Sunday, May 10, 2020

जळगांवच्या ‘स्टुडन्टस स्टडी सर्कलचे’ नाईक सर !

जळगांवच्या ‘स्टुडन्टस स्टडी सर्कलचे’ नाईक सर !
परवा आमच्या नूतन मराठा काॅलेजमधील विद्यार्थ्यांच्या समूहातून आमच्यानअकाउंटनसीच्या क्लासचे, श्री. नाईक सरांचा फोन नंबर मिळाला, त्यांच्याशी बोललो.
‘माधव भोकरीकर, रावेर ‘ त्यांचा आवाज ऐकला. त्यांना खूप आनंद झाला. माझी चौकशी केली. त्यांचा पत्ता दिला. मला बोलावले. एकेक गोष्टी झरझर आठवायला लागल्या .
आमचे गांव, रावेर जरी तालुक्याचे असले, तरी पूर्वी तिथं महाविदयालय नव्हते. मी अकरावी काॅमर्स, आमच्या सरदार जी. जी. हायस्कूल मधून पास झालो. त्यावर्षी गांवात तिथं महाविदयालय सुरू करावं अशी, गांवातील मंडळींची लगबग सुरू झाली. मात्र या नादी न लागता, मी आणि माझा भाऊ यांना, बारावीसाठी आणि त्यानंतरच्या शिक्षणासाठी जळगांवला शिकायला ठेवायचे वडिलांचे निश्चित झाले होते. माझा भाऊ म्हणजे, सख्खाचुलत भाऊ, मोठ्या काकांचा मुलगा !
जळगांव हे माझं आजोळ, माझा जन्म जळगांवचा ! असंख्य वेळा आईसोबत तिथं जाणं असल्याने, जळगांव, तसं मला अपरिचित अजिबात नव्हतं ! बर्वे यांच्या वाड्यात मामा रहायचे. वाड्यातून बाहेर आले की डावीकडे शेजारी श्री. अत्रे रहायचे, तर त्यांच्या पलिकडे श्री. नाईक सर रहायचे. अत्रे यांच्या वरील मजल्यावर प्रा. सु. का. जोशी होते. नाईक उजवीकडे साठे बिल्डींगला लागून भगीरथ शाळेचे मुख्याध्यापक आर. वाय्. कुलकर्णी सर, तर कोपऱ्यावर ॲड. लिमये आणि त्यांच्या शेजारी श्री. पवार रहायचे. सुटीत पवार मावशींकडे माझी कायम फेरी ! मी गेलो नाही, तर ‘माईंची पोर आली नाही अजून ?’ ही हमखास विचारणा होणार ! बर्वे वाड्यातच श्री. शामकांत देशमुख सर यांचा इंग्रजीचा क्लास होता. जळगांवला दिवाळीच्या सुटीत गेलो, की समोरच्या आदर्श शाळेच्या ओट्यावर लोखंडी छोटी बत्ती घेऊन, लोखंडी पट्टी मारलेल्या उंबरठयावर संध्याकाळपासून बराच वेळ टिकल्या फोडण्याचा आमचा नेहमीचा कार्यक्रम असायचा.
जळगांवी जायचे ठरल्यावर, तिथं आम्हा दोघांसोबत, माझी काकू, म्हणजे चुलतभावाची आई रहाणार होती. त्यामुळे आम्हा सर्वांची रहाण्याची व्यवस्था करायला लागणार होती. कुठंतरी परिचितांकडे भाड्याने जागा बघायची, तर जळगांवचे प्रसिद्ध वकील आणि कायद्यांवर त्यांनी लिहीलेली कित्येक पुस्तके आहेत, असे ॲड. डी. एच्. चौधरी, यांनी सुचवले, की त्यांच्याकडील काम पहाणारे श्री. संत, यांची जागा आहे. ते भाड्याने देतील. पुढे जास्त विचार करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांच्याकडे भाड्याने रहायला आलो, आणि आम्ही जळगांवनिवासी झालो. संत कुटुंबीय आणि आमचे, आजही दृढ संबंध आहेत.
