Friday, June 2, 2017

बापरखुमादेवीवरू म्हणणारी ज्ञानोबा माउली

बापरखुमादेवीवरू म्हणणारी ज्ञानोबा माउली

समाजासाठी, आपल्या कार्यासाठी आपल्या नांवाचासुद्धा त्याग करणारी खूप माणसं आपल्याकडे होवून गेली. त्यांनी स्विकारलेले नांव, त्यांना समाजाने दिलेले नांवच त्यांची ओळख बनून गेले. आपल्याला जी नेहमी त्यांची ओळख पटते ती या अनोळखी, त्यांच्या नसलेल्या नांवाने ! त्यांचे कर्तृत्व हेच खूप मोठे असल्याने त्यांची आपल्याला ओळख पटते ती त्यांच्या कर्तृत्वातून ! समाजाने त्यांना कदाचित कमालीचा त्रास दिला असेल .
संत रामदास, गोस्वामी तुलसीदास, स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद किती नांवे सांगावीत ! माऊली, नेताजी, महात्मा, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर, आद्य क्रांतीकारक, पंजाबचा सिंह, आचार्य, लोकनायक, प्रियदर्शिनी वगैरे लिहीले तरी त्या व्यक्ती समोर उभ्या रहातात.
समाजाने त्याकाळी दिलेल्या त्रासांचा बाऊ न करता आणि नंतर दिलेल्या मानसन्मानानाने हुरळून न जाता, लाभालाभाचा विचार न करणारी ही मंडळी आपल्याला खूप काही देवून गेली आहे. त्यांनी आपल्याला कायकाय दिले आहे, हे समजण्यात आमचे आयुष्य गेले आमच्या पिढ्यानपिढ्या गेल्या तरीही आम्ही अजूनही पूर्ण समजू शकलो नाही.
सकाळी औरंगाबाद आकाशवाणीवर लता मंगेशकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वरांचा अभंग लागला होता. त्यांच्या अभंगातील त्यांची ओळख दर्शविणारी ही साद - 'बापरखुमादेवीवरू' ! ज्या आपल्या 'संन्याशाच्या' मुलांची मौंज लागावी म्हणून समाजाने दिलेली देहांत पायश्चित्ताची शिक्षा मनावर दगड ठेवून, आपल्या मुलांना एकाकी टाकून, स्विकारली ते विठ्ठलपंत आणि त्यांची सहधर्मचारीणी ! लहानपणीच दृष्टीआड झालेले आईवडील काय आठवणार आहेत मोठेपणी ? आपले आईवडील या लहान बालकांना का सोडून गेले हे खरोखर समजले तरी असेल का हो त्यांना ? त्याचे परिणाम तरी समजले असतील का ? आम्हाला देवत्व चिकटविण्याची घाई झाली असते. माणूस म्हणून आम्ही विचार कुठे करतो ?
बालपणापासून केलेल्या संस्काराचा भाग आणि सदासर्वकाळ संकटात धीर देणारे म्हणून त्याच्या डोळ्यांसमोर त्यांचे जन्मदाते आईवडील येत नसतील तर खरोखर आईवडीलांचे रूपात येत असतील प्रत्यक्ष जगन्नियंता आणि जगन्माता, विठ्ठल-रखुमाई ! परमेश्वरमय झालेले त्यांचे निर्विकल्प मन आणि शरीर, हे त्या विठ्ठल-रखुमाईपेक्षा अजून दुसऱ्या कोणाला साद घालणार, कोणाची आठवण करणार ?
ज्ञानदेवांच्या अभंगातील शेवटी 'बापरखुमादेवीवरू' ही आर्त साद ऐकल्यावर मला पण त्या ज्ञानोबा माऊलीचे जीवन आठवून, त्यांनी भोगलेल्या वेदना आठवून फक्त 'विठ्ठल-रखुमाईचीच' आठवण येते आणि माझ्या डोळ्यातील पाणी त्याला केव्हा प्रतिसाद देते हे माझे मलाच समजत नाही.

८ जानेवारी २०१७

No comments:

Post a Comment