Sunday, May 10, 2020

— पुरूषस्य भाग्यम् !

— पुरूषस्य भाग्यम् !
सध्या ‘कोरोनामुळे’ सक्तीने घरांत बसावं लागण्याच्या काळात, वाईट गोष्टी जशा झाल्यात, तशा काही चांगल्या गोष्टी पण नक्की झाल्या. त्यापैकी काही माझ्यासंबंधी सांगायच्या, तर अग्रक्रमाने, शांततेने आणि शिस्तीने माझे कोर्टासंबंधीचे प्रलंबीत काम सुरू आहे. त्यांत अर्थात नवीन कामांची तयारी, जुन्या कामातील राहीलेल्या बाबी, या जशा आहेत, त्याचप्रमाणे जी कामे निकाली निघाली आहेत, त्यांचे निकाल लागल्यानंतर त्याबद्दल काही करायचे, ते करणे; यांत आपल्याकडे फिरकली नाही, अशी पण काही मंडळी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधणे.
आमचा नेहमीचा अनुभव म्हणजे, ‘आपले काम न्यायालयांत लवकरात लवकर लागावे, बाकी इतर कोणाचीच कामे विशेष महत्वाची नसून, आपलेच काम कसे महत्वाचे आहे, म्हणून न्यायाधीशांनी फक्त आपलेच काम पहिले घ्यावे, मग भले इतरांची घेऊ द्या’, असे सांगणारे बहुसंख्य पक्षकार असतात; असे सांगतांना काही वेळा, तर ते त्यांचे तारतम्य पण सोडतात. इलाज नाही कोणाच्या स्वभावावर !
मात्र काही वेळा, विचित्र वाटतील अशा अविश्वसनीय, व दुर्दैवी पण घटना घडतात. न्यायालयाचा निर्णय बाजूने लागल्यानंतर देखील, त्या निर्णयाचा लाभ ते अजून घेऊ शकले नाही, त्यांना मिळालेला नाही, अशा पण काही घटना घडतात. आपल्या मनांत काहीवेळ कालवाकालव होते. मन सुन्न होते. आपल्या किंवा एखाद्याच्या नशीबाबद्दल, भविष्यांत काय वाढून ठेवले आहे, ते सांगता येत नाही कोणाला ! जीवनातील संकटांना, समस्यांना, काही जण समर्थपणे तोंड देतात, त्यांवर मात करतात. मात्र सर्वांच्या बाबतीत हे घडत नाही. काही तर संकटाशी लढण्याची ताकद संपल्याने, मधेच कोलमडून पडतात, मग त्याला भेडसावणारे हे संकट, त्याच्याच घास करते ! एखाद्याची तर बिचाऱ्याची अशी अवस्था असते, की आपण संकटात आहो, त्याचे परिणाम काय, हे समजण्याचे पण त्याचे वय नसते ! बाल्यावस्थेत असलेले लेकरू, काय समजत असते त्याला ? ना संकट नीट समजते, ना त्यावरचा उपाय ! आपल्या मातेबरोबर रहायचे, आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे चालायचे, एवढेच समजते. बिचारा फक्त चालत असतो, आईसोबत, आपल्या जीवनाची वाट, ती असेपावेतो ! दूर कुठेतरी प्रकाशाची तिरीप दिसेल, का नाही, याची पण जाण नसते त्याला !
परवा असाच काम करत बसलो असतांना, काॅम्प्युटरमधील माहितीत, माझी जुनी कामे बघत होतो. एक नोंद दिसली. केसचा निकाल आमच्या बाजूने कधीचाच, सातआठ महिन्यांपूर्वी झाला होता. मी खालच्या कोर्टातील वकीलांना, लगेच कळवले होते, पण तरी पक्षकारांपैकी कोणीही संपर्क साधला नव्हता. मन चाळवले आणि ती केस आठवायला लागली.
आपल्या राहत्या गांवात आपले पोट भरायला अडचण येऊ लागली, की मग माणूस जगायला गांव सोडतो, अगदी मुलाबाळांसहीत ! त्यानंतर त्याची अपेक्षा असते, की नवीन गांवी, आपले बरे व्हावे, पुन्हा परत जायला नको. अर्थात त्याच्या मूळ गांवात, त्याची काही मुळे असली, तरच हा प्रश्न येतो, नाही तर ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ या अवस्थेत, तो कसे तरी दिवस काढतो.
