Sunday, May 10, 2020

तो - माझ्या मराठी शाळेतला !

तो - माझ्या मराठी शाळेतला !
मराठी शाळेत मी दुसरी-तिसरीत शिकत असेल ! नाल्यावरच्या शाळेत शिकत असतांना, हा माझ्यासोबत शिकत होता. तब्येतीने बरा, गोरा, नाकेला, केस जरा कुरळे ! भाजीबाजाराजवळ, म्हणजे पाराच्या गणपती जवळ रहायचा ! घर म्हणजे, जेमतेम ! पळखाट्याची कुडे सारवलेल्या भिंती, लाकडी बल्ल्यांच्या आधाराराने टिकलेल्या आणि डोक्यावर छत म्हणून पत्रे ! तो तिथं रहायचा, म्हणून त्याला त्याचे घर म्हणायचे, यापेक्षा दुसरे काही नाही.
आमच्या अंगातील कपडे, म्हणजे शाळेचा गणवेश असल्याने सर्वांचेच सारखे असायचे, खाकी चड्डी आणि पांढरा सदरा ! त्यातच काय तो डावा-उजवा असायचा ! पांढरा शुभ्र ते मळकट, आणि नवीन वाटणारा ते जुना विटका व फाटकेला असणारा ! गरिबीला हसू नये, हे काही फार असे, त्यावेळी सांगीतले जात नसे; कारण सर्वच जवळपास तसेच असत, किंवा त्याची जाण, आम्हा मुलांना नसायची !
बोलणे मात्र त्याचे बऱ्याच वेळी अर्वाच्य असायचे ! माझ्याशी मात्र तो चांगला बोलायचा. इतर कोणी जर त्याला, काही वेडेवाकडे बोलले, किंवा त्याला बोलले असे, जरी वाटले, तरी हा मग काहीही बोलायचा ! त्याला हे असे बोलणे, कसे जमते, याचे पण मला आश्चर्य वाटायचे. वर्गातील बरीच मुले, त्याला दबकून असायची ! कदाचित त्याच्या वेड्यावाकड्या बोलण्याचे, आक्रमण सहन करण्याची त्यांना शक्ती नसायची ! आपोआपच वर्गाच्या दोनचार टवाळ मुलांमधे किंवा पुढारी मुलांमधे तो मानला जाऊ लागला.
शिक्षक त्याला फार बोलत नसत. अभ्यास करायला हवा, हे समजावून मात्र सांगत असत. शिक्षक इतरांना जसे, रागावून बोलत, त्याप्रमाणे याला मात्र बोलत नसत. ते त्याच्या फार असे गांवी पण नसायचे. मला नेहमीच वर्गात काही विचारल्यावर सांगता येई. सहामाहीत, वार्षिक परिक्षेत चांगले गुण मिळत. याचा मला आनंद होई, तसे याला पण बरे वाटे. हा मात्र कसाबसा पास होऊन पुढच्या वर्गात जात होता, वर्ष वाया जात नव्हते, हेच त्याच्या दृष्टीने खूप !
एकदा वडिलांबरोबर मी गांधी चौकाकडे निघालो होतो. संध्याकाळची वेळ होती. रस्त्यात आशा सोडा फाउंटन या नांवाचे एक हाॅटेल लागायचे, ते लागले. त्याच्या पायरीवरून हा उतरत होता. डाव्या हाताच्या बोटांमधे चार कप अडकवलेले, तळहाताच्या आधाराने हातात काही बशा, आणि उजव्या हातात अल्युमिनीअमची किटली ! त्याचे माझ्याकडे लक्ष गेले.
‘काय रे, कुठे ?’ तो.
‘गांधीचौकात ! तू कुठे ?’ मी.
‘गिऱ्हाईक करायचे आहे, नाल्यावर ! कोणाबरोबर चालला आहे ?’ तो.
‘वडिलांबरोबर जातोय, सहज !’ मी.
नंतर तो काही बोलला नाही. वडिलांनी मला विचारले, ‘कोण आहे ?’ मी सांगीतले, ‘माझ्या वर्गात आहे तो.’
‘*** याचा पोरगा आहे. वडिल लवकर गेले त्याचे.’ माझे वडील ! त्यावेळी मला काही फार समजले नाही. गांधी चौकातले काम आटोपल्यावर आम्ही घरी आलो. आईला, तो आशा सोडा फाउंटनजवळ भेटल्याचे सांगीतले. आईच्या काही लक्षात येईना, मग वडिलांनी सांगीतल्यावर, तिच्या लक्षात आले. त्याची आई, माझ्या आईच्या ओळखीची होती. कोणाकोणाकडे घरकाम, स्वयंपाक करायला जायची. आपल्याकडे पण लग्नकार्यात आपण बोलावतो, हे तिच्याकडूनच समजले. ‘मुलं लवकर शहाणी होतात बरं !’ आई म्हणाली. तो विषय मला, काही फार समजला नाही, आणि मी पण वाढवला नाही. मला त्यावेळी समजण्यासारखा नव्हताच !