आमची रहाण्याची व्यवस्था काॅलेज सुरू होण्यापूर्वीच झाली होती. कोणत्या काॅलेजला प्रवेश घ्यायचा, हा पण प्रश्न उद्भवला नाही. त्यावेळी जळगांव येथील मोठी व जुनी संस्था, जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था ! या संस्थेचे चेअरमन ॲड. नानासाहेब उपाख्य एस्. आर. चौधरी यांचा, आमच्या घराशी जुना परिचय ! काॅलेजमधील प्रवेशाचा आमचा प्रश्न त्यांनी तात्काळ निकालात काढला.
‘पोरं माझ्या काॅलेजला प्रवेश घेतील.’ म्हणत त्यांनी तत्कालीन प्राचार्य डाॅ. के. आर. सोनवणे यांना, ‘ही घरची आहेत, काही अडचण असेल, तर मला सांगा.’ असे सांगत आम्हा दोघांना नूतन मराठा काॅलेजमधे प्रवेश दिला. त्यानंतर चारही वर्षे या नूतन मराठा काॅलेजने आणि काॅलेजमधील कोणीही, मला खरोखर परकं मानलं नाही. ते काॅलेज सन १९८२ ला, मी बी. काॅम. झाल्यावर सोडलं. मात्र आज देखील काॅलेज मला परकं वाटत नाही, आणि तेथील मंडळी मला परकं मानत नाही. तेथील आमचे शिक्षक केव्हाही योगायोगाने भेटले, तर घरच्यासारखी आपुलकीने चौकशी होते.
बारावीच्या परिक्षेचा दरारा त्यावेळी खूप होता. आपण बऱ्याच जणांना विचारल्यावर, तो बारावीला नापास झाल्याचेच सांगायचा. त्यामुळे ज्याला नापास व्हायचे आहे, त्याने बारावीला बसावे, ही भावना झाली होती. पुढे जर शिकायचे, तर बारावीचा अडथळा कशाही प्रकारे पार करणे, अत्यंत आवश्यक होते. पण या बारावीच्या धसक्याने आम्हाला, आपले पारंपरिक कठीण समजले जाणारे विषय, म्हणजे अकाउंटन्सी आणि इंग्रजी यांची शिकवणी लावायची, हे निश्चित केले गेले. या दोन्ही विषयाचे नावाजलेले क्लास माझ्या आजोबांच्या घराजवळच ! दोन्ही क्लासेस चालवणारे, आजोळच्या जुन्या परिचयातले ! इंग्रजीचा क्लास लावला, श्री. शामकांत देशमुख सर यांच्याकडे, तर अकाउंटन्सीचा क्लास लावला, श्री. मुरलीधर ए. नाईक यांच्याकडे, म्हणजे श्री. नाईक सरांकडे ! अशातऱ्हेने जळगांवी आम्ही शिकायला जायचे म्हटल्यावरच्या, आमच्या या तिन्ही व्यवस्था लागल्या गेल्या.
माझ्या मामांच्या घराजवळच श्री. नाईक सरांचा क्लास होता. नाईक सर म्हणजे तुकतुकीत लिंबासारखे गोरेपान, उभट चेहरा, धारदार नाक ! डोळ्यांवर काळ्या किंवा गडद तपकिरी रंगाचा जाड काड्यांचा चष्मा ! अगदी देखण्यात जमा होणारे ! बेताची उंची ! डोक्यावरचे काळेभोर केस मागे वळवलेले, अर्ध्या बाह्यांचा शर्ट व पॅंट ! शर्टच्या डाव्या खिशात पेन दिसायचे ! शर्ट बहुदा उजळ रंगाचे, तर पॅंट गडद रंगाची ! पायात चप्पल, क्वचित बूट ! श्री. नाईक सर, हे जळगांवच्या सामाजिक वर्तुळांत पण मोठे नांव होते. जळगांवच्या ब्राह्मण सभेचे, तसेच इतर संस्थांचे, ते पदाधिकारी राहून, त्यांनी लक्षात राहील असे, चांगले काम केले आहे. माझे मामा आणि श्री. नाईक सर यांचे पण जुने संबंध असल्याने, मला ते पूर्वीपासूनच ‘माईंचा मुलगा’ म्हणून ओळखत होते. नंतर मग ‘रावेरचे भोकरीकर’ हे नांव मिळाले. माझ्या आईला, तिच्या माहेरी सर्वजण ‘माई’ म्हणून ओळखत !
