Sunday, May 10, 2020

कभी कभी !

कभी कभी !
यामधे तू होता, आणि हो तुझी नंतर झालेली धर्मपत्नी पण होती. आमच्या गांवात सर्वदूर चित्रपट लागून, त्याचा गाजावाजा झाला, की मग यायचा ! तोपर्यंत बऱ्यापैकी जुना झालेला असायचा ! त्यातील गाणी चांगली असली, तर तोपर्यंत बऱ्यापैकी गाजलेली असायची, अगदी ‘बिनाका गीतमाला’ च्या ‘पहिले पायदान’ वर पण आलेली असायची ! या अशा घाईगर्दीत, इयत्ता दहावीच्या परिक्षेनंतर मी बघीतलेला हा सिनेमा, कभी कभी !
यामधे तू होता, शशी कपूर होता, आणि महानायक अमिताभ बच्चन होता ! लढाई तर तुझ्या काका आणि अमिताभ बच्चन यांमधेच होती ! तुझी आणि नितू सिंगची उगाचच मधे गडबड होती !
संगीतकार खय्याम यांच्या कर्णमधुर संगीताने घातलेल्या मोहिनीमुळे, ही गाणी अजून पण ऐकावी वाटतात ! किशोरकुमार आणि लता मंगेशकर यांचा आवाज, तुम्हाला अगदी तुमच्या स्वेटरसारखा फिट्ट बसला होता.
काल तुझी बातमी ऐकली ! नीतू सिंगच्या चेहऱ्याकडे आयुष्यभर नजर हटवता येणार नाही, हे सांगणारा तू, तिच्या चेहऱ्यावरुन कायमची नजर दूर करत, तिच्याच नाही तर, आम्हा सर्वांच्याच दृष्टीआड निघून गेला !
आणि हो, अजून एक ! मी जळगांव जिल्ह्यातील ! तुमच्या कपूर घराण्याचे आणि जळगांवचे, खास नाते आहे रे ! तुला कल्पना आहे, पण मी आपली आठवण देतो. जळगांव नगरपालिकेने सर्वात पहिले बोलावले होते, ते तुझ्या आजोबा, पृथ्वीराज कपूर यांना ! नंतर पुन्हा बोलावले होते, ते तुझे वडील, राज कपूर यांना ! आणि नंतर तुला पण बोलावले होते ! आपल्या आजोबा आणि वडिलांनी ज्यांच्या निमंत्रणाला मान दिला, त्यांच्या निमंत्रणाचा तू अनादर कसा करणार होता ! जळगांव आकाशवाणीत त्याच्या काही स्मृती जपून ठेवल्या आहेत. बस ! आता या स्मृतीवरच दिवस काढायचे.
— आता जुने दिवस आठवायचे, तर तुझा कोणताही चित्रपट बघावा वाटतो ! तो बघायचा विचार मनांत आला, तर हे गाणं कायम आठवत राहील ! गाणं ऐकू येईल, तुझी आठवण येईल, पण तू नसणार !

1.5.2020

No comments:

Post a Comment