Sunday, May 10, 2020

कोणत्याही प्रोफेशनचा बिझिनेस होण्यामागील एक कारण - पूर्वी लबाडीचे अनुभव कमी होते, तोपर्यंत ‘प्रोफेशन’ होता. लबाडीचे अनुभव वाढले, अगदी परवडेनासे झाले, प्रोफेशनचा ‘बिझिनेस’ झाला !
22.1.2020


एखादा क्षण वा घटना, आपल्या गतकाळातील आठवणींची सूत्रात ओवलेली माळ ओघळवायला पुरेसा असतो. एकदा का ते आठवणी बांधून ठेवणारे सूत्र तुटले, की आठवणी भराभर सांडायला कितीसा उशीर ? त्या माळेतील मोती ओघळायला लागले, की मग एरवी एकत्र गुंफलेल्या आठवणींचे मोती, विखरून घरभर सैरावेरा धावायला लागतात ! ते वेचून पुन्हा त्यांची माळ बनवणे महाकर्मकठीण ! कितीही काळजीपूर्वक शोधले, आणि गुंफायचे ठरविले, तरी दोनचार चुकार आठवणींचे मोती, सापडत नाही. दडून बसतात कुठेतरी मनाच्या घरातील कोपऱ्यात ! ते पुरेसे असतात, आपल्या डोळ्यातून पाणी काढायला !

© ॲड. माधव भोकरीकर

19.1.2020

आपल्या सासरची मंडळी अखंड आपले कौतुक न करता, आपल्या नवऱ्याचेच कौतुक, न थकता करत असतील, तरी वाईट वाटून घेऊ नये, अथवा रागावू नये ! —-अर्धांगिनी असल्याने, अर्धे कौतुक आपलेच आहे, हे गृहीत धरावे
17.1.2020

आपण शपथ किती वेळा घेतो -
१. विवाहाचे वेळी शपथ घेतली जाते, तो योग बहुदा सर्वांनाच येतो.
२. न्यायालयातील साक्षीस गेलो, तर घ्यावी लागते. हा योग क्वचितच !
आमदार, खासदार, मंत्रीपदाची संधी मिळाली तर शपथ घ्यावी लागते, ती संविधानात सांगीतल्याप्रमाणे ! — शपथ घेतल्यानंतर ती पाळायची पण असते, हे किती जणांच्या लक्षात रहाते ?
अजून एक सुंदर आठवण झाली, श्री. मंगेश वाघमारे यांची पोस्ट वाचल्यावर ! आम्हाला इयत्ता सहावीला मराठीत धडा होता, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा बहुदा - ‘शपथ घ्या, शपथ घ्या’ या नांवाने धडा होता. लोकमान्य टिळकांना अटक झाल्याने, भावना अनावर झालेल्या शिक्षकाच्या मनस्थितीचे वर्णन आहे त्यांत ! हा धडा नेहमीप्रमाणेच आमचे मराठीचे शिक्षक श्री. एस्. आर. कुलकर्णी (ज्यु) यांनी अप्रतिम शिकवला होता.

4.1.2020

सत्य हे माणसाला डोळस बनवते. त्याची दृष्टी अधू असेल, तर झणझणीत अंजनाचे काम करत, त्यांस लख्ख दृष्टीदान करते. मात्र लख्ख दृष्टी मिळाल्यानंतर, जे काही दिसेल, ते सोसायची तयारी हवी; अन्यथा ‘अज्ञानात सुख’ असे वाटायला नको.

ऐपत असेल तर सर्व विकत घेता येतं, पण नाण्याचा खणखणीतपणा नाही घेता येत. कोणत्याही जमीनीवर खण्णकन आवाज करत वाजणारी नाणी कमी झाली आहेत. अलिकडे चकचकीत, चमचमणाऱ्यांचा ‘बद्द’ असाच आवाज येतो.


अलिकडच्या मनस्ताप देणाऱ्या घटना बघीतल्या, विशेषत: जनतेला भेटीचे औदार्य पण न दाखवणारे राज्यकर्ते बघीतले, की कित्येक विचार मनांत येतात. फार थोडे मांडतां येतात.
पूर्वजांच्या पुण्याईची फळे सर्वांनाच मिळतात असे नाही, काहींच्या वाट्याला अजूनही काटेच येतात. पांडवांचा वनवास बारा वर्षांनी व वर्षाच्या अज्ञातवासाने, प्रभू रामचंद्रांचा वनवास चौदा वर्षांनी संपतो. हे सर्व अवतारी पुरूष !
राणा प्रताप यासारख्या रणधुरंधराचा वनवास मरेपर्यंत संपला नाही, शेवटपर्यंत आपल्या चितोडच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारा स्वातंत्र्यवीर गवताच्या गादीवर झोपताझोपता स्वर्गवासी झाला !

