Saturday, June 3, 2017

पातळ भाजी

पातळ भाजी

रावेरचे दत्त मंदीर प्रसिद्ध आहे, तेथे दत्तजयंतीचा मोठा उत्सव होतो, यानिमित्ताने यात्रा भरते, अगदी आसपास असलेल्या गावांतील उत्सवप्रेमी जनता मोठ्या संख्येने जमते ! या निमित्ताने तेथे दूरदूरचे नातेवाईक येतांत, त्यांच्या भेटीगाठी होतात ! विशेष म्हणजे यानिमित्ताने अगदी दूरदूरच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी झाल्याने त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय निघून बऱ्याच वेळी आपसांत सोयरीक-संबंधही जुळतात ! असे एकंदरीत या यात्रेचे, उत्सवाचे रावेरला महत्व आहे. हे रावेर म्हणजे जळगांव जिल्ह्यातील !
येथे दत्तमंदिरातील मुख्य उत्सव दत्त जयंतीच्या दिवशी 'भगवान दत्तात्रयांच्या' जन्माने सुरु होतो ! दुसऱ्या दिवशी रथ आणि तिसऱ्या दिवशी पालखी ! येथे दत्तजन्म म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला, त्या निमित्ताने कीर्तन ! त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला रथोत्सव, याचे येथील वैशिष्ट्य म्हणजे हा रथ 'भगवान मुरलीधराचा' म्हणजे 'श्रीकृष्णाचा' असतो आणि या रथाचे सारथ्य 'अर्जुन' करतो ! रथावर उत्सवप्रेमी जनता रेवड्या उधळते ! त्यानंतर पालखी ही रथोत्सवानंतर दुसऱ्या दिवशी !
येथे रावेरला साधारणतः आजचे ५० वर्षांपूर्वी, आंध्रप्रदेशातील 'राजाभाऊ अय्या' हे रहात होते, त्यांच्या हाताला उत्तम चव, अतिशय उत्तम स्वयंपाकी ! त्यांच्या स्वयंपाकावरून त्यांना न पहाता हा स्वयंपाक कोणी केला असेल ते खाणारा ओळखीत असे अशी त्यांची प्रसिद्धी ! एवढेच नाही तर प्रत्येक स्वतंत्र पदार्थावरूनही हा पदार्थ कोणी केला असेल हे तत्कालीन खाणारा ओळखीत असे ! विविध प्रकारचे लाडू, जिलेबी त्यांनीच करावी आणि आमच्यासारख्यानी ती चवीने खावी ! पातळभाजी ही तर त्यांचे कमालीचे वैशिष्ठय - पातळभाजीचा पहिला भुरका मारल्यावर ती पातळभाजी कशी झाली हे सांगण्याऐवजी ही 'राजाभाऊंनी' केलेली दिसते' असे उद्गार हे पातळभाजी खाणाऱ्याचे असत ! ते 'राजाभाऊ अय्या' या दत्तमंदीरातच रहात, अधूनमधुन आपल्या जन्मभूमीला म्हणजे 'आंध्रप्रदेशात' कोठेतरी 'करीमनगर' जिल्ह्यात ते जात !
मध्यम उंचीचे उजळ वर्णांचे राजाभाऊ नेहमी स्वयंपाकाच्या भट्टीजवळ बसल्याने गव्हाळ रंगाचे झाले होते. धोतर, अर्ध्या बाह्याची बंडी आणि खांद्यावर लाल-पांढऱ्या धाग्याचा पंचा ! या वेषात त्यांच्या भव्य कपाळावर कुंकवाची उभी रेघ ओढलेली असा हा धारदार नाकाचा माणूस ! त्याचे साहित्य म्हणजे एक झारा, मोठा सराटा घेवून ते आदल्या दिवशी आले की भट्टी खोदून व्यवस्थित मातीने लिंपून घेत. भट्टीची पूजा करून नमस्कार करून राजाभाऊ निघून जात आणि दुसऱ्या दिवशी येत. दुसऱ्या दिवशी मग स्वयंपाक सुरू होई तो त्या अग्नीला आहुती देवून ! ते आपला सर्व स्वयंपाक सोवळ्याने करत आणि स्वयंपाकघरात, स्वयंपाकाचे ठिकाणी कोणासही फिरकू देत नसत. याला अपवाद म्हणजे माझे 'बाळूकाका' ! त्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे 'राजाभाऊ' जेथे स्वयंपाक करत तेथे ते जेवणही करत नसत, फार झाले तर 'शिधा' मागत ! शिधा म्हणजे त्यांना जेवायला लागतील एवढे तांदूळ आणि दही, झाला 'शिधा' !
