Friday, June 2, 2017

गुरूजनांची आठवण

गुरूजनांची आठवण

कोण जाणे पण मी शालेय व महाविद्यालयीन अभ्यास हा बहुतांश घराबाहेरच केलेला आहे, अपवाद १० वी आणि ११ वी ! मात्र पहिली ते चौथी शाळेचा असा काही अभ्यास असतो, आणि तो करावा लागतो याची मला तसेच तत्कालीन बहुसंख्य विद्यार्थांनापण कल्पना नव्हती. त्यांच्या पालकांचीही अशीच समजूत असावी, असे समजण्यास वाव आहे. ही समजूत पक्की करण्याचे काम आम्ही विद्यार्थी म्हणवणारे पण वर्षभर यथाशक्ती, इमानेइतबारे कायम घराबाहेर हुंदडून पार पाडत असू. मात्र परिक्षा जवळ आल्यावर तरी पुस्तके चाळली पाहिजेत हे त्यावेळचे एकंदरीत सार्वजनिक व ठाम मत ! त्यावेळी पालक लाड चालू देत नसत, अभ्यासाला दामटून बसवले जाई. शाळेत सदोदित 'परिक्षा आली' हा गजर आणि घरी आल्यावर पालक दामटून अभ्यासाला बसवत ! यांवर जालीम उपाय म्हणजे परमेश्वराचाच ! मग सोबत मंदीरातही रोज जायला हवे हा आमचा विद्यार्थ्यांचा नियम ! याला नाही म्हणायची कोणाची हिंमत नसायची. पालकांनी अभ्यासाचा तगादा लावला रे लावला की मंदीरातील विद्यार्थ्यांची गर्दी वाढायची. यावरून म्हणजे मंदीरातील विद्यार्थ्यांच्या गर्दीवरून गांवात अंदाज बांधला जाई की मुलांच्या परिक्षा जवळ आल्यात. मग आमच्या चौकशा सुरू होत, 'अभ्यास काय म्हणतोय ? मास्तरने शिकवलेलं वाचतोय का ? नीट वाच, पास होशील.' 'पास होणे' ही म्हणजे 'इच्छित फलप्राप्ती', पहिला नंबर वगैरे म्हणजे 'भाग्याची परमावधी' ! ही भाग्याची परमावधी माझ्या गुरूजनांच्या, परमेश्वराच्या कृपेने बऱ्याच वेळा आयुष्यात अनुभवली. मुले नापास झाली तर मास्तरांनी शिकवले नसेल या पेक्षा पोरांनी काही लिहीले नसेल यांवर विश्वास, मात्र मास्तर त्याचे शिकवण्याचे काम बरोबर करेल ही सर्वांना खात्री !
मला तिसरी-चौथीपर्यंत तरी शाळेचा अभ्यास असा काही करावा लागतो याची कल्पनाच नव्हती. माझ्या घराच्या मागेच शाळा, तिला 'नाल्यावरची शाळा' म्हणत ! शाळेची वाजवलेली घंटा सकाळी ऐकू आली की घाईघाईने आंघोळ करून कपडे घालून शाळेत पळायचे. शाळा म्हणजे भाड्याने घेतलेली दुमजली इमारत होती. महिना-दिडमहिन्यांनी या सर्व खोल्या शेणाने स्वच्छ सारवाव्या लागत. हे काम माझ्यासारखे बारकेबुरके करत नसत, त्यासाठी 'जबाबदार' विद्यार्थी असत. त्यावेळी तसे गुराढोरांना कमी नसल्याने शेण मिळण्याची ददात नसे, मग आपण टोपलीत शेण तरी आणण्याच्या कामाचे आहे, हे दाखविण्यासाठी मी व दोन तीन विद्यार्थी शेण आणण्याचे कामी जात व टोपलीसहीत शेण आणत. शाळेच्या दोन्ही बाजूला आमचीच, काकांचीच घरे होती. त्यांच्याकडे गुरेढोरे असत. पण मी असे शेण आणणे हे दुसऱ्या विद्यार्थ्याला कमीपणाचे वाटे, पुढीलवेळी आठवणीने तो शेण आणायचा. याचा ना विद्यार्थ्यांना कमीपणा होता ना पालकांना ! शेतमजूर, हमालापासून ते गांवातील गडगंज श्रीमंत व पांढरपेशांची मुले सर्व सोबत शिकत होती. कोणावरही शेण आणण्याची वा वर्ग सारवण्याची पाळी येई. घरी नोकराला काम सांगणारी मुले येथे आनंदाने शेणाने वर्ग सारवत. याबद्दल कोणाचीही तक्रार वा नाराजी पण नसे.
