Sunday, May 10, 2020

हिरण्यकश्यपूचा काळ - भगवान नरसिंह !

हिरण्यकश्यपूचा काळ - भगवान नरसिंह !
आज वैशाख शुद्ध १४ म्हणजे नृसिंह जयंती ! पंचांगात सहज बघीतले, आणि एकेक आठवायला लागले.
लहानपणी आपणा प्रत्येकाचे कायकाय समज असतात नाही. त्याची सुरूवात होते, ती लहानपणी ऐकलेल्या देवादिकांच्या गोष्टीपासून ! आमची सप्तश्रृंग देवी ही कुलदेवता, त्यामुळे अश्विन महिन्यात, प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत देवीचे नवरात्र ! अठरा हातांची ही देवी, तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळे शस्त्र आणि ही शस्त्रे घेऊन सिंहावर बसलेली ! हे ऐकल्यावर समोरच्या शत्रूचे काय होणार, हे सांगायला मोठं होण्याची पण आवश्यकता नव्हती. त्यांत पाहुण्यारावळ्यांचा राबता ! अहो, माणसांचाच नाही, तर देवांचा पण ! तुळजापूरची भवानी माता आणि तिरुपतीचे बालाजी, हे पण आमच्याकडे पाहुणे ! आता इतकी सगळी मंडळी असल्यावर, आपली तर त्यावेळी अक्कलच चालत नव्हती. त्यामानाने काहींकडे मर्यादापुरूषोत्तम प्रभू रामचंद्राचा चैत्रातील रामनवमीचा उत्सव, काहींचा गोकुळ अष्टमीला कृष्णजन्माचा उत्सव, हे तुलनेने मिळमिळीत वाटायचे. त्यांचे चरित्र वाचल्यावर आणि थोडे समजायला लागल्यावर, त्यांचे महत्व समजले.
भगवान विष्णुच्या दशावतारापैकी मत्स्य, कत्स्य, वराह या अवतारांचा माझ्यावर तसा काही फार परिणाम व्हायचा नाही. वामन, परशुराम, राम व कृष्ण यांच्याबद्दल थोडे अप्रूप वाटायचे. मात्र नरसिंह अवताराबद्दल माझी भावना, अजूनही दबकलेली आहे. कारण वरून कडकडीत उन्ह तापतंय, त्यांत देवीचे आणि सोबत रामाचे पण चैत्राचे नवरात्र, ते होत नाही तर ‘महारुद्र हनुमान जयंती’ ! त्यानंतर लगेच भगवान परशुराम जयंती आणि जरा काही सुटकेचा निःश्वास टाकावा, तोच हे नरसिंहाचे नवरात्र ! वणव्यासारखे उन्ह असलेल्या काळात, या ‘हातात अग्नि धरणे शीतल’ अशा देवतांचे उत्सव येतात.
भगवान नरसिंहाचे अर्धे वरचे शरीर सिंहाचे आणि अर्धे खालचे शरीर माणसाचे, म्हणजे चेहरा व पंजे सिंहाचे, आणि बाकी शरीर मानवाचे ! आता या अवताराशी कसे वागावे, आणि त्याची प्रार्थना तरी कशी करायची, हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न असे. माझ्या पहाण्यात तीन ठिकाणीच नरसिंहाचे नवरात्र मी ऐकलेले, एक म्हणजे आमच्या गांवातीलच, आमचे जुने संबंधीत श्री. रावेरकर ! बाहेरगांवातील म्हणायचे, तर वरणगांवात एकदा गेलो होते, तिथे त्यांच्याकडे नरसिंहाचे नवरात्र होते, आणि अजून म्हणजे सावद्याला असलेले, श्री. मटकरी यांचे नरसिंहाचे मंदीर पण आहे. यांचे पण जुने संबंध ! आता अलिकडेच औरंगाबादला नव्याने मिळालेले शेजारी, श्री. बालकिशन जोशी, हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचे ! यांच्याकडे पण हे नवरात्र असते. वैशाख शुद्ध षष्ठी ते चतुर्दशी असे हे नवरात्र ! याची कथा जरा निवांतपणे वाचली, ती भागवत वाचले त्यावेळी !