घटना एका छोट्या गांवची ! असाच एका गांवातील, हा धडपड्या माणूस थोडाफार शिकला, आपलं पोट भरायला जिल्ह्याच्या गांवात आला. नोकरी लागली. बघताबघता काही वर्षे गेली, आयुष्याला स्थैर्य आलं. जम बऱ्यापैकी बसला ! त्याचा संसार तसा नेटका, पत्नी आणि दोन मुले ! मोठा मुलगा आठवीत असेल, तर लहान पहिली दुसरीत ! सुरळीत सुरू असलेलं त्याचं आयुष्य, त्याच्या नशिबाला काही बघवलं नाही. सटवाईने आपल्या कपाळी लिहीलेले भविष्य ते खोटं, थोडीच ठरणार ?
तो दिवस उजाडला. हा काही कामाला मोटारसायकलवर आपल्या गांवी निघाला. तिथं पोहोचला. काम आटोपलं आणि मग आपल्या गांवाहून जिल्ह्याच्या गांवी परत निघाला. रस्त्यातून तुम्ही शांततेने, नियम पाळून वाहन चालवत असाल, म्हणजे अपघात होणार नाही, असे नाही; कारण समोरचा पण तसाच हवा ! तसेच झाले, हा आपल्या मोटार सायकलने जात होता, रस्त्यावर त्याच्या पुढे अजून एक मारोती होती व त्या पाठोपाठ एस् टी बस होती. समोरून येणाऱ्या टॅंकरने वेडेवाकडे येऊन पहिले मारोतीला, नंतर एस् टी ला आणि नंतर याच्या मोटार सायकलला जोरात धडक दिली. मारोतीचे जास्त नुकसान, एस् टी चे तुलनेने कमी आणि याला तर चेंडूसारखा उडवला ! मरणासन्न अवस्थेत याला, एका चांगल्या दवाखान्यात दाखल केले, पण उपयोग झाला नाही. त्याने हे जग कायमचे सोडले. एस् टी ड्रायव्हर याने व्यवस्थित तक्रार दिली. पोलिसांनी त्यांचे नित्याचे सोपस्कार पूर्ण केले, मात्र त्यामुळे एका क्षणात या जगात, उघडे पडलेल्या त्याच्या पत्नीला आणि दोन मुलांना, हा परत मिळणार नव्हता, ही काळ्या दगडावरची रेघ होती !
काळ काही कोणासाठी थांबत नाही. मुलं शिकत होती. मात्र आता घरातील कमावता माणूस गेला होता. नातेवाईकांनी त्यांना काय शक्य होते ते केलं, असंच म्हणायचं; कारण अशावेळी कोणाला फार काही करता येत नाही, आणि करायचं पण नसतं ! जेमतेम बरं चाललेलं असतांना, हा अचानक आलेला आघात सोसण्याची ताकद, त्यांच्याकडे स्वाभाविकच नव्हती. अपवादानेच असते कोणाकडे ! चार जणांनी सांगीतले, त्याप्रमाणे अपघात नुकसानभरपाई मिळावी, म्हणून त्यांनी न्यायलयाचे दार ठोठावले. अपघातातील मृत्यूची घटना असल्याने, थोडी रक्कम ही तात्पुरती म्हणून नुकसानभरपाई मिळाली. साधारणत: पाच वर्षांनी न्यायालयाचा अंतीम निर्णय लागला, कायद्यानुसार त्याच्या वारसांना नुकसानभरपाई मिळावी, असा आदेश झाला. दरम्यानच्या काळांत या कुटुंबाची अवस्था अडचणीचे होणे, हे स्वाभाविक आहे.
खालील न्यायालय हे अंतीम नसते, त्याची दाद वरच्या न्यायालयांत मागता येते. त्या निकालपत्रातील काही मुद्दे, हे विमा कंपनीला योग्य व कायदेशीर न वाटल्याने, त्यांनी त्या निर्णयाविरूद्ध नामदार उच्च न्यायालयांत अपील केले. तिथं खालच्या न्यायालयाने दिल्याप्रमाणे सर्व रक्कम भरून, विमा कंपनीने त्या निर्णयावर स्थगिती मिळवली. याची नोटीस उच्च न्यायालयाकडून याच्या वारसांना मिळाल्यानंतर, त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्या कामांत यांच्यावतीने मी हजर झालो. मी संबंधीत वकीलांशी बोललो. त्यांतील तथ्य लक्षात आले. नुकसानभरपाई खालच्या न्यायालयाने कमी दिली आहे, यांत वाढ होऊ शकेल, हे मी त्यांना सांगीतले.
