Saturday, June 3, 2017

कृष्णामूर्थी - चेन्नईचा रिक्षावाला

कृष्णामूर्थी - चेन्नईचा रिक्षावाला

गेल्या दोन्ही वेळेस चेन्नईचा एकच रिक्षावाला मी कामासाठी फिरण्यासाठी सांगतो आहे, कृष्णमूर्ती नांव आहे त्याचे ! त्याची इच्छा मी त्याच्या रिक्षातून फिरत रहावे अशी असते; माझे येथील काम हे त्याच्या दृष्टीने दुय्यम असते अर्थात मी ज्या कामाला आलो आहे ते काम देखील मी करायला पाहिजे असेही त्याला वाटते, तो त्याचा चांगुलपणा !
काल ऐनवेळेस तिसऱ्या ठिकाणी जावून एक कागद आणायचा होता. हे आपणास ऐनवेळेस समजल्यानंतर आणि जेथे जायचे आहे, ते ठिकाण तीन किलोमीटरवर असून फक्त अर्धा तास आपल्याजवळ आहे हे समजल्यावर आणि या सर्वांना समजत असलेल्या हिंदी किंवा इंग्रजी भाषेची परिस्थिती पहाता, त्याने त्याच्या त्यावेळेला शाळेची मुले सोडायची असतांना देखील ज्या तडफेने रिक्षा हाकून मला त्या ठिकाणी नेले, याचे कौतुक निश्चितच करायला पाहिजे. तेथून तो कागद घेवून पुन्हा पहिल्या ठिकाणी पोहोचतां करायचा असल्याने तत्परतेने पुन्हा पहिल्या ठिकाणी आणून सोडणे आणि 'डोऽन्ट वरीऽऽ, कोऽल मी टेऽन मिनीऽटस् बिफोर, व्हेन यू वांऽन्ट टू रीऽटन यूवर होऽटेल' असे सांगून धीर देवून निघून गेला. संध्याकाळी परतायला बराच उशीर झाला. कुरकुर नाही. सकाळी साडेपाचला यायला सांगीतल्यावर, 'आई वीऽल बी हिऽयर, फाऽयू थर्टी अेट मोऽर्नींग' असे सांगून गेला.
सकाळी बरोबर माझा मोबाईल ५.२५ ला वाजला ! 'आय्यम हियर, रेऽडी'. रिक्षात बसलो, तो सुसाट निघाला. एका ठिकाणी थोडे थांबून, बजावून निघायचे होते ते झाले. परत विमानतळावर यायचे होते म्हटले, 'रस्त्यात काही तरी खावून घ्यावे'. मी कृष्णमूर्तीला सांगीतले. त्याने 'ओऽक्के' म्हणत संभाषण संपविले, रिक्षा सुसाट चालली. तो थांबायचे नांव घेईना. मी दोनदा प्रयत्न करून पाहिला, त्यावर 'वेऽट्ट' हे उत्तर ! मला वाटले याला बऱ्यापैकी भाडे घेवून पळायचे असेल, खाण्यापिण्यात वेळ घालवायचा नसेल. विमानतळ जवळ आल्याची खूण दिसायला लागली. शेवटी तो त्याच्या मनाने थांबला, 'हिऽयर, बेऽस्ट ईऽडलीऽऽ' ! मला उतरविले, मी त्याच्या मागोमाग एका बऱ्यापैकी हॉटेलात आलो.
त्याने त्यांच्याच भाषेत सूर लावून 'ईडलीऽऽ' आॅर्डर दिली. मग त्याला जाणवले, वडा देखील हवाच ! पुन्हा तसाच सूर लावून 'वऽडा' सांगीतले. माझ्यासमोर इडली, सांबार, वडा आणि दोन प्रकारच्या चटण्या आल्या ! त्यांची चव घेतल्यावर मग मला कृष्णमूर्तीच्या 'वेऽट्टऽ' चे रहस्य उमगले !
आजपर्यंत मला आवडलेला वडा-इडली-सांबार हा लातूर बसस्टँडच्या बाहेर आल्यावर थोडे बाहेर गेल्यावर एका हातगाडीवरचा होता. त्यानंतर त्याच्याशी समर्थ स्पर्धा करून ती जिंकली बासर येथील सरस्वती मंदीराच्या आवारातील एका हॉटेलने ज्याने केळीच्या पानावर हे पदार्थ वाढले होते. पण आज सकाळी या कृष्णमूर्तीने मला जेथे कोठे नेले ते ठिकाण आता बासर येथील हॉटेलच्या ज़बरदस्त स्पर्धेत आले आहे. मला तर वाटते हे काकणभर सरसच आहे ! मला घाई होती म्हणून मी निघालो, एवढेच सांगतो !

३१ जुलै २०१६

No comments:

Post a Comment