कश्यप ऋषींना, त्यांची पत्नी दितीपासून दोन पुत्र झाले, ‘हिरण्याक्ष’ आणि ‘हिरण्यकश्यपू’ या नांवाचे ! अत्यंत उच्छाद मांडलेल्या या पुत्रांपैकी, ‘हिरण्याक्ष’ याला भगवान विष्णुनी ‘वराह अवतार’ घेऊन मारले. यामुळे हिरण्याक्षाचा भाऊ, हिरण्यकश्यपू हा स्वाभाविकपणे अत्यंत दु:खीत झाला आणि संतापला, परिणामी भगवान विष्णुला तो आपला शत्रू मानू लागला. आपल्या भावाच्या मृत्यूचा सूड घ्यायचाच, या उद्देशाने त्याने अजेय होण्यासाठी तपश्चर्या सुरू केली.
खूप वर्षे तपश्चर्या केल्यावर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले, आणि त्यांनी त्याला ‘तू अजिंक्य होशील’ असा वर दिला, मात्र त्याचा तपशील सांगतांना, ‘तुझा मानव अथवा पशु, दिवसा अथवा रात्री, घरात अथवा बाहेर, शस्त्राने अथवा अस्त्राने, आकाशात अथवा पृथ्वीवर कोणी वध करू शकणार नाही’ हे स्पष्ट केले. त्यामुळे ‘आपल्याला आता मृत्युचे भय बाळगण्याचे कारण नाही’ या भावनेने, अजूनच चेकाळत, त्याने स्वर्गावर आक्रमण करून, तिथे आपली सत्ता स्थापन केली. तेथील देवदेवता, लोकपाल यांना हाकलून लावले.
यानंतर तर त्याच्या अत्याचाराला सीमाच राहिली नाही, त्याने भगवंताच्या भक्तांवर पण अत्याचार सुरूच ठेवले. त्याला मुलगा झाला, त्याचे नांव ‘प्रल्हाद’ ! हा मात्र महान भगवद्भक्त, भगवान विष्णुभक्त निघाला. स्वत:च्या मुलाला, प्रल्हादाला मारण्याचा असंख्य वेळा प्रयत्न करणारा हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी, आणि आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णुला नरसिंहाचा अवतार घ्यावा लागला.
आपला मुलगा प्रल्हादाच्या भगवद्भक्तीमुळे क्रोधित झालेला हिरण्यकश्यपू, त्याला विचारतो, ‘बोल, तुझा देव कुठे आहे ? इथे आहे ? तिथे आहे?’
‘तो सर्वश्रेष्ठ आहे, सर्वत्र आहे. प्रचंड आहे, अतिसूक्ष्म आहे’ या प्रल्हादाच्या उत्तरावर खवळलेल्या हिरण्यकश्यपूने, तेथील खांबाकडे निर्देश करत, ‘यांत आहे ?’ हे विचारल्यावर प्रल्हादाने होकार दिला.
‘मग तो माझ्यासमोर या खांबातून का येत नाही ?’ असे म्हणत हिरण्यकश्यपूने तो खांब तोडला, उध्वस्त केला. आणि मग त्यातून प्रचंड सिंहगर्जना करत, गुरगुरत भगवान विष्णु नरसिंहाच्या अवतारात बाहेर आले.
त्याचे रूप बघीतल्यावर ना त्याला मानव म्हणता येत होते, ना पशू ! संध्याकाळच्या वेळी हा अवतार झाल्याने, त्यावेळी दिवस संपला होता, मात्र रात्र झाली नव्हती. त्याने प्रासादाच्या उंबऱ्यावर हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतले, ते मारण्यासाठी ! उंबऱ्यावर म्हणजे घराच्या आंत नाही, किंवा बाहेर नाही. मांडीवर असल्याने आकाशात नाही आणि जमिनीवर नाही. शेवटी आपल्या पंजाची नखे पोटात खुपसली आणि त्याचा प्राण घेतला. नखांचा वापर म्हणजे अस्त्र नाही आणि शस्त्र पण नाही.
भगवान विष्णुला ब्रह्मदेवांनी दिलेल्या वराचे पालन करूनच हिरण्यकश्यपूला मारायचे असल्यानेच, तसा नरसिंहरूपी अवतार घ्यावा लागला. त्या अवतार प्रगटीकरणाच्या वेळी, भगवान नरसिंह इतके क्रोधायमान झाले होते. साक्षात त्यांच्या परमभक्ताला, प्रल्हादाला त्याची प्रार्थना करावी लागली, तरी तो क्रोध शांत झाला नाही. सर्व प्राणीमात्रांचा संहार होतो, की काय, अशी अवस्था झाली. सर्व देवदेवता भयभीत होत, ब्रह्मदेवाला शरण गेले. नंतर हे सर्व जगाचे पालनकर्ता विष्णुला