Sunday, May 10, 2020

स्क्रीनशाॅट आणि फेसबुकवरील पुराव्याचा कायदा !

स्क्रीनशाॅट आणि फेसबुकवरील पुराव्याचा कायदा !
काल संध्याकाळी असाच फेसबुक चाळत बसलो होतो. मी ‘Show me first’ किंवा यासारखे अजून काही, असे काही फेबुवर केलेले नाही. त्याचा एक लाभ असतो, रेडिओ ऐकतांना, पुढचे कोणते गाणे ऐकायला मिळेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे आपली उत्सुकता कायम रहाते. ती मजा टेपरेकाॅर्डर, डीव्हीडी, किंवा अलिकडच्या युट्यूबवर नाही.
माझा फेबुवर पूर्वी तासभर यांवर वाया (?) जायचा, तर आता त्यापेक्षा जास्त, इतकाच काय तो फरक ! मात्र त्यामुळे मला कंटाळा आला, की मी पहाणे थांबवतो. यांत कोणाला टाळणे नाही, किंवा कोणाची भलामण पण नाही. अर्थात यांत काही चांगल्या पोस्ट पण बघायच्या सुटून जातात, तर बऱ्याच वेळा त्याचत्याच प्रकारच्या, पण वेगवेगळ्या माणसांच्या पोस्ट पण नजरेसमोर येतात. शेवटी कशाला किती वेळ द्यायचा, हा प्रश्न आहेच !
मला कल्पना आहे, पोस्ट कदाचित थोडी मोठी वाटेल, पण आपण वाचावी, यांतून काहीतरी आपण निश्चित घ्याल, असा विश्वास आहे. भारतीय पुराव्याचा कायदा आणि फेसबुकवरील पुराव्याचा कायदा, हे यांचे ‘पुराव्याचा कायदा’ हे शब्द जरी समान असले, तरी सर्वस्वी भिन्न आहेत.
मी बघायला लागलो, तर काय, नेहमीप्रमाणेच ! काही माहितीवजा पोस्ट, काही पोस्ट जन्मदिन वा लग्नाचे वाढदिवस यांच्या ! काही क्वचित संगीतावर, त्यांत सिनेसंगीत, शास्त्रीय संगीत यांच्या पण होत्या. अधूनमधून एखादी चांगली कथा पण दिसायची, त्यांवर ओझरती नजर टाकावी, का शांततेने वाचावी, हे पहिल्या एकदोन परिच्छेदात ठरते. काही पोस्ट माहितीवजा, जी कामाची आहे, अशा होत्या; तुलनेने त्या अत्यंत कमी होत्या. मात्र असंख्य पोस्ट या सद्य राजकारण आणि राजकारण्यांसंबंधी होत्या. त्या एकतर त्याची भलावण करणाऱ्या, किंवा विरोध करणाऱ्या ! त्यांवर यथाशक्ती व यथाबुद्धी प्रतिक्रिया होत्या. काही प्रतिक्रिया बघून, ‘अरे, याने अशी प्रतिक्रिया द्यावी’ किंवा ‘याने पण अशी प्रतिक्रिया द्यावी’, असे क्वचित सुखद आणि बहुतांश दु:खद विचार मनांत येत होते. हे प्रमाण जास्त झाले, की मी संगीताच्या पेजवर निघून जातो.
वाचतावाचता एकदोघांनी कोणाचेतरी, त्याच्या पूर्वीच्या पोस्टचे ‘स्क्रीनशाॅट’ टाकले होते, आणि इतकेच नाही तर, ‘अजून माझ्याकडे भरपूर स्टाॅक आहे’ असे पण धमकीवजा सांगीतले होते. यांवरून मला मनांतून हसू आले. इथल्या पोस्टचा जीव तो काय, आयुष्य ते किती, याचा परिणाम एकमेकांच्या आयुष्यावर किती होणार, आणि यासाठी आपण वेळ तो किती घालवतो ? ज्यांचे फेसबुक हेच सर्वस्व असून आयुष्याची इतिकर्तव्यता व कर्मभूमी आहे, आणि तसा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. मात्र अजून ज्यांनी तसा निर्णय घेतलेला नाही, यांच्याबद्दलचा विचार मनांत आला. मग फक्त ‘स्क्रीनशाॅट’ याबद्दलची पोस्ट टाकू या, असे ठरवून पोस्ट टाकली.
