Friday, June 2, 2017

मातृ दिन

मातृ दिन

आज म्हणजे दिनांक १४ मे रोजी सर्व जगतात 'मातृदिन' साजरा केला जात आहे. आपल्याला जन्म देणारी आई आणि मातेसमान असणाऱ्या व्यक्तीत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस ! मातृदेवतेबद्दल, मातृसत्तेबद्दल मनोमन ऋण मानण्याचा आजचा दिवस !
ज्या मातेने आपल्याला जन्म देवून हे जग दाखवले आणि हे विशाल विश्व आपल्याला संचार करण्यासाठी उपलब्ध करून दिले, तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे, पुत्र म्हणून आपला धर्म आहे.
स्त्री शक्तीत केवळ आपण जन्म दिलेल्या अपत्याचीच नाही तर सर्व जगताची माता बनण्याचे सामर्थ्य आहे, तिची ती यथार्थ ताकद आहे. त्यासाठी तिला अपत्यांस प्रत्येक वेळा नैसर्गिकपणे जन्म देण्याची आवश्यकता नाही. तिने कोणावरही मातृवत् मानले जाईल असे प्रेम केले, त्याचा आपल्या अपत्याप्रमाणे सांभाळ केला तरी तिला त्याचे मातृत्व प्राप्त होईल. हीच अपेक्षा आजच्या साजरा केल्या जाणाऱ्या 'मातृदिनाची' आहे.
तिने आपल्या मुलाची जनक आई म्हणून जे स्थान मिळवलेले तेच स्थान आपल्या सुनेचे मातृवत् पालन करून करून, तिला मातेप्रमाणेच आधार देवून मिळवले पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने मातेच्या ह्रदयाचा अनुभव तिने दिला असे होईल. तिच्या मुलाची सून बनण्यासाठी एक परक्या घरातील स्त्री शक्ती आपल्या जनक आईस सोडून आलेली असते, ती तिच्या मुलाच्या मुलांची आई बनण्यासाठी ! त्या सूनेने तिच्या लेकीप्रमाणेच तिला सांभाळायला हवे. निसर्गनियमाला समाजस्वास्थ्याची जोड देवून ही समाज जीवनपद्धती आपण बनवलेली आहे, ती आपल्या समाजांत शांतता रहावी म्हणून, कुटुंब व समाजस्वास्थ टिकावे म्हणून ! पुरुष असूनही आपल्या गुणांच्या जोरावर माऊली म्हणून संत ज्ञानेश्वरांना, ज्ञानोबा माऊलींना मातृत्व प्राप्त झाले ! हे समाजमान्यता असलेले एकमेव उदाहरण !
कवयित्री बहिणाबाई चौघरी यांची 'योगी आणि सासुरवाशीन' ही कविता आपल्या समाजाची अवस्था दाखवणारी आहे.
योगी-
बसलो मी देवध्यानी
काय मधी हे संकट
बाई बंद कर तुझ्या
तोंडातली वटवट
माझं माहेर माहेर
सदा गाणं तुझ्या ओठी
मंग माहेरून आली
सासरले कशासाठी ?
सासुरवाशीन -
आरे लागले डोहाये सांगे
शेतातली माटी
गाते माहेराचं गानं
लेक येईल रे पोटी
देरे देरे योग्या ध्यान
एक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते
देव कुठे देव कुठे
भरीसनी जो उरला
अरे उरीसनी माझ्या
माहेरात सामावला

१४ मे २०१७

No comments:

Post a Comment