Friday, June 2, 2017

प्रवासातील विचार


प्रवासातील विचार

आज सकाळी आम्ही जेव्हा जळगांवला निघालो त्यावेळी मला दिवसभरातील कामे दिसत होती. कामे अशी भरपूर दिसत असतात, त्यातील कोणती व किती दिवसभरांत पूर्ण होतात, याची कल्पना नसते. आपल्यावर पूर्णपणे अवलंबून असणारीच कामे आपल्याला करता येतात. बाकी मग दुसऱ्यांवर अवलंबून असतील, ती त्यांचे सहकार्य मिळाले तरच होतात ! त्यामुळे मनांतून किती कामे होतील हा विचार काढून टाकला, काही सुचतही नव्हते, पण मग निवांतपणे अधूनमधून वाहनचालकाशी गप्पा मारू लागलो. लिहावे असे काही डोक्यात येत नव्हते. मी अलिकडे प्रवासात येथे काहीबाही लिहीत असतो. आपण वाचावे ही अपेक्षा नक्कीच असते पण सांगतांना 'स्वांतसुखाय' सांगावे लागते ना !
औरंगाबादहून जसा रस्त्याने थोडा पुढे आलो तशी ड्रायव्हरला चहाची तलफ आली. 'चहा घ्यायचा का ?' त्याने विचारले. मी नाही म्हणालो, 'आमचा निघण्यापूर्वी भरपूर झाला आहे, तू घे. संकोच करू नको.' तो थांबला, त्याने चहा घेतला व मग आम्ही निघालो. सहज त्याला विचारले, 'रस्त्याला लागून असलेले काही 'बार' दिसत नाही. कोर्टाच्या निकालाने की काय ? परिणाम होईल का पण ? पण लोकांना काय, ज्यांना घ्यायचे ते कशीही उपलब्ध करून घेतात !' त्यांवर तो सहजतेने म्हणाला, 'नाही, ते एवढे सहज व सोपे नसते. पहिले ड्रायव्हर केव्हा पण गाडी थांबवून पेग मारून येत असे ते कोणाला समजत नसे. आता जवळपास ५०० मीटर दूर जाणे, एवढे सोपे राहिले नाही. अपघात नक्की कमी होतील.' दिवसरात्र वाहनांत रमलेला हा मला सांगत होता, 'ज्या कोणी निर्णय घेतला असेल, हिंमतवान आहे. अपघातात किंवा कोणत्याही कारणाने घरातला कमावता माणूस गेला की त्याचे सगळे कुटुंब उघड्यावर पडते. कोणी कोणाचे नसते ! ती माऊली बिचारी काय करेल ? घरांत पोरांना खाऊ घालेल का बाहेरून पोरांसाठी कमवून आणेल ? दोन दिवस कोणी विचारते, नंतर जवळचे असलेले सर्वात दूर जातात. काय जगणार आणि कोणाला जगवणार ? कसले शिक्षण आणि कसले काय ? खरोखर परमेश्वरच त्याचा वाली असतो, म्हणजे काय तर 'कोणीच वाली नसतो' ! ज्याचे त्यालाच निभावून न्यावे लागते. अर्धवट झालेला संसार उघड्यावर पडणे तर फार वाईट ! त्या माऊलीला कुठे जाता येत नाही कारण तिची लेकरं असतात, पण त्या लेकरांसाठी काही करता येत नाही, ही तिची तगमग तिला जिवंत ठेवते.' त्याचा स्वर बदलला व मी गप्प बसलो.
दिवसरात्र वाहनांचा विचार करणारा हे वाहन चालवतांना मला सांगत होता. खरंच ! गेल्या काही वर्षांतील अपघातांचे प्रमाण व त्यांचे कारण जर काढले तर - दारू पिवून गाडी चालविणे हे एक महत्वाचे कारण त्यांत दिसेल. दारू का प्यायली जाते ? याचा पण शोध घेतला पाहिजे. केवळ महसूलाचे, उत्पन्न वाढविण्याचे साधन आहे म्हणून समाजाने व सरकारने कशाला प्रोत्साहन द्यावे वा जनतेच्या कोणत्या गैरकृत्याकडे कानाडोळा करावा याचा गंभीरपणे विचार करून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची आता वेळ येवून ठेपली आहे.
सरकारला आपला खजीना भरतांना, खजिन्यापेक्षा जनतेच्या आरोग्याची व स्वास्थ्याची काळजी असावयास हवी. पैसा कोणत्याही मार्गाने आला तरी त्याचा उपयोग करता येतो हे विशिष्ट मर्यादेपर्यंतच ठीक आहे; कारण हा असा पैसा उभारतांना त्याचे समाजघटकांवर होणारे भलेबुरे परिणाम लक्षात ठेवले पाहिजे तरच त्या पैशांचा खरोखर काही उपयोग होईल का हे ठरवता येईल. सरकारचा खजीना हा सुदृढतेने उभा केलेला असेल तर तो जनतेच्या उत्तम आरोग्यदायी आयुष्याचा, प्रगतीचा पुरावा ठरेल.
---------- ---------- --------- -------
दुपारनंतर जळगांवहून औरंगाबाद परतीला निघालो. जेवणानंतर स्थिरपणे गाडी जात होती. बऱ्यापैकी डोळा लागला होता. माझी डोळ्यांची झोपाळू अवस्था पहाता डोळ्यांवरचा चष्मा सौ. ने जवळपास ओढून काढला. मला हे जाणवले, मी झोपेतही जागा असतो, असा प्रवाद आहे; कसा जागा असतो तो भाग वेगळा !
सौ. सकाळी म्हणाली होती, 'आपण एकदा अंदमानला जावून येवू, जोपर्यंत आपल्याला चेन्नईला जावे लागते तोपर्यंत ! त्यानंतर खरं नाही !' सकाळी मी काही बोललो नव्हतो. मात्र गाडी थांबल्यासारखी वाटली. 'जयोऽस्तुते, जयोऽस्तुते, श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे --' स्वातंत्र्यवीर सावरकरांची तेजस्वी वाणी मंगेशकर भावंडांच्या मुखातून ऐकू आली. मी झोपलेला राहणे शक्यच नव्हते. 'आपण अंदमानला जावू.' डोळे उघडून पहिले वाक्य मी बोललो. संपूर्ण गाणे ऐकले. ड्रायव्हरने कोठले छान चॅनल लावले होते. चहा घेतला आणि सकाळी जे काही सुचत नव्हते, ते सुचायला लागले.

९ एप्रिल २०१७

No comments:

Post a Comment