बारावीला आमचे काॅलेज जसे सुरू झाले, तसा क्लास पण सुरू झाला. तळमजल्यावर त्यांची, म्हणजे नाईक सरांची, रहिवासाची जागा, शेजारी आणि मागील मोठ्या वाड्यात भाडेकरू ! सरांच्या घरासमोर त्यांची एक जुन्या पद्धतीची कार असायची. वरच्या मजल्यावर ते क्लास घ्यायचे. श्री. नाईक सरांच्या क्लासला सुरूवात व्हायची, ती सकाळी सहापासून ! त्यांच्या क्लासला विद्यार्थ्यांची संख्या कायमच भरपूर असायची. शाळेतील वर्गात जसे विद्यार्थ्यांना बसायला लाकडी बाक असतात, तसे खाजगी क्लासमधे पण लाकडी बाक असतात, हे मला जळगांवला आल्यावर समजले. तोपावेतो क्लास हा शब्द शाळेशी संबंधीत आहे, खाजगी शिकवणी संबंधीत नाही, ही माझी समजूत ! अगदी काॅलेजमधे असल्यासारखे बसायचे, आणि शिकायचे, हा शिकवणीचा प्रकार मला नवीन होता.
श्री. नाईक सरांच्या क्लासमधे यायला दोन दरवाजे, एक बाजूचा दरवाजा बंद असायचा, तर रस्त्याच्या दिशेचा उघडा असायचा. क्लासमधे प्रवेश केला, की डाव्या हाताला छोटे स्टेज ! त्यांवर खुर्ची व टेबल, त्या मागे भिंतीला छान फळा असायचा, सरांच्या डावीकडील लाकडी फडताळांत खडू पण असायचे, मात्र सरांनी खडू आणि फळ्याचा वापर, हा क्वचितच म्हणजे, माझ्या चार वर्षांच्या शिकवणीच्या काळात चार वेळा पण केला नसेल. समोर बेंचच्या तीन रांगा, त्यातील दोन रांगा एकमेकांना लागून, तर एक रांग वेगळी ! लगतच्या दोन रांगा मुलांच्या, तर वेगळी रांग मुलींची ! सरांच्या उजव्या हाताला पण काही बेंचेस होते. जागा कमी पडली, की तिथं काही जण बसायचे !
क्लासला यायचे म्हणजे त्यांच्या सूचना ठरलेल्या ! किमान दोनशे पेजचे रजिस्टर घ्यायचे. रेखा आखायला पट्टी हवी. आमच्यातील काही, इंग्रजी बोलण्याची हौस आहे असे दाखवणारे, ‘लाईन मारायला पट्टी हवी’ असे पण म्हणायचे. त्याचा नेमका अर्थ, त्याला त्यावेळी काय अपेक्षित असावा, याबद्दल आता इतक्या वर्षांनंतर उहापोह करण्यात अर्थ नाही. असो. आपण क्लासला गेलो, की त्यांच्या घरासमोर ही सायकलची रांग असायची. मुले वर जाऊन बसायची. बऱ्यापैकी गलका करायची, मग तो गलका थेट खाली घरांत ऐकू जात असावा. मग सर, त्या सिमेंटलाकडी जिन्याने येत. येतांना बऱ्याच वेळी त्या जिन्याच्या लाकडी कठड्यावर अशापद्धतीने किंचीत हात आपटत, की ‘टाॅक्क’ असा त्याचा आवाज येई. मग ‘टाॅक्क टाॅक्क टाॅक्क’ असा आवाज येत, जिन्यावरील पावले वाजल्याची चाहूल लागली, की ती सर क्लास घ्यायला वर येत असल्याची खूण असे. वर्ग शांत होई.
