Sunday, May 10, 2020

प्रभू रामचंद्र, रामबाण आणि एकाक्ष !

प्रभू रामचंद्र, रामबाण आणि एकाक्ष !
आपण आपत्तीत सापडले, की कोणीही आपणांस ज्ञान शिकवतो, आपल्या विपत्तीवर हसतो, संकटांत मदत करण्याऐवजी आपल्या शब्दांची तीक्ष्ण चोच मारून, आपल्याला घायाळ करून जातो. ती होणारी वेदना, कित्येक वेळा सहन करण्याच्या पलिकडे असते. आपल्याला त्या वेदनेतून मुक्ती ज्यावेळी मिळते, की अशा दुष्टाला कायमची, त्याला आयुष्यभर लक्षात राहील, अशी काहीतरी शिक्षा होते.
प्रभू रामचंद्र आणि देवी सीता, यांचा वनवास सुरू होता. सीता देवी जमिनीवर जरा पहुडल्या होत्या. त्यांच्या सौंदर्याची किर्ती त्रिभुवनी होतीच. इंद्राचा मुलगा जयंत, यास सीतादेवींची अभिलाषा झाली, आणि त्याने कावळ्याचे रूप घेतले. जमिनीवर निवांत पडलेल्या, सीतामाईंच्या वक्षावर हा कावळ्याच्या रूपातील, जयंत चोच मारू लागला. वेदनेने सीतामाई व्याकुळ झाल्या. प्रभू रामचंद्राचे लक्ष तिकडे गेले. क्षणात प्रभू रामचंद्राचा बाण, त्या दिशेने सुटला. रामबाणाची महती आणि सामर्थ्य कदाचित, जयंताला, त्या इंद्रपुत्राला माहीत नसावे. प्रत्यक्ष देवांचा राजा, आपला पिता असल्यानंतर हा वनवासी राम, त्याच्या पत्नीला काहीही केले, तरी काय करू शकतो ? हा त्याचा स्वाभाविक समज असावा. बापाच्या, बापजाद्यांच्या सामर्थ्यावर उन्माद करणारी पिलावळ, त्यावेळी, अगदी सत्ययुगात पण होती, असं दिसतंय !
प्रभू रामचंद्रांचा बाण, रामबाण, जसा त्याचा पाठलाग करू लागला, तसा हा कावळ्याच्या रूपातील जयंत कासावीस होऊ लागला. जीव जायची वेळ आली, की भावना सर्वांचीच होते. तो कसाबसा, धापा टाकत आपल्या पित्याकडे, इंद्राकडे गेला. इंद्राच्या लक्षात सर्व आले, पण आता उपयोग नव्हता. प्रभू रामचंद्रांचा बाण, रामबाण, सुटला होता. तो आपले लक्ष्य साध्य करणार यांत शंका नव्हती. काही झाले, तरी जयंत हा इंद्राचा मुलगा होता, मुलाने असे काही कमीपणा आणणारे काम केले, की मुलासाठी बापाला मान तुकवावी लागते. त्याचा उपयोग होतो, किंवा होत नाही. इथं मर्यादापुरूषोत्तम प्रभू रामचंद्र असल्याने, क्षमा केली जाण्याची शक्यता होती.
इंद्रदेव, आपला मुलगा जयंत, याला घेऊन प्रभू रामचंद्रांकडे वनांत आले. नमस्कार केला. क्षमा मागीतली. रामबाणाला मागे घ्यावे, ही प्रार्थना केली.
प्रभू रामचंद्रांनी उत्तर दिले, ‘माझा बाण लक्ष्यवेध केल्याशिवाय थांबणार नाही.’
‘काहीही करा, पण जीव वाचवा !’ इंद्र म्हणाला.
‘ठीक आहे. ज्या कावळ्याच्या रूपात येऊन, कावळ्याच्या डोळ्यांमुळे याने वाकड्या नजरेने सीतेकडे बघीतले, त्या डोळ्याचा भेद हा बाण करेल. यापुढे कावळ्याला एकच डोळा असेल.’ असे प्रभू म्हणाले, आणि क्षणात रामबाणाने त्या डोळ्याचा वेध घेतला. तेव्हापासून कावळा एकाक्ष झाला.
सत्ययुगात सीतामाईचे खंबीरपणे रक्षण करणारे प्रजेचे राजा रामचंद्र होते, म्हणून त्यावेळी रामराज्य होते. मात्र या कलियुगातील लोकशाहीत, जनतारूपी सीतामाईच्या रूपात वावरणाऱ्यांवर, हे अलिकडचे विकृती असलेले, हिंस्र बनलेलेले कावळे जेव्हा तिच्या अब्रूवर उठतात, तिच्या दु:खावर चोच मारत, तुटून पडत, मरणप्राय वेदना देतात, तेव्हा रामाच्या रूपात, तिची अब्रू वाचवायला, या कलीयुगात कोण येणार, हा प्रश्नच आहे.
— या कलियुगातील एकाक्षांचा दुसरा पण डोळा, रामबाणाने फोडायला हवा !
© ॲड. माधव भोकरीकर

28.2.2020

No comments:

Post a Comment