Friday, June 2, 2017

पृथ्वीचे प्रेमगीत - श्री. नंदकुमार बालाजीवाले सर

पृथ्वीचे प्रेमगीत - श्री. नंदकुमार बालाजीवाले सर

आता सध्या न्यायालयाला उन्हाळ्याची सुटी ! मी शाळेत, महाविद्यालयांत शिकत असतांना शाळा वा महाविद्यालयांस सुटी लागत असे. मग या न्यायालयाच्या सुटीत मला माझ्या शालेय वा महाविद्यालयांतील सुटी आठवते आणि मी असे काहीतरी मुलांना सांगतो. मुलांना गंमत वाटते, ते म्हणतात - 'बाबा, तुम्हाला असे काहीतरी जुने कसे काय आठवते ? आम्हाला कसे असे काही आठवत नाही ?' त्यांना सांगतो, 'आपले मन हे असे काही विसरत नाही. आपल्याला आपोआप आठवते. परिक्षेच्या वेळी पहा, आपल्याला बऱ्याच वेळा वाटते की 'हा एवढा अभ्यास, आपल्याला काय आणि कसा आठवेल परिक्षेच्या वेळी ?' पण आठवतो ना ? मनाचे असेच असते. आपल्या काही आठवणी आठवतात कुठल्याही घटनेने वा कारणाने !'
आज अचानक मला सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर येथील श्री. बालाजीवाले सर म्हणजे नंदकुमार बालाजीवाले सर यांची आठवण आली. त्यांना संगीतात रूची होती, ते स्वत: तबला वाजवीत. मी माझ्या शालेय जीवनांत तबलावादनातील पहिले ताल त्यांच्याचकडे शिकलो. शाळेचे गॅदरिंग जेव्हा असे तेव्हा त्यांचा मुलांचे / मुलींचे नाटक, गाणी, नृत्य बसविण्याचा उत्साह उतू जात असे. कोणती एकांकिका बसवायची ? कोणत्या नाटकांतील एखादा प्रसंग बसवायचा ? यांतून मुलांना त्याच्या या अशा वयांत काय शिकवता येईल ? सुदैवाने त्यावेळी मराठी पाठ्यपुस्तक मंडळ बऱ्यापैकी काळजी घेवून धडे, कविता निवडत ! आता देखील निवडत असेल ही अपेक्षा आहे.
त्यांना मराठी शिकवायला खूप आवडत असावे असे आम्हाला वाटे, कविता तर ते फारच सुंदर शिकवीत. कवितेतील विविध शब्दांचे इतके काही तपशीलवार विवेचन करीत की कविता करतांना कविंच्या मनांत काय असू शकते, कवितेचा अर्थ कसा लावला पाहिजे, त्यावेळी काय अपेक्षित असते हे सर्व रसग्रहण इतक्या सुंदर पद्धतीने ते सांगत आणि त्यासोबत इतरही अवांतर संबंधीत सांगत की त्या कवितेवर एक परिपूर्ण व सुंदर व्याख्यान ऐकल्याचे समाधान आजही जाणवते. त्यावेळी इतके समजण्याचे वय कुठे होते, पण आता जाणवते. या मंडळींचा आपल्या आयुष्यातल्या यशापयात, आपल्या जडणघडणीत किती मोठा व महत्वाचा वाटा असतो नाही ? आपण आपले शालेय, महाविद्यालयीन शिक्षण संपवून जीवनाच्या शाळेत जेव्हा शिकायला लागतो, तेव्हा ते महत्व आपल्याला समजू लागते.
आम्हाला ते दहावीला मराठी शिकवायला होते. त्यांनी शिकविलेल्या कविता व धड्यांपैकी 'पृथ्वीचे प्रेमगीत' ही कुसुमाग्रजांची कविता आणि त्यांचाच 'कुणीही कुणाचे नसते' हा 'नटसम्राट या नाटकातील उतारा ! तसेच 'अश्रूंची झाली फुले' या वसंत कानेटकरांचे नाटकातील उतारा ! हे धडे व कविता त्यांनी आम्हाला शिकविली होती. कुसुमाग्रज व वसंत कानेटकर दोन्ही साहित्यिक हे योगायोगाने नाशिकचे !
