Saturday, June 3, 2017

शाळेची सुटी आणि आजोळ

शाळेची सुटी आणि आजोळ 

माझी शाळेची परिक्षा झाली की मी शाळेला सुटी लागली असे समजायचो ! बऱ्याच उशीरा समजले की खरी सुटी ही 'रिझल्ट' लागल्यानंतर लागते ! मला लगेच पोष्टकार्ड आलेले असायचे, आजोळी आजोबांकडून बोलावणे यायचे ! मी जायचो !
मग सर्वप्रथम सुरू व्हायचे ते 'भगवद्गीता' शिकणे, रोज पाच श्लोक ! हे त्यावेळी त्रासदायक वाटे पण त्यानंतर त्याची आयुष्यभर पुरणारी उपयुक्तता समजली !
सर्वात मला आवडणारी वेळ म्हणजे सकाळी ११ वाजेची ! आकाशवाणी मुंबई - कामगारांसाठी कार्यक्रम ! 'कामगारसभा'! मग ती विशिष्ट संगीतधून ! गुरूवार असेल तर 'भक्तीगीते', शुक्रवार असेल तर 'लोकगीते' ! नाट्यगीते केव्हा असत लक्षात नाही ! पण 'नाचत ना गगनांत नाथा' हे पं. जितेंद्र अभिषेकींच्या आवाजातील नाट्यगीत वा 'श्रीगुरूदत्ता जय अवधुता' हे आर. एन्. पराडकरांचे गाणे लागले वा 'काय मी करू, विंचू चावला' हे संत एकनाथांचे शाहीर साबळे यांच्या आवाजातील गाणे ऐकले की मन कसे प्रसन्न होई !
त्याचवेळी 'खानदेश मीलचा' भोंगा होई आणि हा सर्व कामगारवर्ग त्यांच्या मुलाबाळांनी वा घरच्या धनीणीने आणलेला डबा झाडाखाली सोडून खात असत ! कामगारसभा संपे, पुन्हा संगीतधून वाजे आणि हा कामगारवर्ग पुन्हा 'खानदेश मील' मध्ये गुप्त होई. मी पण आपली तेथील बैठक हालवी !
खानदेश मील, कामगारसभा, संगीतधून आणि माझी आजोळची शालेय सुटी - सर्व गेले !

२० एप्रिल २०१६

No comments:

Post a Comment