Friday, June 2, 2017

प्रवास आणि प्रवासघाई

प्रवास आणि प्रवासघाई

आज लगेच दिल्लीहून औरंगाबादसाठी निघायचे होते सायंकाळी ५.५० वाजता; पण का कुणास ठावूक, मला वाटत होते ५.१० वाजता ! त्यात काम आटोपता आटोपताच जवळपास तीन वाजले.
रिक्षाने / टॅक्सीने यायला साधारणत: एक तास तरी लागतो. मेट्रो रेल्वेने जावून ती 'एअर मेट्रो' पकडायची, म्हणजे ती केव्हा आणि त्यात किती वेळ जाईल ते सांगता येणार नाही. त्यापेक्षा टॅक्सी / रिक्षा जे काय मिळेल त्यात बसावे आणि रस्ता चालू लागावे हा विचार केला. मी ज्या भागांत होतो तिकडे टॅक्सी जास्त नसतात. काही हरकत नाही, रिक्षाने जाण्याचा विचार केला. ते शेवटपर्यंत नेत नाही, अधेमधेच सोडतात व तेथून मग वेगळ्या बसने जावे लागते. हे सर्व ते रिक्षावाले अर्थात आपल्याला उतरविण्याचे ठिकाण आल्यानंतरच सांगतात. अनुभव हा माणसाचा ज्ञानदाता आहे.
मी होतो त्या भागातील रिक्षावाल्यांचे व विमानतळाचे काय वाकडे आहे परमेश्वर जाणे. 'दिल्ली विमानतळावर चलणार का', हे विचारल्यावर दोन जणांनी आपले बूड व डोळे पण न हलवतां फक्त भुवई आणि ओठ मुडपून नकारघंटा हलविली. तिसऱ्याने मला प्रश्नार्थक चेहरा केल्यावर मग मी 'अगर तू मुझे जहॉं जाना हैं वहाँ चलने को तयार हैं, तो मैं बोलता ।' असे रिक्षावाल्याला सांगीतल्यावर त्याने माझ्याकडे निर्विकारपणे पाहून रिक्षा पुढे हाकली. दिल्लीच्या रिक्षेवाल्यांना आता लांबच्या भाड्याची आवश्यकता राहिलेली नाही, हे पाहून खरंच मला आनंद झाला. बहुतेक अलिकडच्या शासनामुळे आर्थिक परिस्थितीत फरक पडला असावा अशी मी माझी समजूत करून घेतली.
मला केवळ समजूत करून घेवून उपयोग नव्हता. वेळ संपत होता, घड्याळ पुढे सरकत होते. शेवटी नवी दिल्ली मेट्रोचे तिकीट काढले. कसाबसा मेट्रोत चढलो व उभा राहिलो. केव्हातरी जागा मिळून बसतो न बसतो तोच 'आपको नई दिल्ली उतरना हैं ना । आ गई ।' शेजारच्याने मी सांगून ठेवल्याने आपले काम बरोबर बजावले. मी उतरलो व थेट 'एअर मेट्रो'कडे चालायला लागलो. तेवढ्यात कोणीतरी बोलले आता 'बोर्डींग पास' येथे मिळतात. 'हुश्श ! चला बरे झाले.' हा विचार मनांत येतो न येतो तोच 'वेळेवर पोहोचलो नाही. विमान चुकले तर बोर्डींग पासचे काय करायचे ?' हा प्रश्न निष्कारणच मनांत आला. पण वेळेवर पोहोचलो आणि बोर्डींग पास मिळाला नाही तर काय उपयोग ? असा देखील विचार मनांत आल्यावर हाती मिळते ते घ्या, विनाकारण वैचारिक गोंधळ मनांत येवू देवू नये अशी खूणगाठ मनाशी बांधली व बोर्डींग पास घेतला.
