Friday, June 2, 2017

जीवनाचा प्रवास

जीवनाचा प्रवास

आगगाडीला जेव्हा चढ चढायचा असतो, त्यावेळी पुढच्या एका इंजिनाची ताकद कमी पडते त्यावेळी हा प्रवास सुखरूप होण्यासाठी दुसरे इंजिन जोडावे लागते. ते पहिल्या इंजिनासोबत जोडले तर मागचे डबे कदाचित फरफटले जाण्याची आणि रुळांवरून घसरले जाण्याची शक्यता असते, त्यामुळे ते पुढे सोबत लावता येत नाही तर मागे लावावे लागते. मग मागच्या डब्यांना रुळांवरून घसरू न देता, आधार देत ताकदीने पुढे जाता येते.
मागच्या इंजिनाला मिरवता येत नाही वा लोकांना दिसतही नाही मात्र पुढच्या इंजिनाला मागे इंजिन आहे म्हणून आपण जोरात, जोशात आणि सुरक्षितपणे चालतो आहे हे माहीत असते. पुढचे इंजिन सर्वांच्या देखत गर्वाने चालत असते पण अपघाताची वेळ आली तर आपल्या छातीची ढाल त्या संकटापुढे करते आणि सर्व डबे व मागचे इंजिन सुरक्षित ठेवते. मागच्या इंजिनाला व डब्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी पुढच्या इंजिनाला घायाळही व्हावे लागते. पुढच्या इंजिनाचे सुरक्षित मिरविणे हे मागच्याच्या भक्कम आधारावर तर मागच्या इंजिनाची व डब्यांची सुरक्षितता पुढच्यावर अवलंबून !
जीवनचक्राच्या या आगगाडीला पुढचे पतीचे इंजिन व मागचे पत्नीचे इंजिन असते. कुटुंबातील पिल्लांचे डबे हे या दोघांना जीवनाच्या चढावावर सुखरूप न्यायचे असतात. कोणतेही इंजिन श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. डब्यांना तर बिचाऱ्यांना सुखरूप प्रवास हवा असतो, त्यांच्या मनाच्या स्टेशनवर उतरण्यासाठी ! जबाबदारी या दोन इंजिनाची !

२२ मे २०१६

No comments:

Post a Comment