Saturday, June 3, 2017

नोकरी आणि मालकाचा विश्वास

नोकरी आणि मालकाचा विश्वास 

परवा नागपूरहून औरंगाबादला घरी परत निघालो होतो. एकाची भेट झाली, गप्पा सुरू झाल्या. गप्पात समजले ही व्यक्ती उच्चशिक्षण घेतलेली आहे, मात्र सध्या काही म्हणावा असा उद्योग नाही. त्यांच्या माझ्या संभाषणात मला त्यांच्या स्वत:च्या बुद्धीचा 'अहं' जेवढा जाणवला, तेवढीच आज आपण 'सेल्फ एम्प्लाईड' लिहीतो म्हणजे सांगण्यासारखा काही उद्योग नाही ही त्या मागील खरी वेदना जाणवली.
एकाची जुनी गोष्ट आठवली. आपल्या कष्टाने, धडपडीने नोकरीत मिळविलेले स्थान त्याला जबरदस्तीने त्याचा राजीनामा घेतला गेल्याने गमवावे लागले. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी त्याने न्यायालयाचा आधार घेतला. न्याय मिळतामिळता होणारा विलंब पहाता त्यातही काही फारसा अर्थ राहिला नाही. पण अशी व्यक्ती ही शेवटी त्यात इतकी गुंतत जाते की तिचे वागणे हे नैसर्गिक न वाटता, तर्कटी वाटू लागते. इथे त्याच्या हक्काचा वेदनामय, दु:खद प्रवास सुरू झालेला असतो पण त्याच्या ते लक्षात आलेले नसते, एवढेच नाही तर हे त्याला सांगीतल्यावरही त्याला पटेनासे झालेले असते.
आपल्यावरून मालकाचा, आपल्या वरिष्ठाचा विश्वास उडाला आणि आपल्या कर्तृत्वावर जर आपण दुसरीकडे कोठेही नोकरी मिळवू, असा आपल्याला विश्वास असेल, तर तेथील नोकरी सोडणे केव्हाही सूज्ञपणाचे असते. आपल्या आयुष्यातल्या बहुमोल वेळेच्या मोबदल्यात त्या मालकाला धडा शिकविण्याच्या फंदात पडू नये. तो मालक त्याच्या वागणुकीचे परिणामरूपी ज्ञान नंतर प्राप्त करणार असतो. तो जर सूज्ञ असेल तर तुम्हाला नंतरही मानाने बोलवतो; मात्र त्यावेळी तुमच्यावरील विश्वास गमाविला असेल तर नोकरीचा लोभ न धरता ती नोकरी सोडलेलीच बरी ! --- अन्यथा आपल्यावर नसते बालंट आणले जाते आणि आपण जीवनांत गुणवान असून अयशस्वी ठरतो.

५ नोव्हेंबर २०१६

No comments:

Post a Comment