Friday, June 2, 2017

एका डॉक्टरची आठवण

एका डॉक्टरची आठवण


साधारणपणे १८-१९ वर्षांपूर्वीची गोष्ट ! मला तेव्हा कोर्टातून घरी यायला साधारणत: संध्याकाळचे साडेपाच सहाच व्हायचे. घरी आल्याबरोबर मुलाला लगेच घेवून 'रोकडा हनुमान' मंदीरात घेऊन जावे लागे, ते देखील कड्यावर ! मुलगा वर्ष-दीडवर्षाचा असेल ! मंदीर आले की तो कड्यावरून खाली उतरायचा, हनुमानाला नमस्कार करायचा, पुन्हा कड्यावर घ्यायला लावायचा, 'टण्णऽऽऽ, टण्णऽऽऽ' मंदीरातील घंटा त्याच्या ताकदीप्रमाणे काही वेळा वाजायची, काही वेळा चुकायची ! मग राग यायचा त्याला, तो माझा ! असंच असतं, आपली झालेली फजिती जो पहातो, फजिती ज्याला समजते त्याचाच आपल्याला राग येतो. मानवी स्वभाव ! हा लहानपणापासून दिसतो. आम्ही तेथे गेल्यावर मग हा करणार धडपडत मारूतीला प्रदक्षिणा, ती पण माझी प्रदक्षिणा पूर्ण होण्याच्या अगोदर ! ही प्रदक्षिणा मात्र त्याची नेहमीच माझ्या अगोदर पूर्ण व्हायची; कारण पडला, धडपडला तर सावरावे लागणार ते आपल्यालाच !
त्याला जेमतेमच चालता यायचे, त्यामुळे मी त्याला मंदीरापर्यंत कड्यावरच न्यायचो. दुसरं म्हणजे आमच्या घरापासून ते मंदीरापर्यंत मोठा वाहतुकीचा रोड होता, पण वाहतूक खूप असल्याने मी त्या वाहत्या रस्त्याने याला कडेवर घेवून जायचो नाही, जायचे तर तर कॉलनीतल्या रस्त्याने, मोकळ्या प्लॉटमधून जायचो. पण कॉलनीतला रस्ता म्हणजे हनुमानाचे मंदीर दुरून दिसायचे त्या दिशेने चालत रहायचे. पायवाटेने, कोणाच्या अंगणातून, कोणाच्या रिकाम्या प्लॉटमधून, मग आपोआप मंदीर यायचे ! कड्यावर मुलगा असल्याने किंवा कड्यावर घेवून चालता येत नसल्याने, छोटेछोटे गड्डे दिसायचे पण नाहीत. काही काटेरी झुडूपे पण असायची वाटेत.
एकदा असाच त्याला घेवून जात होतो, पायाखालचा गड्डा दिसला नाही. पाय गरकन् फिरल्यासारखा वाटला. मी मटकन खाली बसू पहात होतो पण कसाबसा सावरलो, मुलगा कड्यावर होता; खाली पडला असता. त्याच्या हे गांवी पण नव्हते. कसाबसा लंगडतच हळूहळू मंदीरावर गेलो. त्याचे नेहमीचे सोपस्कार म्हणजे 'टण्णऽऽऽ', प्रदक्षिणा वगैरे सर्व झाले व मी त्याला घेवून कसाबसा घरी आलो. बसलो. पाय सुजलेला वाटत होता. रात्री आंबेहळद, रक्ताबोळ व सैंधव मीठ पाण्यात एकत्र उगाळले, तो लेप गरम केला व पायाला सुजलेल्या भागाला लावला. सकाळी थोडा फरक वाटत होता.
एकदोन दिवस असेच गेले. मी तसा दवाखान्यात जावून आलो होतो. औषध पण घेतले होते. माझा पाय तसा बरा होता, पण एखादेवेळी चालताचालता पायातून अशी काही जबरदस्त कळ निघायची की वर्णन करता येणार नाही. जसजशी ही बातमी पसरली तसतसा प्रत्येक जण डॉक्टर, वैद्याच्या भूमिकेत जावून सल्ले देवू लागला. सरतेशेवटी यांवर सर्वांचे एकमत झाले की रसलपूरला श्री. कावडकर भाऊकडे नेल्याशिवाय उपयोग नाही.
दुसरे दिवशी माणसासोबत रसलपूरला श्री. कावडकरांकडे गेलो. घर खेड्यातले, पायऱ्या चढून वर गेलो, खाटेवर बसलो. चहापाणी झाले. 'काय झाले ?' कावडकरांनी विचारले. स्वच्छ धोतर, पांढरा सदरा, पांढरी पिळदार मिशी, मोठे कपाळ, त्यांवर पांढरे गोपीचंदन व काळा बुक्का, धारदार सरळ नाक आणि आपुलकीचा कडक आवाज ! सर्व हकीकत सांगीतली. त्यांनी पायाचा पंजा चाचपून पाहिला आणि एका ठिकाणी जोरात दाबले. मी ताड्कन उठून उभा राहील अशी स्थिती निर्माण झाली. माझ्या चेहऱ्यावर आलेले भाव त्यांनी पाहिले. 'हं, इथं दुखणं आहे.' ते म्हणाले. त्यांच्या जवळील कसलेसे जेलीने पाय चोळला. 'आपल्या हरिभाऊंच्या दुकानातून पॅरोक्स जेल घ्या. दोनतीन दिवस चोळा. बरं वाटेल.' कावडकर म्हणाले. मला त्यांनी सांगीतलेले औषध समजेना, 'तुम्ही कावडकरांनी सांगीतले, हे सांगा. बरोबर समजेल.' त्यांनी स्पष्टीकरण दिले. पैसे किती विचारल्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला. माझ्या औषधाचे नांव लक्षात होते. दुकानांत गेलो, नांव सांगीतल्यावर, 'कावडकरांकडे गेले होते का ?' दुकानदारानेच विचारले, मी होकार दिला. त्यांच्या सांगण्याप्रमाणे उपाय सुरू होते.
दर गुरूवारी मी जळगांवी जायचो, जिल्हा कोर्टात ! या वेळी ठरवले, डॉक्टरांना दाखवायचेच ! डॉ. घन:शाम कोचुरे, हाडांचे प्रसिद्ध डॉक्टर ! त्यांना अगोदर एका केसमधे साक्षीसाठी बोलवले होते. घरमालक व भाडेकरूंची केस होती. घरमालक वरच्या मजल्यावर आणि भाडेकरू खाली रहात होते. घरमालकांना सारखे उतरचढ करणे त्यांच्या गुढग्यांना त्रासदायक होते. यांचा औषधोपचार सुरू होता. साक्ष उत्तम झाली पण उशीर झाला. मी साक्षीची फी विचारल्यावर त्यांनी नकार दिला. मात्र त्यांनी बोलून दाखवले, 'काय फी घेणार ? सर्व पेशंट सोडून यावे लागते. कोर्टातील साक्षीपेक्षा पेशंटवरचे वेळेवर उपचार महत्वाचे आहेत. पण यावे लागते.' त्यांचे बोलणे स्वच्छ, सरळ, राग न येणारे पण नेमकी तक्रार मांडणारे होते. खरं होतं त्यांचे म्हणणे.
हा त्यांचा अगोदरचा अनुभव होता. त्यांच्याकडे या पायाच्या निमित्ताने गेलो. दुपारी उशीराच गेल्याने गर्दी कमी होती. अगोदर दोनतीन पेशंट होते. ते झाले, मी आंत केबिनमध्ये गेलो. डॉक्टर बसले होते. काळसर रंगाचे, डोक्यावर वाढलेले मानेवर रूळणारे केस ! चष्मा टेबलावर पडलेला. नांव सांगीतले, भोकरीकर नांव ऐकल्यावर 'रावेरचे का ?' त्यांनी विचारले. 'हो.' मी उत्तरलो. 'काय झाले ?' त्यांनी विचारले. मी सर्व हकीकत सांगीतली. 'त्या रसलपूरला धनगर आहे एक --' त्यांचे बोलणे मधेच तोडत मी होकार भरला व ती पण हकीकत सांगीतली. त्यांनी पाय बघीतला. फ्रॅक्चर नाही. या गोळ्या घ्या, बरं वाटेल.' डॉ. कोचुरे म्हणाले. माझा चेहरा पाहिल्यावर 'ठीक आहे. गरज नाही, पण एक्स रे काढू.' ते म्हणाले. त्यांनी माणसाला बोलावले, एक्स रे काढण्यास सांगितले व मला सोबत जा म्हणून सांगीतले. एक्स् रे काढला व मी मग पुन्हा डॉक्टरांकडे येवून बसलो. मग गप्पा सुरू झाल्या.
मी बसलो. 'अहो, मी पण तिकडचाच, बलवाडी जवळचा !' त्यांचे उत्तर ! घरची परिस्थिती काय सांगणार तुम्हाला ? माझे वडील तर जेमतेम नोकरी असलेले.' गप्पा सुरूच होत्या. 'तुमच्या सारख्यांत खूप राहिलो.' अजूनही बऱ्याच गप्पा झाल्या. सज्जनपणा, साधेपणा साक्षात समोर गप्पा मारत होता. तेवढ्यात एक्स् रे आला. त्यांनी बघीतला. 'वकिलसाहेब, नारळ फोडा. काही नाही.' औषधांची चिठ्ठी लिहीत बोलले. त्यांना मागील ही आठवण सांगीतली. 'तुम्हाला माहिती आहे मी कोणत्या गांवातून, कशा समाजातून, कशा परिस्थितीतून शिकलो आणि इथपर्यंत पोहोचलो. आपल्याला वैद्यकीय सोयी काहीही मिळत नाही, या अशा जेवणाची पण भ्रांत असलेल्या लोकांना तर नाहीच. त्यांच्यातून झालेलो आहे मी डॉक्टर ! त्यांच्याकडे पहायचे सोडून, काय दिखाव्याची कामे करणार ? येत चला अधूनमधून !' आणि त्यांचा निरोप घेतला. नंतर दुखणे बरे झाल्याने, त्यांच्याकडे जाण्याचे काही पुन्हा काम पडले नाही.
आज श्री. प्रदीप रस्से यांनी लिहीलेले सकाळी वाचलं आणि हे सर्व डोळ्यापुढे आले.


३० मे, २०१७

No comments:

Post a Comment