Thursday, December 20, 2018

संत एकनाथ महाराज यांचे हे भारूड
अशी ही थट्टा ।
भल्याभल्याशी लावीला बट्टा ।।
थट्टा दुर्योधनाने केली ।
पांचाली सभेमाजी आणिली ।
गदाघायें मांडी फोडीली ।
अशी ही थट्टा ।।
थटटा गेली शंभोपासी।
कलंक लावीला चंद्रासी।
भगे पडले इंद्रासी।
बरी नव्हे थट्टा।।
थट्टा रावणाने केली।
नगरी सोन्याची बुडविली।
थट्टा त्याची त्याला भोवली।
बरी नव्हे थट्टा।।
संत एकनाथ महाराजांबद्दल काय आणि इतर कोणत्याही संत मंडळींबद्दल काय बोलणार ? ही थोर ज्ञानी मंडळी, आपल्याला काही चांगलं शिकवायला, पृथ्वीवर आली होती. त्यांनी शिकवलेल्यातून काही जण थोडेफार शिकले, ते भवसागर पार झाले. काही मात्र काहीही शिकले नाही, तसेच गधडे राहीले. काही तर इतके काही दिव्य निघाले, की ते स्वत:लाच त्यांच्यापेक्षा ‘शहाणे’ समजून बिचाऱ्या संत मंडळींचीच अक्कल काढू लागले किंवा त्या संबंधी आपली अक्कल पाजळू लागले.
थट्टा ही शक्यतोवर विनोदाचा शिडकावा करणारी व समर्पक असावी, जीवघेणी नसावी. थट्टेतून समोरच्याला आपली चूक कळली आणि त्याने ती चूक दुरूस्त केली, तर ती थट्टा, मार्गदर्शनाचे काम करते. आपण इतकी पण थट्टा करू नये की आपण व आपले वर्तन नेहमीसाठीच थट्टास्पद म्हणून घेतले जाईल.

७. ९. २०१८