छोटा ख्याल म्हणजे चीज - फगवा ब्रीज देखन को चलो री’ ही तीनतालातील चीज, ती गायची.
कानांत कित्येक वर्षांपूर्वीचे बसंतचे सूर होते, तर डोळ्यांसमोर ‘देवदास’ चित्रपटातील माधुरी दीक्षित नृत्य करत होती. भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांचे वर्णन आहे. गाणे सुरु होते, तबल्याची उठान वाजवली जाते. सोबत नृत्यातील नृत्यांगनांच्या गिरक्या, माधुरी दीक्षित, म्हणजे चंद्रमुखी सोपानावरून तिच्या खास अदाकारीने उठत, आपल्या हातातील दीप उंच धरते. मग गोपीचे वर्णन करतांना विश्वविख्यात नर्तक, पं. बिरजू महाराज यांचा आवाज, चित्रपटातील भूमिका करत असलेला, जॅकी श्रॉफ याच्या तोंडून येतो. तोंडात विड्याचे पान चघळत, आणि मनगटाला बांधलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा हात उंचावत, राग बसंतातील उंच स्वर कानावर येतात ! चंद्रमुखी आपले पदन्यास करत 'देवदासकडे' येते, आपल्या मोहक अविर्भावाने त्याला भुलविण्यासाठी ! मागे बसंतातील सूरांत गोपीचे वर्णन आणि चंद्रमुखीचा देवदाससाठी आपल्या अदाकारीने, त्याने नृत्याविष्कारातील भावनांत, भावाविष्कारांत सहभागी व्हावे यासाठी होत असलेला लाडीक प्रयत्न -
मालती गुंधाए केश प्यारे घुनगवारे
मालती गुंधाए केश प्यारे घुनगवारे
मुख दामिनी सी दमकत चाल मतवारी
चाल मतवारी चाल मतवारी
यापाठोपाठ, येतात ते तबल्याचे आणि नृत्याचे कडकडीत बोल ! चित्रपटातील या गीतात तबलावादकाचा तबला वाजवतांना हात थोडाच वेळ दाखविलेला आहे. इतकेच जाणवते, मात्र या गाण्याचे चित्रीकरण करतांना खरा तबलावादक बसविलेला असावा. त्याच्या बोटांची हालचाल आणि ऐकू येणारे बोल, यांचे योग्य तारतम्य जाणवत होते. अन्यथा चित्रपटात तबल्याचे बोल काही वेगळे निघतात आणि तबल्यावरील बोटे कुठेतरीच असतात. हे बोल, सूर ऐकल्यावर मात्र, मी किंचित सावरून बसलो. मग सुरु झाली गोपीची कृष्णाबद्दल तक्रार, माधुरी दीक्षितच्या आवाजांत -
ढाई श्याम रोक लई रोक लई रोक लई
ढाई श्याम रोक लई औचक मुख चूम लई
मुख चूम लई मुख चूम लई
सर से मोरी चुनरी गई गई गई
सर से मोरी चुनरी गई सरक सरक सरक
सरक सरक सरक सरक सरक सरक
चंद्रमुखीची अदाकारी, ही मनातील कृष्णाच्या खोड्यांबद्दलच्या तक्रारीने, देवदासचे लक्ष आपल्याकडे वेधावे अशीच असावी. ही गोपीची कृष्णाबद्दलची लाडीक तक्रार संपत नाही तोच, चित्रपटातील प्रसिद्ध पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्तीच्या आवाजातील, बसंत रागातील स्वर आले -
काहे छेड़ छेड़ मोहे गरवा लगाई
काहे छेड़ छेड़ मोहे गरवा लगाई
काहे छेड़ छेड़ मोहे
नंद को लाल ऐसो ठीठ , नंद को लाल ऐसो ठीठ
बरबस मोरी लाज लीन्ही, लाज लीन्ही लाज लीन्ही
बरबस मोरी लाज लीन्ही
बिंदा श्याम मानत नाही, बिंदा श्याम मानत नाही
कासे कहु मैं अपने जिया की सुनत नाही माई
काहे छेड़ छेड़ मोहे इश्
कृष्णाच्या खोड्यांनी कसे मला त्रस्त करून टाकले आहे, हे आपल्याला सांगत असते गोपीच्या वेशातील, चंद्रमुखी ! शेवटी तिला सांगायला लज्जा वाटते, 'लज्जासुलभ उद्गार इश्श' काढल्यावर मन उंचावली जाते, ती देवदासची ! तो बघतो चंद्रमुखीकडे, आणि ऐकू येतात तबल्याचे आणि नृत्याचे खणखणीत बोल ! देवदासच्या डोळ्यात अश्रू तरारतात, ते बघील्यावर का पूर्वीच ठरल्याप्रमाणे, चंद्रमुखीच्या तोंडून गोपी म्हणते -
दधकी की भरी मटकी, दधकी की भरी मटकी