आम्हाला प्राथमिक शाळेत शिकवणारे शिक्षक स्वत: काय शिकले होते याची मला अजूनही कल्पना नाही. ते 'ट्रेंड होते का अनट्रेंड' होते हे पण माहिती नाही. शिक्षक असेल तर 'गुरूजी' म्हणायचे आणि शिक्षिका असतील तर 'बाई' म्हणायचे, हे ठरलेले ! माझे पहिलीचे शिक्षक, बोरोले गुरूजी ! बहुतेक तुकाराम उखर्डू बोरोले ! पायजमा, पांढरा सदरा व डोळ्याला काळ्या फ्रेमचा जाड भिंगाचा चष्मा ! त्यांच्या नांवाची पाटी माझ्या पहिलीच्या वर्गात होती. ते सर्वच विषय शिकवायचे. तसे पण आम्हाला प्रत्येक वर्षी एकच शिक्षक सर्व विषय शिकवीत, उत्तम शिकवीत ! वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळे शिक्षक ही चैन किंवा उधळपट्टी त्यावेळी परवडणारी नव्हती. बोरोले गुरूजींचे मुलांत रमून शिकवणे अजून आठवते. आम्हाला बाराखडी, अंकगणित अशी तोंडओळख शिकवतांना आपल्या सभोवती दिसणाऱ्या वस्तूंचा ते उपयोग करीत. सर्व अंक त्यांनी बांबूच्या काड्या, घोड्याची नाल यांनी करून दाखविले होते.
दुसरीत डेरेकर बाई होत्या, त्या पण आपुलकीनी शिकवत. त्यांनी शिकवलेला 'बुडबुड घागरी' - मी खीर खाल्ली तर, बुडबुड घागरी' हा धड्यातील मजकूर अजून आठवतो.
तिसरीला आम्हाला होते काशिनाथ शंकर गुरव ! स्वच्छ धोतर, पांढरा शुभ्र सदरा व पांढरी क्वचितच काळी टोपी. ते गांवातच 'पाराच्या गणपती'जवळ रहात, त्यामुळे वर्गातीलच काय पण शाळेतील सर्व मुले त्यांच्या नजरेखालून जात असत. म्हणून जरा दबकूनच रहावे लागे. थोडे बुटके व स्थूल असलेले गुरव गुरूजी वर्गावर जेव्हा येत, तेव्हा आज काय ऐकायला मिळणार याची उत्सुकता असे. त्यांचे अक्षर सुंदर, वळणदार आणि तसेच अक्षर सर्वांचे असावे ही अपेक्षा ! मराठी म्हणजे भाषा, गणित, इतिहास म्हणजे 'थोरांची ओळख' , उत्तम शिकवीत ! आमची सर्व पुस्तके त्या वर्षी बदलली होती, नविन पुस्तके लवकर बाजारात आली नाही. त्यामुळे नविन अभ्यासक्रम शिकवायला उशीर झाला. मात्र त्यावेळी त्यांनी जुन्या अभ्याक्रमातील शिकवलेली - 'चंद्र पहा उगवे मनोहर, चंद्र पहा उगवे । प्रकाश आला पूर्व दिशेला --' ही सुंदर कविता थोडीफार आठवते. ते छान चालीत कविता म्हणत. नंतर नविनच पुस्तके आली. त्यांचेबद्दल महत्वाचे, आवर्जून सांगायचे म्हणजे ते शाळा सुटण्याच्या अगोदर एक-दोन मिनिटे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना उभे करत. त्यांनी आम्हाला उभे केले की शाळा आता सुटणार हा अंदाज असायचा. आम्ही सर्व विद्यार्थी 'सावधान' मधे उभे रहात आणि मग सर्व 'वंदे मातरम्' म्हणत ! ते एक ओळ म्हणत मग त्यांच्या मागोमाग आम्ही ! संपूर्ण वंदे मातरम् आम्ही शिकलो, ते मराठी तिसरीत. शाळा - जळगांव जिल्हा परिषदेने चालवलेली रावेर येथील मराठी मुलांची शाळा, नं. २ !
