Sunday, May 10, 2020

आज पुस्तक दिन !

आज पुस्तक दिन !
शाळेत जायला लागल्यावर पाठ्यपुस्तके तर आणावीच लागतात, तुमची इच्छा असो किंवा नसो. त्याचा अभ्यास करावाच लागतो. पुढच्या वर्गात जायचे असते ना ? अभ्यास जर चांगला असेल, तर परिक्षेत काही लिहीता येते. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवून पुढच्या वर्गात जाता येते. थोडे अभिमानाने पण मिरवता येते.
मात्र पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचन करायला लावणारे पालक आणि शिक्षक असले, की हळूहळू गोडी लागते वाचनाची. मी पहिलीमधे असतांना आईने जळगांवच्या नेवे बुक डेपोमधून आणलेल्या, ‘तांबू गाय’ या पुस्तकाने वाचनाची सुरूवात झाली. दुसरीमधे वडिलांनी वैभव बुक्स आणि स्टेशनरी येथून पुस्तक आणले, ते जळगांवच्या शारदा प्रकाशनाचे ! नंतर मग विविध ठिकाणीहून काय आणायचे, हे कोणी विचारले तर माझे उत्तर ठरले असायचे - गोष्टींचे पुस्तक आणा ! सुटीत आजोळी गेल्यावर मामामावशींच्या वरच्या वर्गातील मराठी विषयांची पुस्तके समजत नसली तरी वाचली. आजीआजोबांजवळ बसून त्यांची धार्मिक पुस्तके बरीचशी त्यांच्याकडून ऐकली. पुस्तकांना नंतर कधी हात लावायला मिळायला लागला, तशी वाचली पण !
माझ्या आईच्या भाषेत सांगायचे, तर ‘हा पुस्तकातील किडा लायब्ररी उघडल्यापासून जो जातो, ते तिथल्या सोनूकाकांनी लायब्ररी बंद केल्यावरच येतो. रस्त्यावर अंधार असतो, एकटा येतो.’ या वेडापायी माझ्या नानाकाकांनी त्यांच्यासारखा कोणी आहे, हे पाहून मला लायब्ररीचे इयत्ता चौथीतच सभासद करून माझे वाचनाचे वेड अजून वाढवले.
शाळेत, सरदार जी. जी. हायस्कूल मधे माझ्या वर्गशिक्षीका सौ. कमल व्ही. पाटीलबाई या आठपंधरा दिवसांतून एकदा शाळेतल्या लायब्ररीमधील पुस्तके आवर्जून वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना द्यायचा. ना. धों. ताम्हणकर, अण्णाभाऊ साठे, द. मा. मिरासदार, पु. ल. देशपांडे, साने गुरूजी वगैरे ही देवघरातील मंडळी तेव्हापासूनच आमच्या परिचयाची झाली.
नूतन मराठा काॅलेजला आल्यावर तर काॅलेजची लायब्ररी मोठीच होती. आमच्या नांवावर तर पुस्तके मिळायचीच, याशिवाय कोणत्याही प्राध्यापकांच्या नांवाने पुस्तके घेण्याची मला मुभा होती. मात्र अभ्याचीच पुस्तके त्यांच्या नांवावर घेण्याचा नियम आम्ही पाळला.
लाॅ काॅलेजला जळगांवला तर प्राचार्य माथुरवैश्य सरांनी लायब्ररीयन देशपांडे यांना एकदाच बोलावून सांगीतले, की ‘या विद्यार्थ्यांना काय जी पुस्तके लागतील, ती द्या !’ नंतर तीन वर्षे काॅलेजची लायब्ररी जवळजवळ आमचीच होती.
आकाशवाणी, विविध स्पर्धांची बक्षीसे यांतून मिळणारे पैसे आम्ही ‘स्वकमाई’ समजायचो. आईवडिलांना त्यांच्या सर्वसाधारण परिस्थितीतही याचा आनंद असायचा ! त्या रकमेतून पण घेतली जायची काही पुस्तके !
वकीली सुरू केल्यावर, मुलांना कोर्टकामासाठीही गेलो, तरी पुस्तके आणावी वाटायचे. आणायचो पण ! विश्वकोष मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, नॅशनल बुक ट्रस्ट, गीता प्रेस गोरखपुर, चौखंबा प्रकाशन आणि अजूनही जिथून कुठून मिळतील, तिथून आणत गेलो. वाचत गेलो.
वकीली व्यवसायाची तर पुस्तके आणावीच लागतात, पोटापाण्याची व्यवस्था करायची तर ते आवश्यकच ! मात्र अलिकडे काही वर्षांत, विशेषत: औरंगाबादला आल्यावर, अवांतर वाचन तुलनेने कमी झालंय, कमी केलंय ! व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागतंय ! ती पुस्तके वाचावी लागतात ! —- परमेश्वरा काहीही कर, पण पुस्तक वाचण्याचा आनंद आयुष्यभर मिळू दे मला !

23.4.2020

No comments:

Post a Comment