Sunday, May 10, 2020

नुकताच, ‘बोराडेंचे बोल आणि हुल्लडबाजांच्या टोळ्या’ हा श्री. प्रवीण बर्दापूरकर यांचा लेख वाचला.
त्यात वास्तव सांगीतलेले आहे, दोघांनीही ! जेष्ठ साहित्यिक श्री. रावसाहेब बोराडे यांनी, तसेच प्रसिद्ध लेखक व पत्रकार श्री. प्रवीण बर्दापूरकर यांनी ! हे जरी असलं, तरी आपला समाज व समाजातील व्यक्ती, आता इतक्या काही घाणेरड्या वळणावर आणि टोकदार कड्यावर पोहोचलेल्या आहेत, की बोलणारा लाजतो, की हे कसे काय चारचौघात बोलणार ? लिहीणारा संकोचतो, की हे लिहीणे उचित होणार नाही, जरी वास्तव असले तरी ! मात्र हे कार्य करणारे काही लाजत नाही. निर्लज्जपणाच्या कळसावर आहोत आपण, का अजून पण पुढे काही आहे, परमेश्वर जाणे !
आपण सध्या काय बघत नाही ? जातीपातीच्या माध्यमातून कोणाला नोकऱ्या मिळविता येतात किंवा कोणाच्यातरी हिसकाविता येतात, राजकारण हवे तसे करता येते आणि हव्या त्या अपेक्षित व्यक्ती निवडता येतात व काहींच्या राजकारणातील त्यांना मिळालेल्या संधी घालवता येतात, त्याचे आयुष्य संपवतां येते, त्याला नेस्तनाबूत करता येते. हे सर्व काळजीपूर्वक बघतो.
आपण विविध ठिकाणी टोळ्यांचा उपयोग करून ‘समजावतो आहे’ या भावनेने, हवा तसा ‘इतिहास सांगून’ वेगळा इतिहास ‘घडवत’ समाजाची आपल्या ‘सर्व प्रकारच्या सामर्थ्याने’ दिशाभूल करतो. वेळप्रसंगी दहशतीने आपले व्यवस्थीत बस्तान बसवितो. सर्वसामान्यांच्या अगतिकतेचा, गरिबीचा, अज्ञानाचा आणि कोणत्यातरी गटात असल्याने त्यांना वाटणाऱ्या सुरक्षिततेच्या भावनेने, त्यांचा पाठिंबा मिळवतो. प्रसंगी दडपशाहीचा वापर करून, लोकशाहीने सत्ता प्रस्थापित करता येते, हा धडा घालून देतो. ----- त्यातीलच हा एक भाग, 'साहित्यिक' पण बनता येते यामार्गाने !
आम्हाला शाळेत असतांना मराठीच्या पुस्तकांत, विविध लेखकांचे धडे, कविता असायच्या. त्यांचा थोडक्यात परिचय धडा वा कविता सुरु होण्यापूर्वीच्या परिच्छेदात दिलेला असायचा. त्यांत एक वाक्य बऱ्याच वेळा असायचे, ते म्हणजे 'हे अमुक ठिकाणी भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते'. आश्चर्य हे की ही मंडळी साहित्यिक आहेत, लिखाण करतात हे त्यांचा तो धडा किंवा कविता वाचण्याच्या पूर्वीच आम्हाला माहीत असायचे. त्यांच्याबद्दल ही जास्तीची माहिती असायची. त्यामुळे आमचे काही अडत नसे, कारण कोणी लेखक-कवींची नांवे विचारली तर आम्हाला त्यांची नांवे माहीत असायची.
संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत नामदेव, संत तुकाराम, संत निळोबा, संत चोखोबा, संत एकनाथ वगैरे संत मंडळी तर, त्यांचा असा काही परिचय नसून पण, आमच्या मनांत ठाण मांडून बसलेली होती.
मात्र अलिकडील काही साहित्य संमेलनाध्यक्षांची नांवे वाचली, आणि आपले मराठी वाचन, आता आपल्या शालेय काळाएवढे देखील राहीलेले नाही, याची कल्पना आली. काळजी वाटली, का वाईट वाटले, ते सांगत नाही. वास्तविक अलिकडच्या काळातील ज्यांची नांवे माहिती होती, ती काही इथं कुठे विशेषत्वाने दिसत नव्हती. ही जाणीव माते फारच वाईट वाटायला लावणारी होती. ------------- आपला लेख वाचला आणि दिलासा मिळाला मनाला ! आपले मराठी वाचन, इतके काही अजूनही वाईट नाही, याचे समाधान वाटले.
टीप - मा. रा. रं. बोराडे, आणि आपले नांव, मला शालेय वयापासून माहीत आहे.
© ॲड. माधव भोकरीकर

19.1.2020

No comments:

Post a Comment