Sunday, May 10, 2020

पाकीजा !

पाकीजा !
मी काॅलेजला असतांना ‘हिंदुस्थानी’ म्हणजे उर्दूमिश्रीत हिंदी, या भाषेतील चित्रपट बघीतला होता. परिक्षा संपली आणि आम्हा मित्रांचे ठरले, की बघायचा हा चित्रपट ! परिक्षा संपल्यानंतर लगेच चित्रपट बघायचा, हा नियम कधी आला, आणि त्याचा निर्माता कोण, हा शोध अजून लागला नाही. मात्र ही रूढी अगदी धार्मिक कट्टरतेने आजपण पाळली जात असावी. माझ्या यादीत काही, नव काॅलेजकुमार असतील तर ते यांवर प्रकाश टाकू शकतील !
पाकीजा हा चित्रपट, चित्रा टाॅकीजमधे लागला होता. सर्वानुमते हा बघायचा ठरले. मग दुपारी नाईक सरांचा अकाउंटन्सीचा क्लास आटोपला, आणि तिथूनच मग चित्रपटगृह गाठले. परिक्षा संपल्यावर चित्रपटगृहात जितकी गर्दी असावयास पाहीजे, तितकी होती. कशीबशी तिकीटे काढली, आणि आंतमधे जाऊन बसलो.
त्यावेळी याबद्दल ज्या काही सत्यकथा वा दंतकथा आल्या होत्या, त्यात मीनाकुमारीच्या मृत्युनंतर हा प्रसिद्ध झाला. यांतील शेवटचे नृत्या मीनाकुमारी तिच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे करू शकली नाही, त्यामुळे ते मालासिन्हाने केले आहे, तिला पण हे सहजासहजी जमले नव्हते. हा चित्रपट करायला खूप काळ लागला, कारण विषय दुर्दैवी आहे, मग यांतील दुर्दैवी कोण हे शोधायला लागले, आपण सोडून दुसरा दुर्दैवी आहे, त्यामुळे ही वाताहत होत आहे, ही प्रत्येकाची भूमिका !
चित्रपटातील कलाकारांची यादी म्हणजे तगडी - अशोककुमार, ‘जानी’ राजकुमार आणि ‘ट्रॅजेडी क्वीन’ मीनाकुमारी ! आपल्या काळातील स्टार मानले गेलेले ! कोठीवरील स्त्री (तवायफ) हिचे आयुष्य, तिच्या भावभावना आणि दु:ख, हा विषय आणि त्याचे गांभीर्य, त्यातील वेदना आणि दु:ख समजण्याएवढी बुद्धी त्यावेळी आम्हा काॅलेजकुमारांकडे नव्हती. आज तीसचाळीस वर्षांनंतर, समाजातील विविध दु:खे बघीतल्यावर, त्याची थोडी कल्पना येते. मन सुन्न होते, विषण्ण होते. दिवसभर काही वेळा, काही सुचत नाही. जग कितीही पुढे गेले, तरी स्त्रीवेदनांचा विचार त्यांच्या विचारक्षमतेच्या बाहेर असावा, असे वाटते. इतकी वर्षे झाली, विविध समाजव्यवस्था बदलल्या, राज्यपद्धती बदलल्या, पण स्त्रीयांच्या वेदना व दु:ख कमी होतील, असे काही वाटत नाही.
चित्रपटाचे निर्माते होते कमाल अमरोही, मीनाकुमारीचे पती ! अत्युत्तम चित्रपट निर्माण करायचा, या ध्यासापायी सन १९५६ साली याची तयारी सुरू झाली, तो चित्रपट तयार झाला सन १९७२ साली, तब्बल १६ वर्षांनी ! खरोखर षोडषयौवन असलेला चित्रपट होता तो. मीनाकुमारीच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट ! या चित्रपटाची गीते लिहीली ती, मजरूह सुलतानपुरी, कमाल अमरोही, कैफी आझमी, कैफ भूपाली यांनी ! काही असो पण, या चित्रपटाच्या संगीतकाराने या गीतकारांच्या गीतांना आणि चित्रपटाच्या विषयाला अप्रतिम संगीत देऊन केवळ न्यायच दिला नाही, तर त्या यशाला ‘चार चाॅंद’ लावले. विविध रागांत बांधलेली गीते, करूण सारंगीचे सूर, पदन्यास करायला इच्छा होईल असा वजनदार व खणाणत्या नाजूक बोलांचा तबला आणि —- आणि काय ? साक्षात लता मंगेशकर यांचा आसमंत चिरत जाणारा, आभाळाच्या डोळ्यांत आपसूकच अश्रू उभे रहातील, असा आवाज !
मिर्झा गालिब, शमा आणि पाकीजा हे त्यांच्या संगीत दिग्दर्शकांखाली तयार झालेले चित्रपट ! मिर्झा गालिब या चित्रपटासाठी संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार यांना मिळाला ! सर्वोत्कृष्ट संगीताचे फिल्मफेअर पारितोषिकासाठी नामांकन झाले, पण पारितोषिक मिळाले नाही. सन १९०३ साली बिकानेर या गावी जन्माला आलेला, हा थोडा दुर्दैवीच संगीत दिग्दर्शक, आपल्याला कायमचा सोडून गेला, तो १७ मार्च, १९६८ रोजी ! विख्यात संगीतकार नौशाद आणि अनिल विश्वास यांच्याकडे त्यांनी तपभर सहाय्यक म्हणून काम केले.
हो, पाकीजा चित्रपट नंतर प्रदर्शित झाला. यांतील गाणी केवळ श्रवणीयच ठरली नाही, तर संगीत रसिकांना ती अतिशय आवडली, त्यांनी डोक्यावर घेतली. या दुर्दैवी संगीतकाराला बिचाऱ्याला मात्र आपल्या चित्रपटाचे हे घवघवीत यश बघायला मिळाले नाही. त्याच्या मृत्यूनंतर ते काम, म्हणजे ‘पाकीजा’ या चित्रपटाच्या पार्श्वसंगीताचे काम नौशाद यांनी पूर्ण केले.
त्यांचे ‘ठाडे रहियो’ हे मिश्र पिलू रागातील, लता मंगेशकर यांनी गायलेले गीत आपल्यासाठी ! करूण स्वर काढणारी सारंगी, पायांतील घुंगरांचा आवाज आपण कुठेतरी कोठीवर नाच बघत आहोत, हे लक्षात आणून देते. त्यांत दादरा तालातील खास उठाव घेत आणि लग्ग्या वाजवत, समेवर येण्याची लकब ! आपले विचार आणि गाण्यातील भाव बहुदा एकाच वेळी, समेवर येतात.
— हो, आपण ओळखले असेल, त्यांचे नांव - गुलाम मोहंमद ! भारतीय चित्रपटसृष्टीला संगीताचे लखलखते हिरे देणारा संगीतकार !
© ॲड. माधव भोकरीकर
(आपणांस शेअर करावेसे वाटले, तर शेअर करू शकता.)

17.3.2020

No comments:

Post a Comment