आमच्या 'बाळुकाकांनी' अखंड 'दत्तात्रयाची' आणि 'महालक्ष्मीची' सेवा मंदीरात जाऊन उत्सवप्रसंगी केली, रथावर 'बाळूकाका' दरवर्षी असत, ते असले म्हणजे आम्हा मुलांना रथाचे पूजन करतांना आणि दुसऱ्या दिवशी रेवड्या मिळणार हे नक्की ! ते नेहमीच दत्तमंदीरात असल्याने त्यांची आणि 'राजाभाऊ अय्या' यांची स्वाभाविकच जवळीक होती. आमचेकडे लग्नकार्य, समारंभ असे काही विशेष असले की 'बाळुकाकांचे' त्यांना 'स्वयंपाकी कोण सांगावा?' हे विचारल्यावर 'राजाभाऊ अय्या' हे ठरलेले उत्तर यायचे ! 'बाळूकाका' हे माझे चुलतकाका, हे देखील मला लहानपणी माहित नव्हते ! आमच्या लहानपणी सख्खे आणि चुलत असे नाते हे आमच्या लक्षातच येत नसे, ही निष्कारण समज आम्ही मोठे झाल्यावर आली ! घरात, म्हणजे आमच्या सर्व सख्खे, चुलत नात्यातील कोणाकडेही, काही कार्य ठरले की प्रत्येकाची एकेक जबाबदारी ठरलेली असे, ही जबाबदारी त्यांना सांगण्याची देखील आवश्यकता नसे ! त्यावेळी आपापली जबाबदारी ओळखून प्रत्येक जण वागत असे, जबाबदारी पार पडत असे, हे फार चांगले होते !
काही काळानंतर म्हणजे साधारणतः १९९१ - ९२ चे दरम्यान त्यांची, राजाभाऊंची प्रकृती वयोमानाने ठीक रहात नव्हती म्हणा किंवा त्यांची मुले त्यांना सारखी घरी बोलवत असल्याने म्हणा, ते त्याकाळी बराच काळ त्यांच्या आंध्रप्रदेशांतील 'करीमनगर' या जिल्ह्यातील गावी राहू लागले होते. त्यांचा रावेर येथील संबंध हळूहळू कमी होऊ लागला, ते स्वाभाविकच होते ! त्यादरम्यान माझे लग्न ठरले ! लग्नानंतरच्या कार्यक्रमाचा म्हणजे 'सत्यनारायण परळ' म्हणा किंवा आजच्या भाषेत 'स्वागत समारंभ' म्हणा याचा स्वयंपाक कोण करणार, हे वडिलांनी 'बाळुकाकांना' विचारण्याच्या अगोदरच त्यांनी म्हणजे बाळुकाकांनी ठरविलेले होते - ते म्हणजे 'राजाभाऊ' हेच करणार ! त्यांनी त्यांचा आंध्रप्रदेशातील रहिवासाचा पत्ता आणला होता, माझ्या वडिलांनी 'राजाभाऊ अय्या' यांना पत्र लिहीले, ते पत्र त्यांना मिळाले, त्यानंतर 'राजाभाऊ' यांचे उत्तर आले, 'काळजी करू नका, मी ठरल्या वेळी येतो.' आमच्या घरातील सर्वजण 'राजाभाऊ' येणार म्हटल्यावर निश्चिन्त झाले !
आमचे लग्न झाले ! 'स्वागत समारंभाच्या' दोन दिवस अगोदर 'राजाभाऊ' आले ! त्यांनी दत्त मंदिरात चक्कर मारली, नंतर बाळुकाकांकडे गेले ! लगेच संध्याकाळी बाळूकाका आणि राजाभाऊ आमचे घरी हजर ! स्वयंपाक काय करायचा हे इतक्या दिवसांच्या तपश्चर्येने तपस्वी झालेल्याला सांगून त्यांचा आम्हाला अपमान करायचा नव्हता ! त्यांनी आणि बाळूकाकांनी सर्व पदार्थ ठरविले ! सोवळ्यात 'राजाभाऊंचा' स्वयंपाक झाला ! पूजा झाली, आरती झाली, नैवेद्य झाला ! जेवायला पंगत बसली, आम्ही दोघे, म्हणजे नवदांपत्य, पंगतीत वाढायला गेलो, आमच्या हाती अर्थातच पक्वान्न होते ! पंगतीत बहुतेक माझे शिक्षक - देशपांडे सर असावे, त्यांनी पातळभाजीचा भुरका मारला, आम्ही त्यांना वाढण्यासाठी म्हणून ओणवे झालो, त्यांनी आमच्याकडे पाहीले, 'राजाभाऊ आलेले दिसताहेत.' मी म्हणालो, 'हो, स्वयंपाक त्यांचाच आहे.' 'ते चवीवरूनच समजते, खूप वर्षांनी त्यांच्या हाताचे मिळाले.' देशपांडे सर उद्गारले ! नंतर आम्ही त्यांना वाढून पुढे सरकलो ! ही आश्चर्यचकीत ! 'यांना कसे समजले कि स्वयंपाक कोणी केला आहे ? तिला सांगितले - 'राजाभाऊंना स्वयंपाक करतांना पाहावे लागत नाही, ते खाणारेच न पहाता ओळखतात की राजाभाऊंचा स्वयंपाक आहे ! अशी ही खऱ्या अर्थाने 'अन्नपूर्णेच्या' घरातील 'बल्लवाचार्य' व्यक्ती मी पहिली आणि अनुभवलेली आहे !
आज हे सगळे आठविण्याचे आणि लिहिण्याचे कारण म्हणजे - आज शनिवार, न्यायालयाला सुटी होती. मी थोडा निवांत होतो. माझ्या पत्नीने आज स्वयंपाकात 'पातळभाजी' केलेली होती. भाजी चांगली झाली होती पण मी तसे बोललो नाही, मी 'कौतुक' करत नाही हे हिचे नेहमीचे म्हणणे ! तिला मात्र स्वयंपाक, कोणताही पदार्थ कसा झाला याची तात्काळ पावती हवी असते, ते काम आमचे चिरंजीव करतात ! आजही तिने लगेच 'पातळभाजी' कशी झाली हे विचारले आणि मी बोलून गेलो - 'राजाभाऊंची' आठवण झाली ! ------ आणि बस, डोळ्यापुढून दिनांक ६ डिसेंबर, १९९२ रोजीची ही 'सत्यनारायण आणि परळाची' आठवण तरळली आणि आज लिहावे लागले.

२७ ऑगस्ट २०१६


No comments:

Post a Comment