‘काय बुवा ! अगदी चहासुद्धा पिऊ देत नाही तुम्ही !’ असे म्हणत सरांनी एखाद्याची वही घ्यायची. मग शिकवणे सुरू व्हायचे. रजिस्टरवर आखायचे कसे इथपासून त्यांची काळजी असायची.
‘जैन, रजिस्टरच्या डावीकडच्या पानावर, सगळ्यात डावीकडे दोन बोटावर एक रेघ ओढा. सांगतो, कशासाठी ! तो ‘Date’ या साठी ! त्यानंतर सर्वात उजवीकडे डाव्याच पानावर निदान अडीच बोटे जागा सोडा, आणि रेघ मारा. त्याच्या अलिकडे तेवढीच जागा सोडून पुन्हा रेघ मारा. तिथं अजून काही लिहू नका. पानाच्या पहिल्या व दुसऱ्या ओळीवर रेघ मारा. आता शेवटचे जे दोन काॅलम आहेत, त्याचे प्रत्येकी दोन भाग करायचे. उजवीकडे अर्ध्या बोटावर रेघ मारा. झाले ! आता हा अगदी शेवटचा छोटा काॅलम, पैसे आणि डावीकडचा त्याच्या लगत असलेला, रूपये ! इथं वर लिहा ‘Amount’ !’ सर सांगायचे. तेवढ्यात कोणीतरी न राहवून विचारायचाच !
‘सर, हा आतला काॅलम कशाचा !’ विद्यार्थी !
‘खरे, सांगतो. घाई पहा किती आहे. या रेघा तू लाल शाईने ओढल्या ना !’ यांवर त्याचे काही उत्तर नाही, हे पाहून, ‘भोकरीकरने आणला आहे, त्याच्याकडून घे !’ सुदैवाने मी आणलेला असतो. त्यावेळी कोणाजवळची वस्तू, पट्टी, पेन, पुस्तक ही सर्वांची असायची !
‘पाटील, तो आतला काॅलम कच्च्या बेरीज-वजाबाकीसाठी आहे. तिथं पक्का आकडा आला, की तो सर्वात शेवटच्या काॅलममधे लिहायचा. शेवटच्या काॅलममधे गिचमीड करायची नाही. मला कोणी दिसले, तर मी पान फाडून टाकेल !’ सरांची धमकी.
‘आणि मधला हा मोठा काॅलम आहे, तिथं लिहा ‘Particulars’ ! लिहीले ? आता असेच रजिस्टरच्या उजव्या पानावर आखायचे ! झाले आखून ?’ सरांच्या या विचारण्यावर होकारार्थी उत्तर आले, की मग सर सांगायचे -
‘दातार, डाव्या पानावर सर्वात डावीकडे लिहा - Dr म्हणजे डेबिट आणि उजव्या पानावर सर्वात उजवीकडे लिहा, Cr म्हणजे क्रेडिट ! आपल्याकडे रक्कम आली, की डेबिट आणि गेली की क्रेडिट ! हे लक्षात ठेवा, What comes is debit and what goes is credit ! लक्षात ठेवा आयुष्यभर !’ सरांचे कळकळीने सांगणे.
