Sunday, May 10, 2020

आताच श्री. विद्याधर जोशी यांची त्यांच्या विद्यार्थ्याबद्दल , अथर्व कुलकर्णीबद्दलची पोस्ट वाचली. मला माझे शालेय आणि महाविदयालयीन काळातील, खूप शिक्षक डोळ्यांपुढे आले.
मुलगा जेव्हा छोटा असतो, तेव्हापासून त्याच्या डोळ्यांसमोर त्याचे आदर्श असतात. त्या आदर्शासारखे वागण्याचा त्याचा प्रयत्न असतो. बालवयांत त्याचे आदर्श आई-वडील, आजी-आजोबा व घरातील माणसे असतात. त्यांचे ऐकायचे, त्यांच्यासारखे वागायचा त्याचा प्रयत्न असतो. त्यांनी, त्यांचे काही काम केल्यावर शाबासकी दिली, की ब्रह्मानंद होतो. त्यांना कोणी वाईट म्हटले, की हा त्यांच्याशी त्याच्या कुवतीप्रमाणे भांडतो, मोठ्याने भोकाड पसरतो किंवा कट्टी घेतो. मग याची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, की आपला विजय झाल्याच्या आनंदात, कट्टीची बट्टी किंवा बो होते.
त्यानंतर हा शाळेत गेल्यावर तेथील शिक्षक, शिक्षिकांच्या वागण्याचा परिणाम याच्यावर होतो. त्यांचे वर्तन शिकवणे चांगले असेल, तर याला चांगले वळण लागण्याची शक्यता वाढते, अन्यथा चुकीची दिशा पण तो पकडू शकतो. शाळेत गेल्यावर केवळ शिक्षक वा शिक्षिका यांचाच विद्यार्थ्यांवर परिणाम होतो, असे नाही; तर तेथील कारकून, शिपाई, त्यांच्यासोबत असणारे विद्यार्थी यांच्या पण वागण्याचा परिणाम होत असतो. इतकेच नाही, तर शाळेबाहेर असलेले दुकानदार जिथे हा अधूनमधून का होईना, पण जात असेल, त्यांचा पण परिणाम त्याच्यावर होतो. ओल्या मातीच्या गोळ्यासारखी याची अवस्था असते, त्यातून तुम्ही पणती बनवू शकतात वा माठ बनवू शकतात.
शालेय शिक्षण संपवून, हा महाविद्यालयांत गेला, की याच्यावर बऱ्यापैकी संस्कार झाले असल्याने, तुलनेने नंतर कमी बदल होतो; मात्र या वयापर्यंत त्याला अनुभव आल्याने, भल्याबुऱ्याची थोडीफार समज आली असते. त्यामुळे त्याला अगोदरच्या चुका त्याच्या लक्षात आणून दिल्या, त्या त्याला समजल्या, तर त्यात तो बऱ्यापैकी सुधारणा पण करू शकतो.
मी नूतन मराठा काॅलेजला बी. काॅम. केले. तेथील प्राचार्य डाॅ. सोनवणे, प्रा. वाघ, प्रा. एस्. वाय्. पाटील, प्रा. सौ. शकुंतला साळुंके, प्रा. भावसार, प्रा. बी. बी. देशमुख, प्रा. लाहोटी अगदी यांचाच नाही, तर सर्वांचाच माझ्यावर लोभ होता. कोणाच्याही नांवावर अभ्यासाचे पुस्तक घ्यायला मला नेहमीच परवानगी असायची. काॅलेजमधील स्टाॅफकडून पण नेहमी सहकार्यच असायचे. कोणत्याही स्पर्धेसाठी, विशेषत: वक्तृत्व वा वादविवाद, तर आम्ही कधीही नकार ऐकला नाही. स्टाॅफमधील श्री. महाडीक यांनी तर एकदा, स्टाॅफकडून पैसे गोळा करून स्पर्धेसाठी पाठविले होते. आम्ही बक्षीसे पण बऱ्यापैकी आणायचो, हा पण एक मुद्दा होता. मी आणि आम्ही काही मित्र जवळपास दिवसभर काॅलेजवर असायचो.
मी टी. वाय्. बी. काॅम. च्या वर्गात होतो. दुपारची वेळ होती. काॅलेजचे तास केव्हाचेच संपले होते. आम्ही मित्रमंडळी वर्गासमोरच ग्राउंडवर बाजूला कोपऱ्यात उभे होतो. तिकडून प्रा. शेखर सोनाळकर आणि प्रा. विवेक काटदरे हे आले. आमच्याकडे पाहून हसले.
‘पिरीयडस् नाही आता, मग काय करत आहात ?’ प्रा. सोनाळकर.
‘नाईक सरांकडे अकाउंटन्सीच्या क्लासला गेलो होतो, तो आटोपला. घरी जाता जाता, थांबलो इथे. थोड्यावेळाने जाऊ घरी’. मी.
‘तुम्हाला आम्ही काॅलेज असो वा नसो, पण इथेच जास्त वेळ बघतो. आता पुढच्या वर्षी काही तुमचे काॅलेज नाही. कसं होणार तुमचं ?’ प्रा. सोनाळकर. सरांच्या त्या एका प्रश्नांत किती प्रश्न होते ? आम्हाला क्षणभर काही बोलता आले नाही. गप्प रहाण्यासारखाच प्रश्न होता तो.
‘त्यांचे काॅलेज नसले, म्हणून काय झाले ? आपण तर आहोत ना इथं ! येतील ते !’ प्रा. काटदरे.
आणि खरं सांगतो, ही घटना सन १९८२ सालातील. मात्र आज पण आमच्या काॅलेजच्या कोणत्याही सरांशी माझे तेवढेच स्नेहाचे व आदराचे संबंध आहे, जेवढे त्यावेळी होते. आमच्या शिक्षकांनी आम्हाला कसलेही हातचे राखून न ठेवता भरभरून दिले, मग आपले विद्यार्थी म्हणून काम आहे, त्यांच्या शिकवण्याच्या बदल्यात आपण, त्यांना नंतर काय देतो ?
आपल्या आदर्शाला धक्का लागलेला सहन न होणे, ही बुद्धी प्रत्येकालाच उपजत असते, पुढे ती विकसीत होत जाते. अशावेळी आपल्याला काळजी एवढीच घ्यायची असते, की ती बुद्धी अतिरेकी व अंध समर्थनार्थ झुकायला नको. त्याचे विपरीत परिणाम अंतीमत: समर्थन करणाऱ्यालाच सहन करावे लागतात, भोगावे लागतात. आम्ही नशीबवान, आमच्या कोणत्याही आदर्शाला तडे गेलेले आम्हाला दिसले नाही. प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांचा आहे, की आम्ही त्यांच्या परिक्षेत कितपत उत्तरलो !
© ॲड. माधव भोकरीकर

27.1.2020

No comments:

Post a Comment