Saturday, June 3, 2017

प्रवास

प्रवास

याला तर बसने, गाडीने कधीच नेवू नये आणि या त्याच्या आईला पण ! --- माझा मित्र जोरात सांगत होता.
तुमची आईपण होती सोबत ! ---- हा टोला कोणी कोणास मारला असेल हे सांगण्याची अनुभवी मित्रजनांना अजिबात आवश्यकता नाही.
सौ. वहिनींच्या माझ्या मित्राला मारलेल्या टोल्यातील लागलेला स्वर आणि त्याचे वाक्य पूर्ण होते न होते तोच मुखडा उचलण्याची तडफ पाहिल्यावर त्यांचे घराणे कसलेल्या गवयाचे आहे याची खात्री पटली. घराणे गवयाचे नसेल तर भलेही जन्मजात परमेश्वरी देणगी म्हणता येईल. पण भल्याभल्या गवयांना स्वर लावणे किती अवघड असते, हे सांगावे लागते आणि इथे सौ. वहिनींच्या रूपात माझ्यासमोर साक्षात गायनकळा उभी होती. मी हे उघडपणे बोललो नाही कारण अशा गायनकळा घरोघरी असतात व आपला हा गुण(?) त्या प्रसंगोपात दाखवतात.
सर्वच भडाभडा उलट्या करत होते, गाडीत बसणे कठीण, का चालवणे कठीण, अशी अवस्था होती. यांना पुन्हा कधी नेणार नाही, मी एकटा जाईल. मला पण त्रास होतो की काय, असे वाटायला लागले होते. ---- मित्राची अजिबात दम नसलेली तक्रार ! त्यावरील सौ. वहिनींचा त्याच्याकडे बघण्याचा जो प्रतिसाद होता त्यावरून यांना स्वरज्ञानच नाही तर अभिनयाचे, विशेषकरून मुद्राभिनयाचे देखील उत्तम अंग आहे हे लक्षात आले.
'नाही रे ! तशी गाडी वगैरे काही लागत नाही. मी भरपूर प्रवास केला आहे बसने !' ------ माझा मित्रकर्तव्यास जागून त्यास धीर देणे. 'हे पहा, एकदा प्रवासात बसने मी बंगलोर ते विजापूर असा रात्री बसलो. सकाळी विजापूरला आलो, लगेच सोलापूरच्या बसमधे बसलो, ते थेट औरंगाबादलाच ! तेथे जेवण केले आणि तेथून बसने जळगांवला ! जळगांवला आल्यावर पहातो तो काय रावेरची बस उभीच ! झाले, तिकीट काढले आणि रावेरच्या बसमधे बसलो. बस थेट रावेरलाच !' मी आवेशांत बोलत होतो पण माझे सौ. वहिनींकडे लक्ष नव्हते.
माझे बोलणे पुरे होते न होते तोच सौ. वहिनी आंत घरात गेल्या, मित्र चिंताक्रांत झाला; त्याने -'अरे, तू नंतर ये. हिची तब्येत बरी नाहीये जरा.' असे म्हणत मला चहापण न देता जवळपास कटवलेच. निघतानिघता आतून उलट्या होण्याचा आवाज आला. बसच्या प्रवासाची घटना ऐकल्यावरही परिणाम होतो, म्हणजे मित्र मला खरंच सांगत होता.
बरेच दिवस माझा मित्र व सौ. वहिनी एकाचवेळी माझ्यावर राग धरून होते; शेवटी कशीबशी सौ. वहिनींची समजूत काढली, ती माझ्या मित्राला काही समजत कसे नाही, याची विविध उदाहरणे देवून ! त्यातील काही घडलेली होती व बरीचशी न घडलेली. त्यानंतर सौ. वहिनी मला त्यांच्या गटातील समजायला लागल्या, त्यामुळे मित्रालापण माझ्याशी नमते घेवून जुळवून घ्यावे लागले.
टीप - मी माझ्या कोणत्याही मित्राचे नांव टाकलेले नाही. आपापल्याशी ताडून पहावे. साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा पण आतातरी राग धरू नये !

११ डिसेंबर २०१६

No comments:

Post a Comment