‘कुलकर्णी, हे पहा परिक्षेत बॅलन्स शीट चुकले, तर चूक शोधून दुरूस्त करण्याच्या फंद्यात पडायचे नाही. सरळ काट मारायची, आणि पुन्हा सोडवायचे. बरोबर येईल. चूक शोधायला जाल, तर सापडणार नाही. खाडीखोड होईल. वेळ जाईल, आणि उत्तर चुकेल ! दुसरे म्हणजे, तुम्हाला कोणीही उत्तर सांगण्याचा प्रयत्न केला, हो अगदी, काॅलेजच्या सरांनी पण, तरीही त्यांचे ऐकू नका. मी शिकवले आहे, त्याच पद्धतीने सोडवा. उत्तर बरोबरच येईल !’ सरांचा आत्मविश्वास बोलायचा.
रजिस्टर आखायचे कसे, हे इतके तपशीलवार का सांगत असावे, हे त्यावेळी समजत नाही, नंतर समजते. ट्रायल बॅलन्स, ट्रेडींग अकाउंट, प्राॅफिट ॲंड लाॅस अकाउंट व बॅलन्स शीट म्हणजे काय ? जर्नल एन्ट्रीज का करायच्या असतात ? त्यातील नोंदी कशा घेतात ? तिथंच त्या का घेतात ? प्राफिट ॲंड लाॅस अकाउंट आणि इन्कम ॲंड एक्पेंडिचर अकाउंट यांत फरक काय ? फिक्स्ड ॲसेट, वर्किंग कॅपिटल, ड्राॅईंग्ज, डिपाॅझिट्स, गुडविल वगैरे कशासाठी व कसे ठरवतात ? नोंदी घेतांना, त्या तशाच का घ्यायच्या ? नोंदीखाली काही वेळा, नॅरेशन का लिहायचे असते ? खूपखूप सांगीतले. गुडविल या विषयावर तर सरांनी पूर्ण दोन तास शिकवले होते. संगीताच्या एखाद्या घराण्याचा गुरू ज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या शिष्याला तालीम देतो, आणि एकेक तान व पलटा, त्याच्याकडून घटवून घेतो, त्यात अजिबात कुचराई त्याला चालत नाही, त्या शिस्तीने सर आम्हाला शिकवायचे. नाईक सरांचे विद्यार्थी हे ‘लॅंड ॲंड बिल्डिंग’ म्हटले, की बॅलन्स शीटच्या उजव्या पानावरील पहिल्या ओळीवरच लिहीणार ! दुसरी ओळ नाही !
कोणी विद्यार्थी आला नाही, की सरांनी दुसऱ्या दिवशी क्लासला त्याला विचारलेच ! समजले नसेल तर, क्वचित प्रसंगी पुन्हा शिकवायचे, मग ते !
‘भोकरीकर दोन दिवस क्लासला का नव्हता ?’ सर.
‘सर, काॅलेजतर्फे स्पर्धा होती, त्या तिथं गेलो होतो.’ मी.
‘तुम्ही सारखे गांवाला जाऊ नका. अभ्यासाकडे लक्ष द्या. तुमचा अभ्यास चांगला आहे. डायरेक्ट Probationary Officer’ व्हाल हो तुम्ही ! या स्पर्धा वगैरे काही काही कामाला येणार नाही. ऐका माझं !’ सर कळवळून सांगायचे.
दसरा व संक्रांतीला नमस्कार करायला, आम्ही चारपाच किलोमीटर सायकल पदाडत यायचो. सर त्यावेळी अगदी निवांत व आपुलकीने बोलायचे. सर आम्हाला, ‘फी जमा करा’ हे अशा स्वरात सांगायचे, की विद्यार्थ्यांचे सरांकडे काहीतरी घेणे आहे, आणि सर वेळ मागत आहे. सरांनी फी करता, कोणालाही कधी अडवले नाही. वैयक्तिक तर कधीच कोणाला बोलले नाही. त्यांना आम्हा विद्यार्थ्यांवर रागावणे पण जमत नसे.
‘भोकरीकर तुम्ही दांड्या का मारता क्लासला ?’ सर. मला यांवर काय उत्तर द्यावे, हे सुचत नसे. मी आपला गप्प !
