Sunday, May 10, 2020

हनुमान जयंती - बलोपासना, बुद्धी, स्वामीनिष्ठा आणि भक्ती !



हनुमान जयंती - बलोपासना, बुद्धी, स्वामीनिष्ठा आणि भक्ती !
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥
लहानपणापासून हा श्लोक माझ्या कानावर पडतोय ! चिरंजीव, म्हणजे काय, तर थोडक्यांत यांना आपण सर्वांसारखे मरण नाही, फक्त जन्म आहे ! जगद्गुरू श्रीमतआद्यशंकराचार्य यांनी आपल्या स्तोत्रातील 'पुनरपि जननं पुनरपि मरणं,पुनरपि जननी जठरे शयनम्। इह संसारे बहुदुस्तारे,कृपयाऽपारे पाहि मुरारे ॥' हे आपल्या सर्वांना लागू असलेले तत्व इथं, या सप्त चिरंजीवांना लागू पडत नाही !
या सप्त चिरंजीवांच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे, तर प्रत्येक चिरंजीवाच्या स्वभावाचे एकेक वैशिष्ट्य आहे. त्यातील महाबली हनुमानाचे वैशिष्ट्य, जे मला जाणवले, ते म्हणजे जगाला आपल्या ताकदीच्या बळावर चिरडून टाकण्याची असलेली शक्ती आणि आपल्या बुद्धीच्या वैभवाने, बुद्धिमतां वरिष्ठ' असे मिळवलेले स्थान ! हनुमानाची आपल्या विचाराप्रती आणि स्वामीप्रती असलेली कमालीची भक्ती आणि निष्ठा ! त्यापेक्षाही अजून महत्वाचे म्हणजे, आपल्या 'बुद्धिमतां वरिष्ठ' असलेल्या बुद्धीचा योग्य आणि समाजहितकारक उपयोग करून, आपला स्वामी कोण असावा, आपण आपली निष्ठा कोणाप्रती वहावी, आपण भक्ती करावी ती कोणाची, याचे आकलन झाल्यावर, त्यांच्याप्रती आपली सेवा अर्पण करणे, हे सेवकाचे कार्य आहे. प्रभू रामचंद्रासारखे कर्तृत्व दिसावयास हवे असेल, तर त्यांना महाबली हनुमानासारखा सेवक मिळावयास हवा, आणि आपली सेवा अर्पण करायची, तर त्यासाठी योग्य स्वामी कोण असावा, तर प्रभू रामचंद्रासारखा असावा, त्यावेळीच दोघांच्या या अलौकिक गुणांचे दर्शन होते.
आपल्या स्वामीला जेंव्हा, हनुमानाला विचारावेसे वाटले, 'हनुमंता, त्या सीतेने दिलेल्या हारातील प्रत्येक मण्यांत काय फोडून पाहतोय ? पृथ्वीमोलाचा हा हार, तुला दिला आणि त्याचे मणी फोडून, तो तू व्यर्थ घालविला.'
'प्रभू, ज्यांत माझे स्वामी मला दिसत नाही, ती वस्तू घेऊन मी काय करू ?' हनुमानाचे हे उत्तर ! हे उत्तरच खूप बोलके आहे.
'बुद्धिमतां वरिष्ठ' असलेल्या हनुमानानाला चराचरांत प्रभू रामचंद्र आहे, याची कल्पना नव्हती का ? अवश्य होती. मात्र स्वामिभक्तीची परीक्षा जेंव्हा असते, आणि त्यांत आपल्याला उत्तीर्ण व्हावयाचे असेल, तर त्यावेळी त्यातील अर्थ हा 'वाच्यार्थ' घ्यावयाचा, हे पण तत्व त्याला माहीत होते. कारण - चराचरांत जर प्रभू रामचंद्र आहे, तर ते विभीषणांत आहे, कुंभकर्णांत आहे आणि रावणांत देखील आहे. मग रावणाकडे गेले काय आणि रामचंद्राकडे असले काय, त्यांत फरक का करायचा ? असे चमत्कारिक काहीतरी विचारले गेले असते, आणि त्याचे स्पष्टीकरण पण द्यावे लागले असते.
खरोखर हे सप्त चिरंजीव आहेत का ? कोणी बघीतले आहेत ? वाटेल ते खोटे सांगू नका, जे बघीतले आहे, जे दिसते आहे, त्यावरच विश्वास ठेवा. जे बघता येत नाही, जे कोणाला दिसत नाही, त्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही; अशातऱ्हेचे 'प्रागतिक विचार' देखील काही जण मांडतील. जगांत ज्या गोष्टी दिसत नाही, त्याचे अस्तित्व नाकारायचे, असे मानणे, हे आपले अज्ञान आहे. आपल्याला दिसत नाही, म्हणजे या जगांत नाही, असे नाही, आपल्याला जगातील सर्वच दिसते, हा देखील आहे. सत्य हे आहे की, आपली जगातील विविध वस्तू, गोष्टी बघण्याची जेवढी क्षमता आहे तेवढ्याच बाबी आपल्याला दिसतात. जितक्या वस्तूंच्या अस्तित्वाचे अनुभव, आपण घेऊ शकत असू, जितकी आपली क्षमता आणि ताकद असेल ! त्यामुळे काही गोष्टी, वस्तू आपल्याला दिसत नसतील, काहींचे अनुभव आपल्याला येत नसतील, तेंव्हा तर ते आपल्या दृष्टीने भलेही नसेल ! मात्र त्यांचे अस्तित्व सर्वांच्या दृष्टीने नाही का, असा विचार केला तर, याचे उत्तर नक्कीच नकारार्थी आहे.
ज्या सात चिरंजिवांच्या प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण स्वभावाची ही उदाहरणे आहेत. त्यातील एकेक स्वभावाचा अभ्यास करावा. महाबली हनुमानाच्या बलोपासनेच्या वृत्तीचे, तसेच त्याच्या स्वामिनिष्ठ आणि स्वामिभक्तीचा गुणाचे, आजच्या दृष्टीने कोणाला कितपत महत्व वाटेल, ते सांगता येणार नाही. आज क्षणोक्षणी स्वामीभक्ती, स्वामीनिष्ठा गहाण ठेवणारी पिढी, आपण पहात आहोत. या अत्यंत धरसोडवृत्तीला हुशारी म्हणण्याच्या काळांत, महाबली हनुमानासारखा अडचणींचा सेवक, कोणाला कितपत रुचेल ते सांगता येणार नाही. तरीदेखील या सप्तचिरंजीवांपैकी आपल्याला आवडेल असा कोणता गुण, आपल्यात आणता येईल याचा या आजच्या हनुमान जयंती निमित्ताने विचार करावा.
आजच्या हनुमान जयंतीच्या दिवशी आपण सर्वांनी एकच प्रार्थना करावी -
मनोजवं मारुततुल्यवेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।

8.4.2020

No comments:

Post a Comment