Sunday, May 10, 2020

घनन घनन घिर घिर आये बदरा - लगान 'वन्स अपॉन अ टाइम इन इंडिया' !

घनन घनन घिर घिर आये बदरा - लगान 'वन्स अपॉन अ टाइम इन इंडिया' !
'नया दौर' हा सन १९५७ मधील चित्रपट ! ज्यातील कलाकार, दिलीपकुमार, वैजयंतीमाला यांसारखे होते, जे आजदेखील प्रसिद्ध आहेत. हा चित्रपट जरी मी बघीतलेला नसला, तरी त्यांतील अप्रतीम गाणी, मला अतिशय प्रिय आहेत. अगदी निर्जीवाला देखील ठेका धरायला लावणारे संगीत देतात, असा ज्यांचा लौकिक आहे, ते ओंकार प्रसाद नय्यर या चित्रपटाचे संगीतकार होते, आणि गीते लिहीली होती ती, साहीर लुधियानवी यांनी ! 'ये देश है वीर जवानोका', 'साथी हाथ बढाना', 'रेशमी सलवार कुर्ता जाली का', आणि 'मांग के साथ तुम्हारा' ही, आशा भोसले आणि मोहंमद रफी, यांनी गायलेली गीते ज्याला आठवत नसतील, त्याच्या संगीताच्या आवडीबद्दल, अभिरुचीबद्दल शंकाच घ्यायला हवी.
यांवरून स्फूर्ती घेऊन हा चित्रपट निघाला, सन २००१ साली ! इंग्रजांच्या, म्हणजे आपल्या पारतंत्र्याच्या काळातील जनतेवर होणारे अन्याय आणि अत्याचारावर आधारलेली ही कथा ! लागोपाठ तीन वर्षे दुष्काळाच्या वणव्यात होरपळत असलेल्या जनतेला, मदत करावी हे काही परकीय राजवटीच्या अधिकाऱ्याला सुचणे शक्य नव्हते. सरकारची तिजोरी जास्तीत जास्त कशी भरली जाईल, हा एकमेव उद्देश असलेली सत्ता, जनतेवर तिच्या क्षमतेपलिकडे कराचा भार टाकणारच ! जनतेला ही परकीय सत्ता, कराच्या ओझ्याखाली इतकी दडपून टाकणार, की तिला सत्तेविरूद्ध लढण्याची शक्तीच रहायला नको.
अशाच एका छोट्या खेड्यातील, चंपानेरमधील ही घटना ! तेथील जनतेवर इंग्रज अधिकाऱ्यांनी प्रचंड कराचा बोझा टाकला. तेथील अंक रहिवासी भुवन !याच्या नेतृत्वात, तेथील भागाचा राजा, पूरणसिंग याला येथील रहिवासी भेटायला जातात, अपेक्षा की त्याने काही मदत करावी. भुवन हा राजवाड्याजवळ सुरू असलेला क्रिकेटचा खेळ पहातो. त्याचा यावरून स्वाभाविकच इंग्रज अधिकाऱ्याकडून अपमान होतो. ‘तुमच्या खेड्याच्या संघाने आम्हाला हरवले, तर तीन वर्षांचा कर माफ करू, मात्र आम्ही तुमच्या संघाला हरवले, तर सध्या असलेल्या कराच्या तिप्पट कर द्यावा लागेल’, ही ताकदीच्या पलिकडची पैज स्विकारून भुवन आपल्या गांवी येतो. येथून चित्रपट गती पकडतो. आपल्यावरील जाचक कर टळेल, निदान तीन वर्षांसाठी तरी ! या भावनेने तिथे क्रिकेटच्या संघाची बांधणी जीवापाड सुरू असते. पावसाची आराधना करत, ‘घनन घनन घन’ हे गाणं म्हणतात, पण पाऊस येत नाही.
