Saturday, June 3, 2017

रिक्षावाल्याचे भाडे

रिक्षावाल्याचे भाडे

गेल्या आठवड्यात रिक्षाने एका ठिकाणी जायचे होते, रिक्षा ठरविली. त्याने भाडे सांगीतले. हो, मीटर दाखविण्यासाठी असतात, त्यानुसार भाडे आकारले जात नाही. त्याने भाडे सांगीतल्यावर मी काही बोललो नाही. रिक्षात बसलो, रिक्षा निघाली व मी माझ्या ठिकाणी मला पोहोचविले. मी भाडे दिले, ठरविल्यापेक्षा दहा रुपये जास्त होते. रिक्षावाला ते परत करू लागला. मी घेतले नाही, 'या ठिकाणी येण्याचे इतकेच होतात हे मला माहीत आहे. मी नेहमीच इतके देतो. तुला कमी कशाला ?' तो आश्चर्यचकीत झाला, त्याला बोलणे सुधरेना !
मला रिक्षाने गांवात वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते, बऱ्याच वेळी कामानिमीत्ताने एकाच ठिकाणी पुन्हापुन्हा जावे लागते. रिक्षा व रिक्षा वेगवेगळ्या असल्या तरी अंतर तेच असल्याने रिक्षाचे भाडे सारखेच होणार असते. काहीवेळा रिक्षावाले जास्त सांगतात- 'पांच दहा रुपयाने काय बंगला बांधणार आहे ?' अशीही उद्धटपणे विचारणा केली जाते. पण ईलाज नसतो, त्यावेळी घासाघीस नक्कीच करावी लागते.
नेहमीच्या ठिकाणावरून जर मी बसलो तर तेथील रिक्षावाले मला पाहिल्यावर भाडे ठरवत नाहीत, इतर कोणी नवखा असेल तर त्याला ठरवू देत नाही. 'तू जा ! ते बरोबर देतील !' हे सांगून रवाना करतात.
दिवाळीच्या वस्तूंसाठी किरकोळ वस्तू विक्री करणाऱ्या दुकानदारांशी घासाघीस करू नका, या मजकूराची पोस्ट वाचल्याने आठवले.

१३ ऑक्टोबर २०१६

No comments:

Post a Comment