शरण गेले, आणि आपण घेतलेल्या नरसिंहरूपी अवताराने शांत व्हावे, ही प्रार्थना केली; तरी भगवान विष्णुने आपली असमर्थता व्यक्त करून, त्यांचे आराध्य दैवत भगवान शंकराकडे जाण्यास सांगीतले. हे सर्व भगवान शंकराकडे गेले. तोपर्यंत नरसिंह अवतारातील क्रोधाची परिसीमा गाठली होती. भगवान ब्रह्मदेव आणि शंकर सर्व देवदेवतांसहीत नरसिंहरूपी अवतारास, त्यांनी शांत व्हावे म्हणून प्रार्थना करण्यास गेले, तर त्यांच्यावरच नरसिंह गुरगुरत चालून आले.
त्यावेळी भगवान शंकराने एका विशाल वृषभाचे रूप घेतले, आणि नरसिंहरुपी अवताराला आपल्या शेपटीत गुंडाळून पाताळलोकी घेऊन गेले. आपल्या बऱ्याच प्रयत्नानंतर पण आपल्याला शेपटीतून सुटतां येत नाही, हे पाहून थकून त्यांनी, वृषभ रुपातील शंकराला ओळखले, आणि नरसिंहाचा क्रोध शांत झाला. त्यानंतर ब्रह्मदेव व विष्णु यांच्या आग्रहाने नरसिंहरुपी अवतारास मुक्त केले. त्यावेळी भक्त प्रल्हादास आणि तेथील भक्तांना सर्व देवदेवतांसहीत या दोन्ही अवतारांचे दर्शन झाले.
नरसिंह अवतारास मानणारे आणि त्यांचा भक्तसंप्रदाय हा वैष्णव संप्रदाय मानला जातो, आणि तो मुख्यत: दक्षिण भारतात जास्त आढळतो. यांची नांवे म्हणजे नरसिंह, नरहरि, उग्रवीर महाविष्णू, हिरण्यकश्यपूअरी अशी सांगता येतील.
नरसिंहाचे दहा भाव आपणांस उग्र नरसिंह, क्रोध नरसिंह, मलोल नरसिंह, ज्वल नरसिंह, वराह नरसिंह, भार्गव नरसिंह, करन्ज नरसिंह, योग नरसिंह, लक्ष्मी नरसिंह आणि छत्रावतार नरसिंह किंवा पावन नरसिंह किंवा पमुलेत्रि नरसिंह असे सांगता येतील.
आपल्या भारतातील भगवान नरसिंहाची प्रसिद्ध मंदीरे सांगावयाची तर, ती उत्तरप्रदेशातील मथुरा येथे, पश्चिम बंगालमधील मायापूर येथे, बिकानेर येथे, हाटपिपलिया येथे, बनमनखी येथे, जबेरा येथे आहेत. तसेच तेलंगणामधील भद्राचलम आणि यादगिरूगुट्टा येथे, आंध्रप्रदेशमधील मंगलागिरी येथील व सिंहचलम आणि अहोबिलम येथील, कर्नाटकातील नरसिंह झरणी गुहेतील मंदीर आणि मेळकोट येथील, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील श्रीलक्ष्मीनरसिंह मंदीर, तामिळनाडूतील नरसिंहस्वामी, केरळमधील लक्ष्मीनरसिंह मंदीर, राजस्थानातील नरसिंगजी नरसिंह मंदीर आहेत.
नरसिंह मंत्र
ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम्। नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमृत्युं नमाम्यहम् ॥
नरसिंह स्तवन
प्रहलाद हृदयाहलादं भक्ता विधाविदारण। शरदिन्दु रुचि बन्दे पारिन्द् बदनं हरि ॥१॥
नमस्ते नृसिंहाय प्रहलादाहलाद-दायिने। हिरन्यकशिपोर्बक्षः शिलाटंक नखालये ॥२॥
इतो नृसिंहो परतोनृसिंहो, यतो-यतो यामिततो नृसिंह। बर्हिनृसिंहो ह्र्दये नृसिंहो, नृसिंह मादि शरणं प्रपधे ॥३॥
तव करकमलवरे नखम् अद् भुत श्रृग्ङं। दलित हिरण्यकशिपुतनुभृग्ङंम्। केशव धृत नरहरिरुप, जय जगदीश हरे ॥४॥
वागीशायस्य बदने लर्क्ष्मीयस्य च बक्षसि। यस्यास्ते ह्र्देय संविततं नृसिंहमहं भजे ॥५॥
श्री नृसिंह जय नृसिंह जय जय नृसिंह। प्रहलादेश जय पदमामुख पदम भृग्ह्र्म ॥६॥
© ॲड. माधव भोकरीकर
(पोस्ट आवडल्यास आपण शेअर करू शकतात.)

6.5.2020

No comments:

Post a Comment