परमेश्वराची केवळ आराधना करणाऱ्याला परमेश्वर कधीच प्रसन्न होत नाही. चित्रपटाच्या मध्यंतरी पण गाणं होतं, पण पाऊस येत नाही. चित्रपटाचा उत्कंठावर्धक आणि शेवटचा भाग, म्हणजे सामन्याचा दिवस ठरतो. ठरलेल्या दिवशी सामना सुरू होतो. मग मात्र त्या चंपानेरच्या रहिवाशांची सामना जिंकण्यासाठीची तगमग बघवली जात नाही. चित्रपट केवळ आपणच बघत नाही, तर चंपानेरच्या रहिवाशांची परिक्षा परमेश्वर पण बघत असावा. क्षणाक्षणाला विजयाचे पारडे, वरखाली होत असलेला हा सामना, चंपानेरचा संघाच्या विलक्षण कष्टाने व जिद्दीने लढण्यामुळे तो संघ जिंकतो. भुवन जिंकतो. मग पुन्हा या विजयाच्या जोशात, आनंदात हे गाणं सुरू होते. ‘घनन घनन घिर घिर आये बदरा’ ! तुमच्या कष्टाला फळ देण्यात परमेश्वर कसा मागे राहील ? आपली कृपा तो वरूणदेवाच्या वर्षावाने चंपानेरच्या रहिवाशांना चिंब भिजवून दाखवून देतो.
‘घनन घनन घन’ हे उदीत नारायण, सुखविंदर सिंग, अलका याज्ञिक, शंकर महादेवन, शान, किशोरी गोवारीकर यांनी गायलेले हे गीत, लिहीले आहे जावेद अख्तर यांनी, आणि संगीत दिलं आहे, ए. आर. रहेमान यांनी ! आपण ओळखले असेल, हे गीत - ‘लगान’ या अमीर खान निर्मीत आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपटातील आहे.
राग काफी आणि पिलू रागावर आधारलेले, हे गीत ! ‘काफी’ हा हिंदुस्थानी संगीतातील दहा थाट मानले, गेले आहेत, त्यांतील एक थाट पण आहे, आणि ‘काफी’ राग पण आहे. थाट म्हणजे, बारा स्वरांपैकी, सात स्वरांचा समुह ज्यात असतो. हा गायला जात नाही. यांस काही भाव नसतात. याला वादी वा संवादी नसतो. हिंदुस्थानी संगीतातील विविध राग जे आहेत, ते विविध थाटांमधील असतात.
‘काफी’ रागाची थोडी माहिती बघीतली तर, यांत गांधार व निषाद कोमल असतात. हा राग संपूर्ण-संपूर्ण आहे. याचा वादी पंचम आणि संवादी षड्ज आहे. याचा गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर मानतात. हा शृंगार रसप्रधान राग आहे. यांतील होरी, टप्पा, दादरा आपण खूप वेळा ऐकले असाल. किर्तन भजनांत याचा उपयोग बऱ्याच रचनांमधे आहे. याचे आरोह व अवरोह –
आरोह - सा रे ग म प ध नी सा
अवरोह - सा नी ध प म ग रे सा
पकड - सासा रेरे गग मम प
आता ‘पिलू’ रागाची माहीती बघीतली, तर हा राग पण ‘काफी’ थाटातील आहे. याचा वादी गंधार आणि संवादी निषाद आहे. दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी हा रागाचा समय मानतात. या रागाची जाती ओढव-संपूर्ण आहे, म्हणजे जातांना पाच स्वर त्यावेळी रिषभ व धैवत वर्ज्य आणि येतांना मात्र सातही सर्व स्वर घेतले जातात. दोन्ही गंधार, दोन्ही निषाद व दोन्ही धैवत पण घेतले जातात. या रागात ठुमरी, भजने, नाट्यगीत वगैरे म्हणजे उपशास्त्रीय संगीत बहुतांश गायले जाते. हा राग पावसाळयाशी संबंधीत मानतात. हा रागाचा करूण व भक्ती रस मानतात. मंद्र आणि मध्य सप्तकात हा मुख्यत: गायला जातो. या रागातील आरोह व अवरोह –
आरोह - सा ग म प नी सा
अवरोह - सा नी ध प म ग रे सा
कानाला गोड वाटणारे कोणतेही गाणं, हे आपल्या सात स्वरांत, आपल्या संगीताच्या शास्त्रात, कुठंतरी नीट बांधलेले असते, म्हणूनच कानाला गोड लागते. यासाठी आपल्याला हे कर्णमधुर आणि सुंदर गीत !
©Madhav Bhokarikar
(आपणांस पोस्ट आवडल्यास शेअर करू शकता.)

30.3.2020

No comments:

Post a Comment