Sunday, May 10, 2020

काल २ मे !

काल २ मे ! ग्रेगोरिअय कॅलेंडरप्रमाणे, माझा जन्मदिन होता. असंख्य मित्रांनी इथं फेसबुकवर, मेसेजने, फोन करून व प्रत्यक्ष भेटून पण शुभेच्छा दिल्यात ! वडीलधाऱ्यांनी आशीर्वाद दिले. माझ्या जिथं दिसेल, त्या पोस्टवर, फोटोवर केले. हे त्यांचे निर्व्याज भाव दर्शविणारे भाव ! मी त्यांचा ऋणी आहे.
मात्र यंदा कोरोनाच्या छायेत असलेला हा वाढदिवस, घरातील सोडून इतर कोणाच्या, प्रत्यक्ष उपस्थितीशिवायच पार पडला. बाकी कोणी नाही, पण आसपासची बाळगोपाळ मंडळी, आमच्या घरात काही विशेष दिसले, की हटकून आणि हक्काने थांबणार ! आमच्यासोबत विशेष पदार्थाचा आस्वाद घेणार ! अलिकडे तर माझ्या अगोदर पण घेणार ! त्यात पण आनंद आहे. या बाळगोपाळांचे निर्व्याज प्रेम हे आमच्या घराला, कायम लाभत आले आहे. गांव बदलले, घरे बदलली, पण हे भाग्य मात्र कायम आहे. यंदा प्रथमच ती उणीव जाणवली.
वाढदिवसाचे सोहळे करावे, गाजावाजा करावा, असे माझे कर्तृत्व आहे, असे मी मानत नाही. जो जीव जन्माला येतो, त्याचा त्याच्या आयुष्यात दरवर्षी न चुकता, जन्मदिन येतोच, त्यात काही आपले कर्तृत्व नसते.
हा साजरा यासाठी की, आपले अस्तित्व हे समाजासाठी, घरासाठी आनंददायी आहे, हे दर्शविण्याचा सोपा मार्ग, की ज्याचे काही कर्तृत्व, कार्य नाही, त्याला पण आनंद वाटेल, असा हा सोहळा आहे. या निमीत्ताने आपण आपल्या कुटुंबात, समाजात, आपले काम बाजूला सारून सहभागी होतो. त्याचा आनंद, सर्वांसोबत घेतो.
इथं फेसबुकवर कित्येक जण असे असतात, की ते आपल्या यादीत असतात, पण संपर्कात नसतात. जे काही नित्य थोडेफार लिखाण करत असतील, त्यांना आपल्याशी कोण संपर्क ठेवून आहे, याचा अंदाज काही अंशी येतो. या निमीत्ताने नजरचुकीने विस्मृतीत गेलेली, किंवा जात असलेली मंडळी आपल्यासमोर आपोआप येते, आणि आपण किती मोठ्या आनंदाला व त्यांच्या सहवासाला मुकणार होतो, याची कल्पना येते.
अजून दुसरी बाजू, येथील मित्रमंडळी काही एकाच विचाराची नसतात. काही ना काही, कारणांनी ते आपले मित्र झालेले असतात. काही संगीतप्रेमी असतात. काही आपल्या विचाराची असतात. काहींना साहित्यिक रूची असते. काही एका शाळेतील, एका वर्गातील, एका गांवातील असतात. काहींची कसल्या तरी कारणाने ओळख झाली असते, आणि ते ओळख टिकवून ठेवावी या विचाराचे असतात. काही कामापुरते ओळख ठेवणारे, पण असतात. काही असले तरी, विविध विचारांची, विविध स्वभावांची, आवडनिवड असलेली ही मंडळी, कोणाचाही कोणाला कसला उपद्रव असण्याची शक्यता नसल्याने, आपली मैत्री घट्ट करू शकतात. या गढूळ वातावरणांत, तुरटीचे काम करून द्वेषाचा गाळ खाली बसवू शकतात. मैत्रीचे जल हे निर्जंतुक व स्वच्छ करू शकतात. बस, हीच अपेक्षा आहे.
—— जाता जाता ! येथील 'सेलिब्रिटी' यांचा आपल्या पोस्टवर तसा फारसा वावर नसल्याने, या निमीत्ताने त्यांना, 'मी पण आहे बरं तुमच्या सोबत' हे दाखवता येवू शकते. ‘सेलिब्रिटी’ कोण हे मी सांगणार नाही. ज्याने त्याने ओळखावे.
पुन्हा एकदा, आपल्या स्नेहाबद्दल मी आपला ऋणी आहे.

3.5.2020

No comments:

Post a Comment