आमचे शालेय वय ! तेव्हा 'पृथ्वीचे प्रेमगीत' आणि त्यातील उत्तुंग विचार समजण्याएवढी बुद्धी आणि त्या मागची भावना समजण्याएवढी पात्रता आमच्याजवळ कुठे असणार ? पण त्याला डगमगणारे बालाजीवाले सर नव्हते, त्यांचा आपल्या शिकवण्यावर, मी तर म्हणेल त्यांच्या वाचण्यावर व सादरीकरणावर प्रचंड विश्वास होता. त्यांनी धडा किंवा कविता नुसती वाचून जरी दाखविली तरी तेच इतके प्रभावी असे की त्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा समजाविण्यासारखे काही रहात नसे.
मला आजही त्यांनी 'पृथ्वीचे प्रेमगीत' ही कुसुमाग्रजांची कविता शिकविण्याची केलेली सुरूवात आठवते, मंदारमाला या वृत्तातील ही कविता -
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना ।
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करावी प्रीतिची याचना ।
त्यांनी त्यावेळी कविता वाचनांस असा काही स्वर लावला की त्या स्वराच्या सामर्थ्याने वर्गात एकदम शांतता पसरली आणि वातावरण गंभीर झाले. सर शिकवत होते, पुढीलपुढील ओळी ऐकू येत होत्या, त्या कानाला का मनाला का ह्रदयाला हे मात्र समजत नव्हते. आमचे चेहरे हिरमुसले होते. सरांचा स्वर लागला तो करूण होता का विरही होता का निर्धाराचा होता हे आजही नक्की सांगता येणार नाही, इतक्या संमिश्र भावना त्यांत होत्या. त्या स्वरांत ते वाचत होते -
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे ।
काय भव्य कल्पना ! आम्हाला आम्ही अंतराळात फिरत आहोत आणि तेथे हे संवाद ऐकत आहोत असे वाटत होते. सौरमालेतील विविध ग्रहांचे दर्शन पृथ्वीला एक स्त्री कल्पून कसे दिसत असेल ही विलक्षण भव्य कल्पना कुसुमाग्रजांची ! तिचे प्रियकर म्हणून हे तिला रिझविण्यासाठी कसे वागत आहे, काय करत आहे हे सुंदर व तेवढ्यांच भव्यतेने सांगीतले आहे. मात्र इकडे ही पृथ्वी ज्याच्यासाठी झुरते आहे तो सूर्य काही तिच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. पृथ्वीला त्याच्या मोठेपणाची व भव्यतेची कल्पना आहे, म्हणूनच ती धावते आहे ना त्याच्या मागे इतकी युगे ! संपूर्ण कविता ही चेतनागुणोक्ती अलंकाराचे सुंदर उदाहरण आहे.
शेवटी कुसुमाग्रज म्हणतात, पृथ्वीला तिच्या लघुत्वाची, तिच्या छोटेपणाची कल्पना आहे; त्याचबरोबर सूर्याच्या मोठेपणाची व भव्यतेची पण कल्पना आहे. प्रेम भव्यतेवर करावं, क्षुद्रतेवर नाही. प्रेम उजेडावर, तेजावर करावे अंधारावर, मालिन्यावर नाही. प्रेम आपल्याला, जगताला प्रकाशमान करणाऱ्यावर करावे त्याला अंधारात लोटणाऱ्यावर नाही. आपल्याला तेजात न्हावू घालेल, आपल्याला उजेडांत आणेल त्याच्यावर प्रेम करावं आपल्याला अंधारात ढकलेल, आपल्याला अंधारात तोंड लपवावे लागेल अशावर नाही. पृथ्वीला माहिती आहे, आपली व सूर्याची योग्यता ! ती शेवटी म्हणते,
अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलीकण ।
अलंकारण्याला परि पाय तुझे
धुलीचेच आहे मला भूषण ।
कविता संपली, सर कविता वाचून खुर्चीवर बसले, आता कवितेत विद्यार्थ्यांना समजाविण्यासारखे काहीच राहिले नव्हते, कविता पूर्ण समजली होती: असे म्हणण्यापेक्षा कवितेचे पूर्ण आकलन झाले होते.
आणि मला उगीचच भास झाला की आमचे ढोळे पाणावले का आमच्या वर्गाच्या भिंतीतून हुंदक्याचा स्वर आला !
(पूर्वी येथे टाकलेली होती, थोडा बदल करून आज पुन्हा)

९ मे २०१७

No comments:

Post a Comment