‘स्क्रीनशाॅट’ म्हणजे आपली, पूर्वी केलेली विधाने, येथे पुन्हा मांडणे, त्याचा हेतू, भलेबुरे परिणाम आणि त्यातून निघणारे निष्कर्ष बघायचे तर -
1. पूर्वीची विधाने आपल्याला दाखवणे, हे आज आपण करत असलेले विधान विश्वासार्ह नाही, हे सांगण्यासाठी असते, किंवा त्यातील विसंगतींवर आपले व सर्वांचेच लक्ष वेधावे यासाठी असते.
2. पूर्वीचे विधान सत्य का आजचे सत्य, हे निवडण्याचा पर्याय आपल्यासमोर ठेवला जातो, तेव्हा या मर्यादित वेळेत व जागेत, संदर्भाशिवाय, तसेच तितक्या स्पष्टपणे आणि तपशीलवार कोणी त्याचे स्पष्टीकरण देवू शकत नाही. या अगतिकतेचा फायदा समोरच्या व्यक्तीस उठवायचा असतो.
3. इतके तपशीलवार स्पष्टीकरण देता यावे, अशी इथे कोणाचीही इच्छा नसते, कारण ते सांगण्यास वा ऐकण्यास तितका कोणासही वेळ नसतो. ते शक्य नसते, कारण भारतीय पुराव्याच्या कायद्याची तत्वे काटेकोरपणे पाळली जात आहे, किंवा नाही, यांवर लक्ष ठेवायला इथे कोणी नसते, तर इथे झुंडीचा प्रभाव असतो.
4. त्यातून आपसूकच एखाद्याची प्रतिमाभंजन होते, किंबहुना प्रतिमाभंजन हाच, यामागील उद्देश असतो. तो काही अंशी साध्य होऊ शकतो. मात्र येथे वादीप्रतिवादी हे शब्द इतके काही बुळबुळीत असतात, की कोण, केव्हा कोणत्या भूमिकेत जाईल, ते सांगता येत नाही. मग दुसरा देखील, त्याच्या जवळचा ‘स्क्रीनशाॅट’ टाकतो. त्याचा परिणाम दोघांच्याही बोलण्यात तथ्य आहे, कोणाच्याच बोलण्यात तथ्य नाही, हा निष्कर्ष निघतो वा समज होतो. सबब पोस्टला, त्यातील मजकूराला आणि पोस्टकर्त्याने सवंगपणे पोस्ट टाकली, पोस्ट व मजकूर हा विश्वासार्ह नसून, सवंग आहे, हा निष्कर्ष निघतो.
5. पोस्ट वाचणारा जर कोणत्याही विचारसरणीचे अंधानुकरण करणारा नसेल तर, पोस्टमधील मजकूर हा गंभीरपणे घेण्याची शक्यता असते. मात्र आपल्या पोस्टवरील प्रतिक्रियांमधे असा गोंधळ, जर वारंवार उडतो, असे जर लक्षात आले, तर आपल्या कोणत्याही पोस्टचे गांभीर्य संपते. आपण एखाद्या विचारसरणीचे पुरस्कर्ते असल्याचा, त्याचा समज कायम होतो. मग आपल्यभोवती तशाच व्यक्तींचे कोंडाळे जमते, आपल्याला आपली लोकप्रियता वाढल्याचा समज होऊ लागतो.
6. हे असे चांगले का वाईट, हा विषय जरी भिन्न असला, तर आपली विश्वासार्हताच धोक्यात आल्यावर, आपल्या मजकूराकडे आणि सांगण्याकडे त्याच दृष्टीने बघीतले जाते. त्याचे मूल्य कमी होते. असेच वारंवार होत राहिले, तर ते सरतेशेवटी संपते. अपवाद - याकामी आपल्याजवळ सकृतदर्शनी भक्कम पुरावा असला, आणि तो परिणामी सत्य व परिणामकारक ठरला, तसेच हे आपल्या पोस्टमधील मजकूरासंबंधाने वारंवार अनुभवण्यास यायला लागले, तर मात्र त्या पोस्टकर्त्याची व त्यांतील मजकूराची विश्वासार्हता वाढते.