पुन्हा एअर मेट्रोचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे तिकीट काढण्यासाठी लगबग करा. आपल्याला घाई असली की सर्वजण निवांतपणे काम करत असतात, असे आपल्याला नेहमीच वाटते. हा समज का गैरसमज, श्रद्धा का अंधश्रद्धा या वादात मी पडत नाही. तिकीट काढले प्लॅटफार्मवर आलो. तो एक जण दुसऱ्याशी बोलत होता. मतितार्थ हा की - दिल्लीचा विमानतळ तसा बराच मोठा, आपल्या ठिकाणावरच पोहोचायला तास-दीडतास जातो. आपण आता निघतो आहे कसे पोहोचू, काय होईल देव जाणे ! आज माझ्या राशीस्थानी घबराट पसरविणारे ग्रह आले होते की काय कुणास ठावूक ? काही नाही, लगेचच एअर मेट्रो आली. मी गाडीत चढलो. गाडी सुरू होण्याच्या अगोदर पहिले काय केले असेल ते तिकीटावरची विमानाची वेळ पाहिली. तो पर्यंत खरंच वेळ झाला नव्हता, ती वेळ ५.१० नसून ५.५० आहे हे वाचल्यावर एअर मेट्रोतील हवा जरा जास्तच सुखद, गार वाटली. मग जरा निवांतपणे औरंगाबाद येथे जाणाऱ्या प्लॅटफार्मवर पोहोचलो.
तिथे पोहोचलो तर 'अनाउन्समेंट' वर 'अनाउन्समेंट' ! 'दिल्ली-कोलकता' विमान लेट झाले होते. त्या प्रवाशांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहवेना ! ते विविध राज्यांमधले, देशांमधले पुरुष-महिला वेगवेगळे हेल काढून, विविध लकबींनी हिंदी व इंग्रजी भाषेत 'अजून किती वेळ आहे ?' हाच प्रश्न विचारीत होते, तेथील ती महिला या ससेमिऱ्याला तोंड देत होती आणि त्याचबरोबर 'आपके उडानमें हो रहीं देरी के लिए हमें खेद हैं । हमारे उडान की विलंबमे आप हमारे साथ हैं, इस लिए धन्यवाद । आपकी सुखद यात्रा की हो ।' या उद्घोषणांनी त्या प्रवाश्यांना कसे सळो का पळो करून सोडले होते. यावरून मी एक मात्र पाहिले की प्रवासी महाराष्ट्रीय असो, बंगाली असो, उत्तर भारतीय असो का दक्षिण भारतीय असो; भारतीय असो का परदेशीय असो; मानव सर्व एकच ! त्या पृथ्वीच्या विविध भागातील आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर कंटाळा व त्रस्तपणा, मला त्या सर्वांची भाषा समजत नसतांनाही, स्पष्टपणे वाचतां येत होता. त्यांचे विमान आले आणि 'एस् टी' किंवा 'रेल्वे' आल्यावर कसा गोंधळ उडतो हेच 'चेहऱ्यावरची घडी न मोडतां' प्रत्येक करून दाखवत होता. त्यांत काही बिना इस्त्रीचा चेहरा असलेलेपण होते. ते सर्व विमानांत स्थानापन्न होण्यासाठी जात असतांना मला आठवण आली की आपल्या विमानाची पण हीच स्थिती दिसतेय.
मी उठून विचारल्यावर 'पांच बीस को आयेगा, हमें और दस मिनीट लगेंगे, बाद मे बोर्डींग होगा' हे मला ५.२० मिनीटांनी सांगीतले. मला या धावपळीत आताच जरा निवांतपणा लाभला होता आणि तसा नेहमी प्रवासात अर्धा-पाऊण तास इकडेतिकडे मी धरूनच चालतो. त्यामुळे जास्त मनस्ताप होत नाही.
शेवटी विमानांत श्री. द. मा. मिरासदार यांचे 'गोष्टीच गोष्टी' हे पुस्तक वाचत होतो, तेव्हा जरा बरे वाटले. आणि सरतेशेवटी तुलनेने साधारणत: ३०-४० मिनिटे उशीराने आमची 'सुखद यात्रा' औरंगाबादला संपली.

९ मार्च २०१७

No comments:

Post a Comment