Friday, June 2, 2017

वकिली व्यवसायातील आठवण

वकिली व्यवसायातील आठवण

गेल्या आठवड्यात हायकोर्टाच्या बाररूममधे काम आटोपल्यावर संध्याकाळी घरी निघण्यापूर्वी मी बसलो होतो. सोबत ज्युनियर वकिल मित्र होता, म्हटलं, 'अलिकडे ज्युनियर मंडळी ही भाग्यवान, त्यांना हे सर्व आधुनिक तंत्रज्ञान आपल्या व्यवसायांत उपयोगात आणता येतंय. आम्ही भली मोठी पुस्तके, भरपूर डायजेस्टचा वापर करून तयारी करत. आता काम्प्युटरमधील सॉफ्टवेअरचा आणि या इंटरनेटचा उपयोग करून हवी ती माहिती सहज मिळविता येते.' यांवर त्याच्याकडे नेमके उत्तर नव्हते, पण तो सहज म्हणाला, 'ते सापडतं, हे ठीक आहे. पण नेमके काय माहिती पहायची आणि कसा उपयोग करायचा, याचे वांधे आहेत. हे कोणी सांगत नाही.' शेजारी बसलेले अजून दुसरे वकिल म्हणाले, 'एका दिवसांत काहीच येत नाही. वर्षोगणती त्यात घालवावी लागतात. तेव्हा कुठे कायद्याच्या समुद्रातील मोती मिळतात. त्यासाठी सिनीअर धुंडावा लागतो, एकलव्यासारखे काम करावे लागते. त्यातून शिकावे लागते. फक्त पैशाचे मागे लागून ज्ञान मिळत नाही.' त्यांवर तो उत्तरला, 'येथे कोणी कोणाला काही सांगत नाही. आपल्यालाच आपले शोधावे लागते. मग काही चुकी झाली तर त्याचे परिणामपण भोगायची तयारी ठेवावी लागते.' मला त्याची धडपड जाणवली आणि त्या वकिलांनी व्यक्त केलेली अपेक्षा पण ! मी म्हटलं, मी एक अनुभव सांगतो, मग ठरवा आपण सर्व जण आज कुठे आहोत ते ?
आमच्या मूळ गांवातील, रावेर कोर्टातील वकिलांमधील वातावरण खूप चांगले. माझे काका कै. वसंतराव भोकरीकर हे तेथील नामवंत वकिल ! यांचे किस्से मला वकिल संघातील माझे मित्र कै. प्रकाश चावरे हे नेहमी सांगत. 'आपण येथील आपल्या बारचे वातावरण घरासारखे ठेवले पाहिजे. ही नविन आलेली मंडळी म्हणजे लहान मुलं आहेत. त्यांना चालायला पण शिकवलं पाहिजे आणि एकटं पण चालू दिलं पाहिजे. आपल्यानंतर इथलं नांव हेच सांभाळणार !' कोणताही ज्युनियर बेधडक आपली अडीअडचण कोणत्याही सिनीअरला विचारू शकत असे. विशेष म्हणजे सिनीअरपण आडपडदा न ठेवता खरे मार्गदर्शन करत असे. पुस्तके वाचायला सांगत असे, देत असे. येथे आपल्याला कोणीही चुकीचा सल्ला देणार नाही ही तेथील प्रत्येकालाच खात्री असायची.
मी वकिली सुरू केली तेव्हा तेथील वकिल कै. आर. जी. चौधरी हे सर्वात जेष्ठ होते. त्यांच्या कडील लायब्ररी ही उत्तम ! तेथील कोर्टातही विशेष पुस्तके नव्हती. एकदा योगायोगाने यांच्या विरूद्ध माझेच काम होते. युक्तीवाद करतांना मी काही तरी न्यायनिर्णयातील संदर्भ दिला. पण तो मूळ न्यायनिर्णय हा माझ्याजवळ नव्हता; कसा असणार ? मी नुकतीच वकिली सुरू केलेली. न्यायमूर्तींनी मला मूळ न्यायनिर्णय दाखवल्याशिवाय कबूल करण्यास नकार दिला. मी सांगीतले, 'दुपारनंतर देतो.' त्यानंतर कै. आर. जी. चौधरी यांनी युक्तीवाद केला. त्यांनी पण काही न्यायनिर्णय सांगीतले व दाखवले. नंतर ते काम बाजूला ठेवले. दुपारनंतर मी तो न्यायनिर्णय दाखवला. न्यायाधीश एकदम चकीत ! 'अहो, हे पुस्तक आर. जी. चौधरी वकिल साहेबांचे आहे. त्यांनी सांगीतलेले दिले आहे.' ते म्हणाले. मी म्हणालो, 'नाही. हे मी जे सकाळी सांगीतलेले आहे, ते पुस्तक आहे.' 'अहो, पुस्तक तर आर. जी. चौधरींचे आहे.' न्यायाधीश म्हणाले. आता काय झाले ते सर्वांच्या लक्षात आले.