मात्र वारसांच्याकडून सूचना आली, विमा कंपनी यांनी भरलेली रक्कम मिळावी, म्हणून प्रयत्न करावा. अशी आशा व इच्छा प्रत्येकालाच असते, ‘आपल्याला सर्व रक्कम मिळायला हवी, मग केस कितीही वर्षे चालू द्या’ असे थोडक्यात पक्षकाराचे, आणि त्यापेक्षा पण त्याच्या तथाकथित हितचिंतकांचे सल्लारूपी सांगणे असते. यांतून त्यांची हुशारी दिसत नाही, तर लोभीपणा दिसतो. न्यायालयाला दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते, मगच निर्णय देता येतो. या गोंधळात, माझी
या कामांत सुरूवातीला, कागदपत्र बघीतल्यावर कायद्यातील तरतुदीनुसार, यांची नुकसानभरपाईची रक्कम वाढू शकते, हा सल्ला बाजूला पडला. एखादी गोष्ट काही पक्षकाराला पुन्हापुन्हा सांगावी, का नाही, हे त्याच्या वर्तनावर अवलंबून असते. पक्षकार सरळ पण अज्ञानी असला, तर सांगीतल्यावर ऐकतो; मात्र लबाड व अज्ञानी असेल, तर आपल्याशी डावपेच खेळण्याचा प्रयत्न करतो. त्याकडे दुर्लक्ष केलेले चांगले असते, कारण त्यांच्या मूर्खपणांत आपला वेळ जातो, ते परवडत नाही. एखाद्यावर निरपवादपणे विश्वास ठेवणाऱ्याची जबाबदारी, जो विश्वास न ठेवता, दहा जणांना विचारत असतो, त्याच्या तुलनेने जास्त असते. असो.
उच्च न्यायालयांत विमा कंपनीच्यावतीने जे मुद्दे उपस्थित केले होते, त्यांत तथ्य वाटल्याने, न्यायालयाने कंपनीने भरल्यापैकी सर्व रक्कम न देता, त्यातील काही रक्कम यांना जामीनावर देण्याचा आदेश केला. मात्र दुर्दैवाने यांना कोणाही नातेवाईकांचा, यासाठी जामीन मिळाला नाही. त्यामुळे न्यायालयाचा आदेश जरी असला, तरी रक्कम काढता आली नाही. हे सर्व बघून, मग संपूर्ण अपील लगेच चालवावे, ही विनंती केली, ते न्यायालयाने मान्य केले. अपील अंतीम चौकशीला लागले. दरम्यान त्याच्या काॅलेजमधे शिकणाऱ्या मुलाची जीवनयात्रा संपली, का ही येणारी संकटे सहन न होऊन, त्याने स्वत: संपवली, देव जाणे ! तो एक आघात त्या माऊलीवर झाला. अपील यामुळे थोडे लांबले. अपील चालले. निकाल बाजूने झाला. हे खालील न्यायालयाचे काम चालविणाऱ्या वकीलांना कळवले, आणि माझ्या डोक्यातून हा विषय निघून गेला.
परवा तेथील वकीलांना फोन केला, तर उच्च न्यायालयांत अपील केल्यानंतर, एकदोनदा त्यांची भेट झाली होती. अलिकडे काही महिन्यांत त्यांना कोणीही भेटले नव्हते. मात्र सोबत अजूनच एक वाईट समजले, की त्याची पत्नी पण वारली. जिल्ह्याचे ठिकाण तर त्यांना, कधीचेच सोडावे लागले होते. एक बहुदा अजूनही अज्ञान असलेला आईवडिलांविना मुलगा आहे, तो कुठल्याशा नातेवाईकांकडे असल्याचे त्यांना समजले !
दुर्दैव एखाद्याच्या मागे कसे हात धुवून लागते. याचे हे उदाहरण ! —- पुरूषस्य भाग्यम्, देवो न जानापि, कुतो मनुष्य: ! हे अशा स्वरूपात अनुभवायला यावे ?
© ॲड. माधव भोकरीकर

14.4.2020

No comments:

Post a Comment