Friday, June 2, 2017

माझ्या अभ्यासाची काळजी घेणारे शेजारी

माझ्या अभ्यासाची काळजी घेणारे शेजारी

मी १० वी ला होतो. त्यापूर्वी दोनच वर्षांपूर्वी शालांत परिक्षा म्हणून १० वी ची परिक्षा सुरू झाली होती. त्या अगोदर 'मॅट्रीक'ची परिक्षा म्हणजे ११ वी ही शालांत परिक्षा असे. त्या परिक्षेचा दरारा तो पर्यंत टिकून होता, कारण विद्यार्थ्यांना मार्कस् बरेच कमी मिळत व रिझल्ट तर फारच कमी लागे. बहुतेक ३०-३५% लागे, त्यामुळे परिक्षेत सहीसलामत सुटणाऱ्यांना फारच मान असे.
परिक्षा सुखरूप पार पडावी असे वाटत असल्याने विविध देवदेवतांचे पण काम वाढलेले असायचे. परिक्षेची साडेसातीरूपी पीडा सुटावी म्हणून 'शनि महाराज' यांचेकडे फेरी असे तर विद्येची देवता म्हणून गणपतीचे मंदीर गर्दीने ओसंडून वहात असे. दैवी पाठींबा हा आपले कर्म चांगले असेल तरच प्रत्ययाला येतो. या श्रद्धेने नियमीत अभ्यास हाच सोपा आणि भरवशाचा मार्ग असे. सकाळी पहाटे उठायचे, ते पण अभ्यासाला हे सोपे काम नसायचे.
झोप आणि अभ्यास यांचे काय साटेलोटे आहे काही समजत नाही. सिनेमा पाहतांना, गाणे ऐकतांना, टवाळक्या करत फिरत असतांना टक्क उघडे असणारे डोळे पुस्तक हातात आल्यावर गपागप का मिटू लागतात, हा प्रश्न आजवर कोणी सोडविला आहे का ? मित्रांबरोबर फिरणे व ते पण परिक्षेच्या काळांत याला पालक मंडळी टवाळक्या असे म्हणतात आणि त्यावेळचे आम्ही अभ्यास कसा करावा याची एकत्रितपणे करत असलेली तयारी म्हणत असू.
मात्र शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या मुलांनी पण अभ्यास केला पाहीजे, त्यांना पण चांगले मार्कस् मिळाले पाहिजेत असे विचार असणारे शेजारी आमच्या गल्लीत होते. रामभाऊ देशमुख ! आता ते हयात नाही. त्यांना दोन्ही मुली त्यांची पण कधीचीच लग्ने झालीत. त्यांची पत्नी तर त्यांच्या समोरच अकालीच गेली.
सकाळी चार वाजले की 'भोकरीकर, उठा ! चार वाजले.' असे म्हणून 'जय संतोषी मॉं' म्हणत देवाचे गाणे म्हणू लागत. त्या वर्षी 'जय संतोषी मॉं हा चित्रपट खूप गाजला होता. आमच्या गांवाला 'टुरिंग टॉकीज' असल्याने तिला छत नसे. खुल्या वातावरणांत दाखविल्या जाणाऱ्या या चित्रपटातील संवाद आमच्या व बऱ्याच जणांच्या घरापर्यंत ऐकू येत. खूप जणांचे संवाद पाठ झाले होते, इतके दिवस तो चित्रपट सुरू होता. ट्रॅक्टर, बैलगाड्या भरून खेड्यापाड्यावरून माणसे 'जय संतोषी मॉं' हा चित्रपट पहायला येत. 'नारायण, नारायण' म्हटल्यावर नारदमुनी आता काय म्हणतील हे आम्ही लगेच सांगत असू.
मात्र मी आणि माझा भाऊ (चुलतभाऊ) उठले आहेत याची खात्री होईपावेतो त्यांची, रामभाऊ देशमुखांची, दर १०-१५ मिनीटांनी आम्हाला हाक असे. 'भोकरीकर, उठले का ? बसले का अभ्यासाला ?' आमच्या खोलीतील दिवा लागलेला दिसला की मग त्यांचा अंगणात सडा टाकणे सुरू होई. तोंडाने देवाची गाणी सुरूच असे. परिक्षा झाली. आम्ही पास झालो. मी केंद्रात पहिला आलो. आमचे यश पाहून त्यांना काय समाधान वाटले म्हणून सांगू !
आपल्या यशांत खरोखर किती जणांचा वाटा असतो ? आपल्या लक्षात रहाते का पण ते ? आपण लक्षात ठेवतो का ते ? अशीच केव्हातरी कोणाची आठवण आपल्या स्मृतीच्या कप्प्याचे दार ठोठावते, मग असे काहीतरी आठवते.

१८ फेब्रुवारी २०१७

No comments:

Post a Comment