Monday, June 12, 2017

डॉक्टर आणि वकिल

डॉक्टरांचा आणि वकिलांचा संबंध हा न्यायालयीन कामकाजात बऱ्याच वेळा येतो. फौजदारी खटल्यांत तर जखमांचा तपशील, त्यांचे स्वरूप, संभाव्य कारण म्हणजे अपघात किंवा घातपात, जखमेचे वय, त्याचा शरीरावरील परिणाम वगैरे सर्व बाबी या वेळी डॉक्टर किंवा तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला सांगाव्या लागतात.
दिवाणी स्वरूपांच्या घटनांवर पण वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष ही खूप परिणाम करू शकते. अपघातामुळे झालेली शरीराची हानी, त्यांत त्याची कमी झालेली कार्यक्षमता, त्यामुळे मिळणाऱ्या नुकसान भरपाईवर ही साक्ष महत्वाची ठरते. या व्यतिरिक्त अलिकडे विवाहासंबंधी निर्माण होणाऱ्या वादविवादांत देखील डॉक्टरची साक्ष किंवा मत हे बहुतांशी निर्णायकच असू शकते. मानसिकदृष्ट्या अपंगत्व, शारिरीक परिस्थिती व त्याचा वैवाहिक जीवनावर होणारा भलाबुरा परिणाम, मुलंबाळं होण्यावरील परिणाम वगैरे विविध बाबींवर डॉक्टरांची साक्ष महत्वाची ठरते ती ते त्या विषयांत तज्ञ म्हणून समजले गेल्याने. त्यांची साक्ष ही भारतीय पुरावा कायद्यानुसार तज्ञ व्यक्तीने दिलेली साक्ष म्हणूनच पाहिली जाते व तसेच त्याचे मूल्य विचारात घेवून प्रकरणाचा निर्णय दिला जातो.
आम्हाला जळगांव येथे विधी महाविद्यालयांत शिकवायला फारच निष्ठावान मंडळी लाभलेली होती. आमचे कॉलेज हे सकाळी असायचे. जळगांवमधील नामांकित वकील हे आम्हाला त्यांचा मौल्यवान वेळ खर्च करून शिकवायला येत, ते देखील अत्यंत नियमीतपणे ! त्यांना काही मानधन मिळायचे की नाही कोणास ठावूक ? अर्थात त्यांचा रोज शिकवायला येण्याजाण्याचा खर्च व दिला जाणारा वेळ यांचा जर हिशोब केला तर, ही मंडळी पदरमोड करूनच आम्हाला शिकवत असावी. जळगांव सारख्या ठिकाणी विधी महाविद्यालय चालले व टिकले पाहिजे हीच त्या मागची खरी भावना असावी।
प्राचार्य माथुरवैश्य हे जर वगळले तर सर्वच जण हे मानधनावर शिकवत. अॅड. जी. एस्. फालक हे 'Transfer of Property Act' व अॅड. एस्. एम्. इस्माईल हे 'Negotiable Instruments Act वगैरे शिकवत, ते आता नाहीत. अत्यंत सोपी उदाहरणे देवून त्यांनी कठीण विषय सोपा करून सांगत. अॅड. एल्. एल्. बेंडाळे हे Law of Torts and Land Laws शिकवीत. त्यांच्या शिकविण्याची व उदाहरणे देण्याच्या पद्धतीने आम्ही आपसांतील गप्पाच मारतो आहोत असे वाटे. अॅड. प्रकाश पाटील यांनी Law of Contract शिकवला. त्यांच्या पूर्वी मला बी. कॉम्. करतांना 'भारतीय करारांचा कायदा' हा विषय मी नूतन मराठा कॉलेजला असतांना अॅड. उज्वल निकम शिकवीत. त्यामुळे या कायद्याशी मी तसा परिचित होतो.