दोन्ही बाजू या आपले मुद्दे हे आर. जी. चौधरी यांचीच पुस्तके दाखवून सांगत होत्या. कै. चावरे वकिलांना राहवले नाही. ते बोललेच, 'साहेब, आर. जी. चौधरी हे पुस्तकांसाठी कोणालाही कधीही नाही म्हणत नाही. वास्तविक ही त्यांची लायब्ररी ही आमच्या वकिलसंघाचीच म्हणायची, फक्त त्यांच्या घरी ठेवली आहे, ती येथे जागा नाही म्हणून ! कोणीही त्यांच्या घरी, केव्हाही जावून बघू शकतात, वाचू शकतात. काय, रामभाऊ खरं ना !' त्यांना पण मनापासून हसू आले. 'पुस्तक माझेच आहे पण त्यांनी दुपारून माझेकडून तुम्हाला दाखवण्यासाठी आणले. कै. आर. जी. चौधरी यांचे बोलणे ऐकून तत्कालीन न्यायाधीश सुन्न झाले. असे काही वातावरण वकिलसंघात असू शकते ही त्यांना कल्पनाच नव्हती. 'ठीक आहे.' ते एवढेच म्हणाले. थोडे लवकर उठून गेले त्या दिवशी ! नंतर बारमधे निरोप आला. साहेब येत आहे. ते बार मधे आले. पुन:पुन: ते हेच बोलत होते, 'हे असे वातावरण कधी पाहिले नव्हते.' हे ऐकल्यावर, 'रामभाऊ, ही तुमची स्तुती आहे. चहा पाजा.' कै. चावरे वकिल ! अॅड. आर. जी. चौधरी यांनी सर्वांना चहा बोलावला.
मागील महिन्यातच मी बऱ्याच दिवसांनी रावेरला गेलो होतो. कोर्टात चक्कर टाकली. त्यावेळी समजले कै. आर. जी. चौधरी वकिल आपल्यांत नाहीत. त्यांनी आपल्या हयातीतच आपली सर्व पुस्करूपी लायब्ररी रावेर वकिल संघाला भेट दिली; जी वास्तविक तोपर्यंत रावेर वकिल संघाची वकिल मंडळी आपलीच पुस्तके असल्यासारखी वापरत होती, ती आता अधिकृतपणे रावेर वकिल संघात आलीत, पण त्यांच्या खऱ्या मालकांना सोडून ! आता कै. आर. जी. चौधरी नाही व कै. प्रकाश चावरे पण नाहीत.
बरीच नवी मंडळी होती. मी कोण, हे त्यांना ओळखतां येईना ! माझे मित्र अॅड. एम्. ए. खान यांनी माझा नविन वकिलांना परिचय करून दिला, 'हे आपल्या रावेरचे. आपल्या बारचे. आता हायकोर्टात वकिली करतात,' आणि एका ज्युनियरला सांगीतले, 'परवा ते सिव्हील मधलं काय विचारत होता मला, यांना विचार. हे सांगतील.' त्याला बिचाऱ्याला मला विचारण्याचा संकोच स्पष्ट दिसत होता. मीच त्याला बोलते केले आणि त्याचे शंकानिरसन केले. मला आनंद वाटला. अजूनही रावेर वकिल संघाने ही परंपरा टिकवून ठेवलेली आहे आणि आपला त्याला कधीतरी गेल्यावरही हातभार लागला याचे मला समाधान वाटले.
माझे सांगून संपले होते. आता संध्याकाळ होत आली होती. माझ्या सांगण्यातून दोन्ही वकिलांना त्यांचे उत्तर मिळाले होते.

२३ एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment