Sunday, May 10, 2020

औदुंबर

औदुंबर
निसर्गकवि म्हणून ‘बालकवी’ या नांवाने विख्यात असलेले, कवि त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचा जन्म, दि. १३ ॲागस्ट, १८९० रोजी खान्देशातील धरणगांवचा, आणि मृत्यू भादलीचा, दि. ५ मे, १९१८ रोजीचा !
इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्यांना बालकवी ही पदवी दिली. बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती. इतक्या कमी काळांत असा नावलौकिक मिळवणे, आणि तो गेली निदान शंभरावर वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणे, ही सामान्य गोष्ट नाही. मुळात काळाच्या कसोटीवर टिकणारे सोने असल्याशिवाय या गोष्टी व्यर्थ आहेत.
काहींच्या कवितेत, लिखाणात कायम जी उदासपणाची छटा जाणवते, त्याचे कारण सहजपणे निघते, ते आयुष्यात सोसाव्या लागणाऱ्या संकटांवर !
बालकवी यांची, ‘औदुंबर’ ही कविता चित्रकाराप्रमाणे वाहणाऱ्या झऱ्याचे चित्र रंगवते, पायवाट दाखवते ! कवितेतील छोटे गांव आणि त्यांतील कौलारू घरे, हे कवितेत माणसाची वस्ती दाखवून अजून जिवंतपणा आणतात. सोबत जिवंतपणाचे हिरवे उदाहरण म्हणून शेती पण दाखवतात. मात्र जरी आपण पायवाटेने चालायला लागलो, की आपल्याला काळ्या डोहाकडे घेऊन जातात. आणि ही काळी उदासीनताच आपले आयुष्य आहे, असे मानत विरक्तीचे प्रतीक मानला गेलेला ‘औदुंबर’ त्या काळ्या डोहातील पाण्यालाच गोड मानत, आपले पाय त्या पाण्यात टाकून बसलेला दाखवला आहे.
मला ही कविता मराठीच्या धड्यात शिकवण्यापूर्वीपासून माहीत होती, म्हणून पुन्हा आपल्यासाठी द्यावी वाटतेय !
औदुंबर
ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे
पायवाट पांढरी तयातुन अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरे लाटांवर
पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर
© ॲड. माधव भोकरीकर
(पोस्ट आवडल्यास आपण शेअर करू शकतात.)

5.5.2020

No comments:

Post a Comment