अॅड. काझी हे Mohmedan Law शिकवत. अॅड. वसंतराव सरोदे हे हिंदु कायदा व भारतीय पुराव्याचा कायदा शिकवत. हिंदु कायद्यातील तरतुदी, त्यांचा उगम हा तसा आपण सर्वच जण आसपास समाजातील रूढी, परंपरांमधे पहात असल्याने ते समजण्यास काही जड गेले नाही. मात्र त्यांची शिकवण्याची हातोटी ही विलक्षण होती. अॅड. हरिभाऊ चौधरी हे आंतरराष्ट्रीय कायदा व भारतीय राज्यघटना शिकवीत. शिकवतांना ते आणि आम्ही विद्यार्थी सारखेच रंगून जात. प्राचार्य माथुरवैश्य हे दिवाणी व फौजदारी दंडप्रक्रिया संहिता, कंपनी कायदा शिकवीत. त्यांचे पण शिकवणे उत्तम !
कै. अॅड. अच्युतराव अत्रे हे पहिल्या वर्षी भारतीय दंड संहिता व दुसऱ्या वर्षी न्यायशास्त्र शिकवीत. इंडियन पीनल कोड शिकवतांना एक बेअर अॅक्ट घेवून येत आणि संपूर्ण तास ते आम्हाला मंत्रमुग्ध करीत. कायद्यातील प्रत्येक पूर्णविराम, अर्धविराम व स्वल्पविराम यांना अर्थ असतो, हे त्यांनी शिकवले. कायद्यातील तरतूद वाचतांना कुठे व कसे थांबले पाहिजे हे अनुभवांनी, उदाहरणांसहीत दाखविले. त्यामुळे अर्थ कसा बदलतो हे पण दाखवले. आजही त्यांची उदाहरणे मी युक्तीवाद करतांना त्याच त्यांच्याच स्वरात डोक्यांत येतात. न्यायशास्त्र शिकवावे तर त्यांनीच ! एक छोटी निळसर कव्हर असलेली डायरी ते घेवून येत आणि 'हक्क व अधिकार, 'नितीमूल्ये व कायदा' वगैरे तत्व अत्यंत सुंदर सोप्या पद्धतीने सांगत. या सर्व मंडळींचे इंग्रजी इतके काही सोपे असे की आपण काही वेगळ्या, परक्या भाषेत ऐकतो आहे हे देखील जाणवत नसे. विद्यार्थ्यांना माझ्या पुढील वर्षी तर त्यांनी घरी देखील शिकवण्या घेवून शिकवले, मोफत शिकवले. आमच्या भागातील व सर्वांना सुपरिचित असलेले अॅड. उज्वल निकम हे अॅड. अच्युतराव अत्रे यांना गुरूस्थानी मानत.
काय ही मंडळी समाजाचे देणे लागत असतील परमेश्वरालाच माहीत ! ही सर्व मंडळी हाडाची वकील नसून हाडांची जन्मजात शिक्षक असावी ! आम्ही वकिल झाल्यानंतरही आम्हाला यांना विचारायला काही संकोच वाटत नसे आणि ते पण विद्यार्थी समोर आहे असंच सांगत.
विषय होता डॉक्टरांचा ! मी वकिल होवून साधारणत: ३-४ वर्षे झाली असावीत. मी असाच जळगांवला मा. न्या. आर. सी. चव्हाण यांच्या कोर्ट हॉलमधे काम ऐकत बसलेलो होतो. ते सिव्हील जज, सिनीअर डिव्हीजन म्हणून होते तिथं ! नंतर यथावकाश ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पण झाले. तिथे नेहमीच अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणांत काम सुरू असे इथे ! शिकायला सोपे व्हायचे त्यामुळं ! शिपायाने कामातील वकिलांचा पुकारा केला, त्यातील सामनेवाले वकिल नव्हते. केस वैवाहिक नातेसंबंधाची होती. बहुतेक मुलीला अपत्य होवू शकेल का नाही, या संबंधीचा विषय होता. मुलीकडील साक्षीदार म्हणून डॉ. सौ. उषा दावलभक्त आल्या होत्या भुसावळहून ! सोबत डॉ. माधव दावलभक्त, त्यांचे पती पण होते. दोन्ही या भागातील प्रख्यात डॉक्टर ! दवाखाना सोडून न्यायालयातील साक्षीला आले होते.