मला चौथीला होते - दिलदारखॉं बलदारखॉं पठाण ! पठाण गुरूजी ! पांढरा स्वच्छ पायजमा, पांढरा शर्ट व बऱ्याच वेळा हातात छडी ! हे विद्यार्थांना भयंकर मारत असा त्यांचा दरारा ! मात्र वर्षभरात ते दराऱ्याप्रमाणे वागले नाही का दरारा असल्याने छडीचा वापर करण्याची गरज पडली नाही कोणास ठावूक ? यांनी शिकवलेले मराठी भाषेतील संत रामदासांचे, संत तुकारामांचे या संतमंडळींचे श्लोक, इतर कविता आणि गद्य ! 'घड्याळ माझे नवे असे, सुंदर दिसते पहा कसे' ही विं. दा. करंदीकरांची कविता अजूनही आठवते. गणित शिकवावे त्यांनीच, सर्व पाढे - पावकी, निमकी, पाऊणकी पाठ ! आणि इतिहास - हा तर त्यांचा हातखंडाच ! 'राजा शिवछत्रपती' या नांवाने आम्हाला असलेल्या इतिहासातील 'शाईस्तेखानावर स्वारी' वगैरे हे त्यांनी शिकवलेले धडे अजून आठवतात. फिरंगोजी नरसाळे, मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रम सांगतांना त्यांच्या मुळातच हळू असलेल्या आवाजाला चढलेले स्फुरण, त्याचवेळी ते धारातिर्थी पडले हे सांगतानाचा त्यांचा स्वर आम्हाला शिवकालीन इतिहास समजावून सांगण्यास पुरेसा होता. पन्हाळगडचा वेढा हा बाजीप्रभू देशपांडे यांचा धडा शिकवतांना बाजीप्रभूची वीरश्री त्यांच्या स्वरात येत असे. तोफांचे आवाज बाजीप्रभूने ऐकले आणि मग मान टाकली, हे सांगतांना त्यांचा आवाज थांबला होता. छ्त्रपतीं शिवाजी महाराजांचे महानिर्वाण झाले, हा धडा संपविल्यावर त्यांनी त्या दिवशी काहीच शिकवले नाही. त्यांनी सहामाहीला आमचा इतका कडक निकाल लावला होता की आम्ही तीनच विद्यार्थी पास झालो, त्यांत मी होतो; बाकी सर्व नापास ! त्यावेळी विद्यार्थी अपवादाने पास होत, त्यामुळे पास होवून वरच्या वर्गात जाणे ही इतकी सोपी गोष्ट नव्हती. आता 'नापास विद्यार्थी' ही 'संरक्षीत व दुर्मिळ जमात' म्हणून जाहीर केली आहे. उत्तीर्ण झालेल्यांना फारशी किंमत नसल्याने खच्चीकरणासाठी आता 'त्याला किती गुण मिळाले बरं?' ही टूम निघाली आहे.
दरमहा पंचाहत्तर ते सव्वाशे रुपये पगार घेवून आणि तीन पैसे ते दहा पैसे महिना अशी फी विद्यार्थ्यांकडून घेवून निदान चाळीस-पन्नास वर्षे शिकवलेले लक्षात राहील अशी ही गुरूजनांची पिढी, त्यांचे काम आमच्या रूपांत ठेवून गेलेली आहे. हजारो रूपयांत फी देणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाचे विचारले तर अपवादानेच सांगता येते.
अलिकडे 'नर्सरी, एल्. के. जी. किंवा यु. के. जी.' यांचे पण अभ्यास असतात म्हणे ! पहिली ते तिसरी म्हणजे 'फर्स्ट ते थर्ड'मधे शिकत असलेल्या मुलांचा अभ्यासाचा गोतावळा पाहिला की आताच्या वातावरणांत आपण नाही हे बरे मानायचे का हा चाललेला भंपकपणा समजायचा याचा बोध होत नाही. काल शेजारची छोटी मुलगी आली होती, ती 'एल्. के. जी.' मधून 'यु. के. जी.' मधे गेली ! ९७% मार्क्स आहेत आणि काही हजार फी आहे शाळेची ! मी विचारले, 'मग फर्स्टला केव्हा ?' यांवर तिचे उत्तर - 'यु. के. जी. झाली की मग !' यावरून हे सर्व आठवलं !

२०एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment