Saturday, June 3, 2017

अवेळी येणारे हसू

अवेळी येणारे हसू

सन १९८०-८१ मधील प्रसंग ! मालेगांवला राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा होती, ती तीन दिवस चालत असे. मी आणि माझा मित्र, प्रमोद आम्ही जळगांवहून मालेगांवला गेलो. तेथे राज्यातील वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या स्पर्धकांना उतरण्यासाठी रेस्टहाऊसला व्यवस्था केली होती, चांगली होती ! संडास बाथरूम पण चांगले असतील हा अंदाज होता !
मी व माझा सहकारी एका खोलीत होतो, शेजारी कोणी दुसऱ्या कॉलेजचा संघ होता ! माझा सहकारी शेजारी खोलीत दुसऱ्या महाविद्यालयाच्या स्पर्धकांशी गप्पा मारत होता. कॉलेजच्या दिवसांत एकमेकांशी ओळख व्हायला, ती दृढ व्हायला वेळ लागत नाही कारण ही ओळखीमागे कोणताही स्वार्थ नसतो म्हणूनच शालेय व महाविद्यालयीन ओळखी दीर्घकाळ टिकतात !
सकाळी मला प्रमोदच्या नांवाने मोठमोठयाने कोणी हाका मारल्यासारखे वाटले, उठून पहातो तर प्रमोद जागेवर नाही ! समोर लाईट लागला होता. संडासमधून जोरजोरात आवाज ऐकू येत होता. 'हं, लाथ मार, जोरात ! त्या शिवाय उघडणार नाही.' मी 'काय झाले ?' हे विचारले. 'संडास उघडत नाही, दरवाजा पक्का लागला म्हणून हा दरवाज्यावर लाथ मार म्हणून सांगतो आहे.' त्याने उत्तर दिले. अजबच समस्या उभी राहिली होती. कसाबसा दरवाजा उघडला. दोन्हीतून सुटल्याच्या भावनेने तो आतला जीव बाहेर आला. आल्याबरोबर 'अरे, या विचित्र गोंधळापेक्षा शेजारच्या संडासात गेला असता' मी निष्कारण सुचवले.
'शेजारच्याला आंतून कडी नाही म्हणून मी लगेच इकडे आलो तर हा इतका पक्का बसला की आंतून उघडेनाच ! काय चमत्कारिक व्यवस्था आहे.' तो करवादून म्हणाला ! त्यानंतर तीन दिवस आळीपाळीने हे काम तेथे असलेल्याला करावे लागे.
आज काहीही कारण नसतांना मला हसू आले, असे हिला वाटल्यावर, हिने खोदूनखोदून विचारल्यावर, नाईलाजाने सांगावे लागले. सांगून टाकले, शंका नको, मी मनाशीच एकटा का हसतो म्हणून !

२६ ऑगस्ट २०१६

No comments:

Post a Comment