मी वर उल्लेख केलेली पोस्ट टाकल्यावर, त्यांवर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्यात, की त्यांनी आजपावेतो कोणाच्याही पोस्टचे ‘स्क्रीनशाॅट’ टाकलेले नाही. त्या नांवाच्या यादीकडे बघीतले, तर बहुतांश प्रतिक्रिया देणारे आपले मत, पोस्टवर संयतपणे व ठामपणे मांडतात. त्यांतील सर्वांचा स्वतंत्रपणे उल्लेख करणार होतो, पण तो विचार बाजूला ठेवला. यांतील काही जण माझ्या पोस्टवर अपवादाने व्यक्त होत असतात, पण ते पोस्ट वाचत असावे, या माझ्या शंकेला(?) साधार जागा आहे. मात्र ज्या कोणी आपली प्रतिक्रिया दिली आहे, त्या सर्वांनी किंचीत अभिमानाने सांगीतले आहे, की त्यांनी आजपावेतो ‘स्क्रीनशाॅट’ टाकला नाही, काहींनी तर घेतलेला पण नाही. काहींना ‘स्क्रीनशाॅट’ म्हणजे नेमके काय, याची पण कल्पना नाही, असे त्यांनी लिहीले आहे. मी यांवर विश्वास ठेवतो.
ज्यांनी आवर्जून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, हो, मी बघीतल्या, म्हणून ज्या हेतूने पोस्ट टाकली, ते लिहायला थोडा वेळ लागला. यांतील बहुसंख्य मंडळींच्या त्यांच्या वाॅलवरील पोस्ट बघीतल्या, तर क्वचित अपवाद वगळता, तर सरळ असतात, उद्बोधक असतात, क्वचितच द्वेषपूर्ण असतात. त्यांचे विचार व व्यक्तीमत्व हे सरळ वाटते. मैत्रीचा हात किंतु मनांत न ठेवता पुढे करता येईल, अशी ही माणसे वाटतात.
कोणी आपल्या राजकीय विचारसरणीच्या पुष्ट्यर्थ जर पोस्ट किंवा सोबत ‘स्क्रीनशाॅट’ टाकत असतील, तर त्यांतून आपल्याच विधानांना परस्पर छेद देण्याव्यतिरिक्त काहीही निष्पन्न होणार नाही, हे पण त्या पोस्टकर्त्याला माहीत असते. याचप्रमाणे एकमेकांची उणीदुणी काढणे, समोरच्याला ‘ब्लॅकमेल’ करणे, हा पण काहींचा जोडधंदा, पूरक व्यवसाय वा मुख्य व्यवसाय असतो. त्यामुळे ‘स्क्रीनशाॅटचा घाऊक व्यापार’ करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे, की याची सामाजिक व कायदेशीर मर्यादा, त्यांना कितपत कोणत्याही प्रकारचे लाभ मिळवून देवू शकेल !
ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या नाहीत, त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. त्यांना पोस्ट आवडली नसेल, पण तसे सांगणे योग्य वाटले नसेल. काहींच्या वाचण्यात ही पोस्ट आली नसेल, त्यामुळे प्रतिक्रिया देता आली नसेल.
—— आणि कदाचित ते नियमीत ‘स्क्रीनशाॅट’ घेऊन ‘आंतल्या कप्प्यात’ ठेवत असतील, असावा सोबत कोणावर दारूगोळा फेकायची वेळ आली तर ! पण कोणाला वाटते का, की याचा ‘भारतीय पुराव्याचा कायदा’ विचारात घेतला, तर येथील फेबुवरील किती पुरावे, त्या कसोटीवर शेवटपर्यंत टिकतील ?
© ॲड. माधव भोकरीकर
(पोस्ट आवडल्यास आपण शेअर करू शकतात.)

1.5.2020

No comments:

Post a Comment