दोन वर्षे म्हणजे, माझ्या चौथीपर्यंत तो सोबत होता. पाचवीला मी हायस्कूलमधे प्रवेश घेतला. तो काही माझ्यासोबत आला नाही हायस्कूलला ! बहुदा मराठी शाळेतच राहिला असावा, पुढच्या शिक्षणासाठी ! हा माझा आपला अंदाज ! त्याचे व माझे मार्ग आपोआपच वेगळे झाले. कधीमधी शाळेतून येतांना तो दिसायचा, आशा सोडा फाउंटनपाशीच ! एखादवेळेस नाल्यावर संध्याकाळी शाखेत यायचा, खेळायला मिळायचे ना ! त्यावेळेस काही बोलणे व्हायचे. त्याची तीच शाळा सुरू होती. नंतर मात्र भेटी कमी झाल्या अजून, एखाद्या रविवारी पाराच्या गणपतीवर भेट व्हायची, किंवा सार्वजनिक मिरवणूकीत भेट व्हायची. दिसल्यावर हसायचा फक्त ! ‘काय ठीक आहे ना ?’ अशा अर्थाने मान हलवायचा, मी पण तसेच उत्तर द्यायचो. बोलणे कमी झाले होते. मी जळगांवी शिकायला गेलो, आणि अधूनमधून होणारी भेट थांबली. तिकडून आलो, तर वकिल होऊन आलो होतो. येणाऱ्या धबडक्यात व जबाबदारीत त्याचा विषय तसा डोक्यात राहिला नाही.
अधूनमधून केव्हा तरी फक्त आठवण यायची, ती त्याच्या घराकडे पाहून ! पण त्याची भेट मात्र व्हायची नाही. मला जे काही जाणवायचे, हे त्याला जाणवत असावे का, हे समजायला पण मार्ग नव्हता. त्यासाठी एकदा तरी भेट आवश्यक होती. झाली नाही.
औरंगाबादला आल्यावर, तर आठवण जवळपास पुसलीच ! उगीच गांवी रावेरला, गेलो तर पाराच्या गणपतीचे दर्शन व्हायचेच ! त्याचवेळी त्याच्या घराकडे लक्ष जायचे, तरी अलिकडे भेट काही झाली नाही. तो सध्या रावेरलाच आहे, का पोट भरायला त्याला रावेर सोडावे लागले, देव जाणे !
मागील आठवड्यात जळगांवहून औरंगाबादला येत होतो. रस्त्यात चहासाठी असाच थांबलो. ड्रायव्हर गाडीतून चहा घेण्यास गेला. मी गाडीतच होतो. चहा घेऊन एक मुलगा आला. चहावाल्याचाच असावा कदाचित ! असेल चौथीपाचवीत ! बस, त्याच्या हातातून चहा घेतला, पण प्यावा असे वाटेना ! मला थेट, माझी मराठी शाळा आठवली. आशा सोडा फाउंटन आठवले. त्याच्या पायऱ्यांवरून उतरत, डाव्या हाताच्या बोटांत कप अडकवून, तळहाताच्या आधाराने बशा घेतलेला आणि उजव्या हातातील त्याची चहाची अल्युमिनीअमची किटली आठवली. तो आठवला ! —- आणि मग एकेक झरझर सर्वच आठवू लागले.
आता आशा सोडा फाउंटन नाही, ते कधीचेच बंद झाले. त्याच्या आईवडिलांबद्दल माहिती देणारे, माझे आईवडील पण आता नाहीत. त्याची भेट पुन्हा होईल, का नाही, हे पण सांगता येणार नाही. काय पण माणसाचे मन असते, कधीकाळची आठवण, कित्येक वर्षांनी कशा स्वरूपात येईल ते सांगता येत नाही. बस, कशावरून तरी काही आठवते, आणि मग लिहावे वाटते. मागच्या पडद्यावरून निघून गेलेली माणसं, तात्पुरती निघून गेली, का कायमची, आणि पुन्हा नव्या पडद्यावर भेटतील, का नाही, हे सांगता येत नाही; निदान आपल्या लेखणीच्या कुंचल्याने, आपल्याला जसे काही वेडवाकडे चित्रण करून, त्यांना आपल्यासमोर ठेवता येईल, ते ठेवावे ! बस ! —- काय सांगता येते, वाचून कदाचित भेटायला पण येतील कोणी !
© ॲड. माधव भोकरीकर

14.3.2020

No comments:

Post a Comment