‘भोकरीकर मी तुम्हाला रागावतोय ! हे तरी लक्षात येतंय काय तुमच्या ?’ सर. मी आपला काहीतरी उत्तर देऊन सुटका करून घ्यायचो.
सरांनी आम्हा विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारला, तर आमच्या सवयीप्रमाणे आम्ही उठून उत्तर द्यायला जायचो. सर कटाक्षाने, आम्हाला बसायला लावायचे, मग उत्तर द्यायला सांगायचे.
‘माझ्याबद्दलचा मान, आदर हा बोलण्यातून दिसला पाहीजे, वागण्यातून जाणवला पाहीजे. फक्त उठून बोललं म्हणजे आदर दिसत नाही. उठून उभं रहायचे, आणि सांगायचे, ‘सर तुम्हाला काही समजत नाही’ यांत काय अर्थ आहे ?’ सरांचे आम्हाला समजावणे, सांगणे हे असे वडीलधाऱ्या माणसाचे असे.
पहातापहाता आमची बी. काॅम. ची चार वर्षे झाली. मी बी. काॅम. झालो. नंतर एल्एल्. बी. ला प्रवेश घेतला. इकडे येणं खूपच कमी झालं ! सोबतची मित्रमंडळी पांगली. कोणी नोकरीला लागलं, कोणी बाहेरगांवी गेलं, तर कोणी एम् काॅम करायला प्रवेश घेतला. एल्एल्. बी. ला कोणी आलं नाही. त्यामुळे तिकडे तसा पण संपर्क आला नाही. मी पण वकीली करू लागलो. जळगांव सोडले. नाईक सरांनी पण जळगांव सोडल्याचे समजले. मध्यंतरी साधारणत: दहा-बारा वर्षांपूर्वी, एकदा माझा मित्र कोरान्ने भेटला होता. त्याचा पण जळगांवला अकाउंटन्सीचा चांगला क्लास आहे. त्याने ‘मध्यंतरी नाईक सर त्याचेकडे येऊन गेल्याचे सांगीतले. त्याचा क्लास पाहून सरांना खूप समाधान वाटले’ हे पण सांगीतले. मात्र सर पुण्याला आहे, यापलीकडे तो पण विशेष काही सांगू शकला नाही. त्यामुळं सरांचा पत्ता समजलाच नाही.
मध्यंतरी आयुष्यातल्या असंख्य घडामोडींमुळे, त्रासामुळे मला नाईक सर मला खूप वेळा सांगायचे ते आठवायचे ! अजून पण आठवते. आपल्या हितचिंतकांनी सांगीतलेले संकटाच्या वेळी प्रत्येकालाच आठवते.
मध्यंतरी एकदा असाच जळगांवला थांबलो होतो. सकाळच्या वेळी स्टेशनकडून फिरायला निघाले. सर्व ओळखीच्या जागा दिसल्या. नवीपेठेत बर्वे वाड्यापाशी आलो, तिथं आता सर्व नवीन इमारती झाल्या आहे. मला आठवणारे तिथं काहीही दिसत नव्हते. मला वाटलं, क्षणभर डोळे मिटावे, सांगता येत नाही, ऐकू येईल - ‘भोकरीकर, तुम्ही सारखे गांवाला जाऊ नका. अभ्यासाकडे लक्ष द्या. तुमचा अभ्यास चांगला आहे. डायरेक्ट Probationary Officer’ व्हाल हो तुम्ही ! या स्पर्धा वगैरे काही काही कामाला येणार नाही. ऐका माझं !’ ऐकू आलं, क्षीणपणे ! अजून काही ऐकू येईल, म्हणून ओल्या डोळ्यांनीच पुढे निघालो.
© ॲड. माधव भोकरीकर
(आपणांस पोस्ट आवडल्यास शेअर करू शकता.)

25.3.2020

No comments:

Post a Comment