काहींचा वनवास त्यांच्या मृत्युनंतर संपतो, त्यांच्या योगदानाची जाणीव कृतज्ञतेने ठेवली जाते. काही दुर्दैवी जीवांचा वनवास, मात्र त्यांच्या मृत्युनंतर पण संपत नाही.
या ऐतिहासिक पुरूषांची, भल्याभल्यांची ही अवस्था तुम्हीआम्ही केली, तर अलिकडचेच असलेल्या तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा ? —- शिंतोडे उडवायला काय जाते आमचे ! गंगोदकाचे काय आणि गटारीच्या पाण्याचे काय ? आमची जशी लायकी ते पाणी आम्हाला आवडेल !
4.1.2020

लग्न ठरवतांना, शक्यतोवर मुलाकडे मुलीकडची मंडळी जातात, कार्यक्रमाला ! पूर्वी पंचक्रोशीतील मुलगी असायची, ओळखीपाळखीतील असायची, कोणाच्यातरी नात्यागोत्यातील पण असायची, अपरिचित किंवा त्रयस्थपणा कमी असायचा, त्यामुळे नवीन नातं लवकर जोडले जायचे. आता वधूवर वेगवेगळ्या गांवातील असतात, बऱ्याच वेळा दूरचे असले, पूर्वपरिचय नसला तर कोणाबद्दल विशेष माहिती नसते. त्यामुळे वधूवरसूचक मंडळे निघालीत. त्यांच्याकडून काहीतरी समजते.
दूरदूरवरून दुसरीकडे जायचे म्हटले, तरी पैसा आणि वेळ खर्च होणारच ! नंतर त्यातून निष्पन्न काय होईल, ते पण अनिश्चितच ! त्यामुळे आपण जागेवरून न हलता, समोरचा पाहुणा फक्त कार्यक्रमापुरताच आपल्याकडे कसा येईल, हे बघीतले जाऊ लागले. ही युक्ती दोन्हीबाजूने होऊ लागली. मुलाकडचे ‘मुलाला वेळ नसून, रजा मिळत नाही. पद्धतीनुसार मुलीला घेऊन या. घर पहाणे होईल.’ अशा स्वरुपाची कारणे सांगायची, आणि मुलीकडे जायला टाळायची. मुलीकडची ‘मुलाकडे कार्यक्रम व्हायची पद्धत जुनी झाली आहे. मुलीला ठिकठिकाणी मिरवायचे ते बरोबर दिसत नाही.’ वगैरे सांगू लागली. इथपर्यंत ठीक होते, पण एकदा जायचे नाही, म्हटल्यावर काहीही कारणे पुढे येऊ लागली.
एकदा शेजाऱ्यांच्या मुलीला स्थळ आले होते. मुलगी खान्देशची, तर स्थळ दूरचे, पाचशे किलोमीटरवरचे ! त्यावेळचे संभाषण कानावर पडले, तसे देतो.
मुलीकडचे - तुम्ही रात्री तेथून बसले, की सकाळी इथं आरामात याल. मुलीला तिकडे घेऊन यायचे, म्हणजे उतरायचे तर तिकडे कोणी नातेवाईक, स्नेही नाही. लाॅजमधे रहायचे, त्यापेक्षा तुम्ही या. तुमचे नातेवाईक, स्नेही तरी आहेत इकडे !
मुलाकडचे - ते ठीक आहे. पण कोणाकडे कशाला जायचे ? इथून तुमचे ठिकाण फार लांब आहे. जमणे कठीण आहे, तुम्हीच या !
मुलीकडचे - पहा बुवा, आम्ही मुलीकडचे आहे, हे ठीक आहे ! पण इकडून तिकडे आणि तिकडून इकडे, अंतर तर सारखेच ना ?
मुलाकडचे - पण लांब आहे फार !
मुलीकडचे - आम्हाला पण तितकेच लांब आहे.
या अशा संवादातून काय साधते ?
1.1.2020

एखाद्याने नेहमीप्रमाणेच सध्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरूद्ध तर्कटी पोस्ट केल्यावर, त्यांत कायद्याच्या विचार केल्यावर, पोस्टकर्त्याचे म्हणणे चुकीचे असल्याने माझेकडून अनावधानाने प्रतिक्रिया सहजपणे दिली गेली. त्यांतील कायद्यानुसार चुकीचे काय, ते मी सांगीतले. वास्तविक मोफत सल्ला द्यायला नको, त्याची किंमत नसते, हे मी त्या क्षणी विसरलो.
थोड्या वेळांत त्यांवर बाकी कसलाही विचार न करता, आपण सर्वज्ञानी असल्याच्या आवेशांत, एकाने मला सरकारच्या बाजूने असल्याचे समजून, मला माझ्या कायदेशीरपणात, बेकायदेशीरपणा भासवत, पोस्टकर्त्याला माझ्या नादी लागू नये, म्हणून ‘तर्कशुद्ध’ सल्ला दिला.
मला ती प्रतिक्रिया वाचल्यावर कुतूहल, की एवढा तत्वचिंतक पण बेकायदेशीर सल्ला कोणी दिला, म्हणून बघीतले, तर काय, —- ती व्यक्ती इथे माझ्या मित्रांच्या यादीत नव्हती. इतके बरे वाटले म्हणून सांगतो ! अलिकडे कशावर समाधान वाटेल, ते सांगता येत नाही !
नाही त्या वाटेला सूज्ञ माणसाने जाऊ नये, हा सल्ला जुनीजाणती मंडळी देतात, ते उगीच नाही.
30.12.2019

सत्य पचायला कायम जड असते. ज्यांचा कोठा हलका असतो, ते सत्याच्या वाटेला गेले, की त्यांना ढाळ व्हायला लागतात.
27.12.209

No comments:

Post a Comment