Friday, June 2, 2017

खरा मित्र फेसबुकवर भेटतो

खरा मित्र फेसबुकवर भेटतो

काही वेळा एखादी घटना बघीतल्यावर, त्याच्याशी संबंधीत असलेली किंवा नसलेली देखील घटना आठवते, उगीचच ! काही कारण सांगता येत नाही त्याचे.
दोन तीन दिवसांपूर्वीची घटना ! मी माझ्या मित्राशी बोलत होतो. तो भारतात नसतो, बाहेरील देशांत असतो. एक मात्र नक्की, या फेसबुकने मला माझ्या जुन्या काही मित्रांची भेट घडवून आणली, की जी एरवी जवळपास अशक्यच होती; त्यातलाच हा एक ! एक-दीड वर्षांपूर्वी त्याची भेट झाली होती, ती त्याच्या मुलाच्या लग्नात ! त्यापूर्वी त्याची भेट जवळपास २५-३० वर्षांनीच झाली होती. तो भारतात आला होता, पुण्याला ! मुद्दाम पुण्याला गेलो होतो भेटायला. त्याचा भाऊ असतो तिथं. गप्पा, जेवण व जेवतांना गप्पा, त्यानंतर पुन्हा गप्पा झाल्या. घरातील मंडळीना आपल्या गप्पांच्या पोतावरून व त्यांतील स्वरावरून आणि गप्पांत व्यक्त होत असलेल्या काळावरून आपल्यातील जवळीक, ओलावा वा दुरावा बरोबर समजतो. सरदार जी. जी. हायस्कूलला आम्ही बरोबर होतो.
तर काय, तो फेसबुकवरून जवळपास अदृश्य झालेला आहे. 'वेळ फार जातो त्यात, तुझे अधुनमधून वाचतो.' ही त्याची प्रतिक्रिया ! खरंय ते. मुलांच्या शिक्षणाबद्दल बोललो कारण आमच्या शिक्षणाबद्दल आता काय बोलणार ? जे काही आमचे शिक्षण झाले आहे, आमच्या आईवडिलांनी केले आहे, त्या आधारावर आम्ही पुढे आलो. आता आम्हाला काळजी आहे, ती आमच्या मुलांच्या शिक्षणाची, त्यांच्या भवितव्याची ! त्याच्या स्वरातून माझ्या मुलांबद्दलची काळजी दिसत होती. आपली मुले कितीही खंबीर व कर्तृत्ववान असली तरी पालकांना काळजी असतेच; फक्त अडचण एवढीच असते की मुलांना ती बऱ्याच वेळा नीट समजत नाही. मुले पालक झाल्यावर त्यांना समजते. हे रहाटगाडगे सुरूच असते. हा सृष्टीचा नियम आहे, माणूस काय किंवा पशुपक्षी असो !
त्याच्याशी बोलणे झाले, फोन ठेवला. एकदम आठवली ती मला बहुतेक पाचवीला असलेली इंग्रजीतील कविता. त्यावेळी कवीचे नांव वगैरे काही माहिती नव्हते, आता पाहिले; पण कविता जवळपास पाठ होती. याबाबत मी परमेश्वराचा ऋणी आहे. मी वाचलेले त्यावेळी मला समजो का न समजो, ते माझ्या डोक्यात पक्के असते. त्याचा अर्थ जसजसा लागेल तसतसे ते बाहेर येते. या कवितेचा त्यावेळी जो काही अर्थ समजला असेल किंवा नाही कोण जाणे ? पण आता समजतंय की समजला नव्हता. शैक्षणिक कारकिर्दीत मिळालेल्या गुणांवरून त्याची समज व एकंदरीत गुणवत्ता ठरविणे कदाचित चुकीचे ठरू शकते हे मात्र मला समजले.
लॉर्ड अल्फ्रेड टेनिसन (सन १८०९-१८९२) या महान कविची ही कविता ! यांतील अर्थ समजायला लागणारा काळ पहाता, ही कविता त्या महान कविने लहान मुलांसाठी लिहीली होती हे कोण म्हणेल ?
WHAT does little birdie say
In her nest at peep of day?
Let me fly, says little birdie,
Mother, let me fly away.
Birdie, rest a little longer,
Till the little wings are stronger.
So she rests a little longer,
Then she flies away.
What does little baby say,
In her bed at peep of day?
Baby says, like little birdie,
Let me rise and fly away.
Baby sleep, a little longer,
Till the little limbs are stronger,
If she sleeps a little longer,
Baby too shall fly away.

१९ मार्च २०१७

No comments:

Post a Comment