मुलाकडील वकिल नसल्याने न्यायाधीशांनी कामाचा खोळंबा होवू नये म्हणून डॉ. सौ. दावलभक्त यांची साक्ष सुरू केली आणि त्या वकिलांना निरोप देण्यास शिपायांस सांगीतले. साक्ष पूर्ण होत असतांनाच वकिलांचा कारकून आला आणि संबंधीत वकिल बाहेरगांवी असल्याने आज येवू शकणार नाही म्हणून सांगीतले. 'मी मुदत देणार नाही. काम चालवण्याची व्यवस्था करा. हा निरोप वकिलांना द्या.' असे न्यायाधीशांनी सांगीतले. दरम्यान डॉक्टर हे साक्षीच्या कामासाठी महत्वाचे असले तरी त्यांची जास्त आवश्यकता ही समाजातील रुग्णांसाठी, त्यांच्यावरील उपचारासाठी जास्त आहे. त्यांना साक्षीसाठी वारंवार न्यायालयात यायला लागू नये. अशा स्वरूपात आदेश करून काम दुपारपर्यंत पुढे ठेवले. डॉक्टरांना थोडं थांबून घ्या म्हणून न्यायाधीशांनी सांगीतले.
थोड्या वेळाने अॅड. अत्रे त्या न्यायालयात आले. त्यावेळेस दुसरे काम सुरू होते. ते संपले. न्यायाधीशांनी त्यांना 'कोणत्या कामात' हे विचारले कारण त्यांचे दिवाणी न्यायालयामध्ये येणे हे जवळपास नसायचेच ! त्यांचेकडे फक्त फौजदारी काम ! त्यांनी 'डॉक्टरांची साक्ष होती, माझ्या ज्युनियरचे काम आहे. ज्युनिअर आज नाही. डॉक्टरला परत पाठवणे बरोबर नाही. यापेक्षा महत्वाची असलेली त्यांची कामे ताटकळतात. म्हणून उलटतपासणीसाठी मी आलो आहे. मला त्यांची पूर्वीची तपासणी दाखवा, मी काम चालवतो.' असे सांगीतल्यावर न्यायाधीशांना आणि डॉ. दावलभक्तांना पण बरे वाटले. अॅड. अत्रे यांची न्यायवैद्यक शास्त्रातील ख्याती एवढी होती की डॉक्टरपण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे देत कारण या विषयापुरते त्यांचे ज्ञान डॉक्टरला पण काही वेळा अडचणीत आणत असे. त्यांनी पूर्वीचा जबाब वाचला व उलटतपासणी सुरू केली. ती अस्खलितपणे पूर्ण झाली. यांना त्या केसमधले काहीही माहिती नाही, हे कोणाला जाणवले पण नाही. डॉक्टरांनी त्यांचे कोर्टातच आभार मानले.
'आॅफीसमधील कोणाचेही काम असले तर माझा ज्युनिअर म्हणून माझी जबाबदारी येते. ज्यावेळी डॉक्टर सारखा साक्षीदार असतो, त्यावेळी त्याच्या व्यवसाय व व्यावसायीक प्रतिष्ठेचे समाजातील महत्व आपणच समजून घ्यायला हवे. काही वेळा त्यांच्या सेवेवर लोकांचे जीव अवलंबून असतात. आपल्या न्यायसंस्थेकडून त्यांना त्रास व्हायला नको. म्हणून मी आलो.' अशा स्वरूपातले बोलणे अॅड. अत्रे यांचे न्यायाधीशांशी झाले. त्यांनी त्याच कामांत यापूर्वी नुकतीच झालेली अशा स्वरुपाची आॅर्डर सांगीतली. 'चला, या निमित्ताने तुम्ही आमच्या दिवाणी कोर्टात आलात. बरं वाटलं.' न्यायाधीशांनी हे म्हटल्यावर सर्वांनाच हसू आले.
समाजातील प्रत्येक घटकाने आपापली जबाबदारी ओळखून जर काम केले तर किती सहज व सुरळीत काम होते. परवा डॉक्टर यांच्या साक्षीसंबंधाने पुराव्याचा कायदा वाचत बसलो होतो, अन् ही आठवण आली.
आताच माझे मित्र श्री. प्रफुल्ल कुलकर्णी यांनी सांगीतले की आता सौ. डॉ. उषा दावलभक्त आपल्यात नाहीत. त्या नुकत्याच दि. २९ मे रोजी हे जग सोडून गेल्या.

३ जून २०१७

No comments:

Post a Comment