दधकी की भरी मटकी लेई जात रही डगर बीच
आहट सुन आहट सुन आहटसुन
जियरा गयो धड़क धड़क धड़क
धड़क धड़क धड़क धड़क धड़क धड़क
माझ्या डोक्यावर दह्याने भरलेली घागर, मी कशीबशी सावरत घेऊन जात असतांना, अचानक मला जोरात साद आली, माझा जीव घाबरायला लागला, आता मला हा छेडणार - ही पण खोटीच तक्रार, कारण गोपीच्या अविर्भावावरून तर तिला कृष्णाची ही खोडी हवीच आहे असे दिसते ! देवदास वर बघत सुस्कारा टाकतो, आणि उठून जायला बघतो. त्याला बळेच हात पकडून बसवतो, तो त्याचा मित्र ! आणि मग पुन्हा शेवटी कविता कृष्णमूर्तींच्या आवाजातील धृवपद - काहे छेड़ छेड़ छेड़ मोहे ! आणि पुढचा अंतरा -
कर पकड़त चूड़िया सब कर की कर की कर की कर की
कर पकड़त चूड़िया सब कर की कर की कर की ओ माई
बिंदा श्याम मानत नाही
बिंदा श्याम मानत नाही
कासे कहु मैं अपने जिया की सुनत नाही माई
काहे छेड़ कहे छेड़ काहे छेड़
छेड़ छेड़ छेड़ मोहे
या वृंदावनाच्या कृष्णाने माझा हात पकडल्याने, माझ्या सर्व बांगड्या गेल्यांत, हा वृन्दावनच कृष्ण अजिबात ऐकत नाही. आता हे कोणाला सांगावे, कोणाचे ऐकत नाही ते, सारखा छेडाछेडी करत असतो. आणि आतापावेतो एकतालातील असलेले हे गीत, आपला ताल बदलते. तीनताल ऐकायला येतो, नृत्याच्या आणि तबल्याच्या बोलात एक गती येते, नृत्याचा विविध भावमुद्रांनी ही चंद्रमुखी रिझवत असते, तेथील सर्वांना, देवदासाला पण !
गाणे संपल्यानुळे थांबते. आवडलं ! एक खरोखर सुंदर गीत बसविले आहे, विश्वविख्यात नर्तक, पद्मविभूषण पं.बिरजू महाराज यांनी ! त्यांच्या संगीतातील कार्यासंबंधी, मी काही लिहावे, इतका काही मी मोठा नाही. या चित्रपटाला कित्येक पुरस्कार मिळालेत. मी चित्रपट बघीतलेला नसल्याने, या चित्रपटसंबंधाने मला फार काही सांगता येणार नाही. या चित्रपटातील 'डोला रे डोला' या गीताला सर्वोत्कृष्ट गीतगायनाचा पुरस्कार कविता कृष्णमूर्ती आणि श्रेया घोषाल यांना, गीतकार म्हणून नुसरत बद्र यांना याच गीतासाठी, सरोजखान यांना या गीताच्या नृत्यासाठीचा, इस्माईल दरबार यांना या गीताबद्दलच्या संगीताचा पुरस्कार मिळाला.
हे गाणं जसं ऐकलं, तसं यासोबत मला का कुणास ठाऊक, पण आमच्या मराठीतील, 'पिंजरा' या चित्रपटातील प्रसिद्ध गीतकार, जगदीश खेबुडकर यांचे 'दे रे कान्हा चोळी लुगडी' हे गीत आठवले. विषय तोच, कृष्ण आणि गोपींच्या क्रिडा ! पिलू रागावर आधारलेले हे गीत, समर्थ संगीतकार राम कदम यांनी सुंदर बांधलेले आहे. यातील भावना, वेदना संध्या यांनी चित्रगीतांबर हुकूम दाखविलेल्या आहे. या दोन गीतांची तुलना नाही.
गाणे संपले.
'बाबा, सांगा गाणे कसे आहे ?' माझी मुलगी.
'गाणे चांगले आहे.' मी.
'पहा बरं, तुम्ही म्हणतात नवीन गाणी चांगली नसतात, मग कसे आवडले हे गाणे तुम्हाला ?' माझी मुलगी.
'तुझ्या गाण्याच्या चार परीक्षा झाल्या आहे. आजीने शिकविले आहे तुला ! या गाण्यांत नवीन काय आहे ? गाण्याचा विषय जुना, गाणे बसविले ते जुन्या माणसाने, आणि राग बसंत हा पण जुना ! ------- हा, एक आहे, हे तुलनेने अलीकडच्या काळांत गायलेले आहे, अलीकडच्या चित्रपटातील आहे ! आणि हो, अलीकडच्या गायिकेने गायले असे म्हणता येणार नाही, कारण कविता कृष्णमूर्ती ही नवीन गायिका नाही.
—- तुम्ही गीत कितीही नवीन सांगा, त्यातील असलेले भाव, हे जुनेच असतात !
(आपणांस पोस्ट आवडल्यास शेअर करू शकता.)

3.4.2020

No comments:

Post a Comment