Friday, June 2, 2017

कोणाचाही शेवटचा प्रवास

कोणाचाही शेवटचा प्रवास

आज सकाळी श्री. प्रदीप रस्से यांचा फोन आला. मला अंदाज होता तरी धक्का बसला. मी माझ्या सौ. ला झोपेतून उठविले. गेली जवळपास पंचवीस वर्षे रोज सकाळी सौ. ला झोपेतून उठविण्याचे काम माझे आहे. 'मला लवकर पहाटे उठायची सवय पहिलेपासूनच सवय आहे, म्हणून बरं !' हे सांगीतल्यावर हे म्हणणे तात्काळ खोडून 'रात्री आवरतां आवरतां किती वाजले झोपायला, माहिती आहे का ? तुमच्यासारखे नाही हात धुतले की 'ढाराढूर पंढरपूर' ! मग काय न झालं सकाळी लवकर उठायला ?' हे उत्तर नियमीत ऐकायला मिळते. माणसांच्या गणिती श्रेणीने वाढत जाणाऱ्या बोलण्याला बायकांचे भूमिती श्रेणीने वाढणारे बोलणे असते; त्याला पुरे पडणारा मनुष्यप्राणी विरळाच !
'का उठवलं ?' सौ. चा प्रश्न ! तिला श्रीमती रस्से काकू गेल्याचे सांगितले, 'आताच फोन आला.' तिला धक्का बसला. 'रस्से काका-काकूंनीच माझे लग्न जमविले होते.' तिचे उद्गार ! एखाद्याच्या कायमच्या वियोगाच्या वेळी त्याने आपल्यासाठी केलेली सर्वात चांगली गोष्ट आपोआपच ओठावर येते. आम्ही आवरून लगेच जळगांवी निघालो. हिला सध्या प्रवास करू नका म्हणून सांगीतलेले असतांना पण ही माझ्याबरोबर निघाली. आपल्या आयुष्यात कोण कुठली माणसं येवून जातात, आपल्यासाठी काय करून जातात नाही ? त्यांच्या छोट्याछोट्या गोष्टींतून दिसते ते आपल्याबद्दलचे प्रेम, आपुलकी !
मालेगांवला हिचे वडील बॅंकेत नोकरीला होते. सोबत एक निष्ठा म्हणून संघाचे काम होते. तेथून हिच्या वडिलांची व श्री. रस्से कुटुंबीय यांची ओळख ! त्यांच्या आयुष्यातील आठवणीची घटना म्हणजे - मालेगांवला कार्यवाह म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले म्हणून काश्मीरमधील श्रीनगरला हिमाचल प्रदेशातील मा. किशोरीलाल त्यांचे पाहुणे म्हणून रहाण्याचा कसा योग आला, याबद्दल नंतर केव्हातरी)
तेथे श्री. रस्से यांची झालेली भेट व नंतरही टिकून राहिलेला स्नेह ! कामाला आला तो त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ! 'एकनाथ, तू माझ्या सुनेच्या भावाचे ठिकाण का पहात नाही ? मुलगा चांगला आहे.' आता त्यांच्या प्रत्यक्ष सुनेचा भाऊ आपल्या मुलीसाठी सांगतात म्हणजे अजून काय हवे ? ही खात्री झाली ती हिच्या वडिलांची आणि श्री. रस्से काकांनी सांगीतलेले ठिकाण म्हणजे 'आपण त्यात अजून काय पहाणार आहे ?' हा आमचा घरचा विचार ! एवढे दोन्हीकडून असल्यावर नकाराचा प्रश्नच नव्हता ! लग्न झाले !
श्री. रस्से काका काही वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाले त्यावेळी, हिचे वडील म्हणाले, 'मला, एकनाथ म्हणून एकेरी हाक मारण्याचा अधिकार असणारे गेले.' यांत कोणत्या भावना सामावल्या नव्हत्या ? आज श्रीमती रस्से काकू गेल्यावर हिला या सगळ्या गोष्टी आठवून गलबलून येत होते. काय कुणाचे नातेसंबंध असतात व कुठे कुणाचे ऋणानुबंध असतात ! व्यक्ती जन्माला आली असते ती जाणार, कायमची अंतरणार हे नक्की ! त्या जन्ममृत्युमधील काळात, त्या तिच्या आयुष्यात तिचे किती जणांबरोबर संबंध येतात, ऋणानुबंध निर्माण होतात नाही ! आज आमच्या लग्न जुळविण्यातील सहभाग असलेली एक कडी अजून निखळली !
------------------------------------------
आज सकाळीच प्रवासाला निघावे लागले. मनांत विचार सुरू होता आपल्याला येथपर्यंत आणण्यांत किती लोकांच्या सद्भावना असतात नाही ?
माझ्या वधूसंशोधनाचे वेळी आवर्जून मुलीची कुंडली बघून गुणमेलन व्यवस्थित जमते आहे का ? प्रत्येक ग्रह व त्याची दृष्टी कशी आहे ? त्याचा काय परिणाम होईल ? शुभाशुभ काय आहे ? हे कसलीही अपेक्षा न ठेवता पहाणारे कै. डॉ. नरहर पुरुषोत्तम जोशी ! गेल्या वर्षी ते पण गेले !
माझे लग्नाचे सर्व धार्मिक विधी स्वत: करवून घेणारे कै. मधुकर विटवेकर हे पण गेले. 'इतर कोणाला समजत नाही, शॉर्टकट मारतात. मंत्रांची धरसोड ! तुमच्या आयुष्यावर वेडेवाकडे परिणाम व्हायचे ! कसे चालेल मला ?' म्हणून काळजी वहाणारे ! माझ्यावर गुदरलेले संकट पाहून जवळपास महिनाभर रोज देवीचे पाठ वाचण्यासाठी तीन मैल दूर माझ्या घरी येणारे ! 'मी कितीही काळ, अगदी तुझे संकट दूर होईपर्यंत देवीची प्रार्थना करणार आहे.' हे मला व देवीला, प्रत्यक्ष जगन्मातेला सांगणारे कै. मधुकर विटवेकर ! हे माझे कोणत्या जन्मीचे ऋण फेडत होते का मला पुढील जन्मांत त्यांचे ऋण फेडावे लागणार आहे कोणास ठावूक ?
ही अशी काही माणसं आहेत म्हणून तुम्ही आम्ही टिकलो आहोत. यांच्या घरी जायला यायला, मुक्काम करायला कधीही संकोच वाटणार नाही अशी ही माणसं ! आपण गेल्यावर त्यांचा चेहराच झालेला आनंद सांगत असे. अशी माणसं व घरं दिवसेंदिवस कमी होत चालली. घरं कमी होत चालली आणि लॉजची संख्या वाढायला लागली.
श्रीमती रस्से काकू गेल्याची बातमी ऐकली व मन कुठल्याकुठे गेले नाही ?

१ मार्च २०१७

No comments:

Post a Comment