Saturday, June 3, 2017

गप्पा श्री. प्रवीण बर्दापूरकर यांच्याशी

गप्पा श्री. प्रवीण बर्दापूरकर यांच्याशी

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध लेखक व पत्रकार श्री. प्रवीण बर्दापूरकर यांच्याशी फोनवर बोलणे झाले. मी तसे त्यांचे लेखन लोकसत्ता यांत पूर्वीपाससूनच वाचत आलेलो होतो त्यामुळे मला ते अजिबात अपरिचित नव्हते. तसा मी त्यांना अपरिचित, परिचय होण्यास कारण 'फेसबुक' ! माझ्या अधूनमधून काही लिहीण्याकडे त्यांचे लक्ष गेले, माझे भाग्य ! त्यांनी मला मेसेज पाठवला - एकदा बोलूया ! आणि त्यांच्या संपर्क क्रमांक पाठवला. वा ! आमचे व्यवस्थित बोलणे झाले. माझ्या 'फेसबुक' वरील लिखाणाबद्दल त्यांनी बोललेल्या कौतुकाच्या शब्दाने मला निश्चितच समाधान वाटले. ---त्यांनी मला मेसेज पाठवणे, 'बोलू या' म्हणणे यांत माझा काहीही मोठेपणा नसून त्यांचाच उमदेपणा व धाकट्यांचे कौतुक करण्याची वृत्ती आहे.
मला कोणाचाही फोन आला म्हणजे तो जुन्या किंवा नविन पक्षकारांचा आणि वकिलीच्या कामासंबंधीच असतो, हा बहुसंख्य अनुभव ! अलिकडील काही वर्षांत इकडे औरंगाबाद येथे उच्च न्यायालयांत वकिली व्यवसायासाठी आल्यानंतर गांवाकडील अवांतर विषय व त्या अनुषंगाने असलेले संबंधही बरेचसे कमी झाले होते. संगीताचा संबंध श्रवण करणे इतपतच जेमतेम उरला होता. माझे लिखाण मात्र त्यामानाने नियमीत सुरू असते, विविध विषयांवरचे आणि आमच्या कायद्यासंबंधाने पण ! आकाशवाणी जळगांव व औरंगाबाद येथे या निमित्ताने अधूनमधून माझी उपस्थिती असते. या जोडीला गेल्या काही वर्षांत हे 'फेसबुक' चे माध्यम मिळाल्याने, येथे काही खरडून लगेच प्रसिद्ध पण करता येते ! आपल्या कौतुकाच्या प्रतिक्रिया ते आपल्याला काही अक्कल कशी नाही, या मर्यादेपर्यंत आणि भाषेच्या विविध छटांचा आधार घेवून आलेल्या प्रतिक्रिया अनुभवायास मिळतात. असो.
काल सकाळी नेहमीप्रमाणे लवकर जाग आली - 'इतक्या लवकर कोणासही फोन करायचा नाही, तुम्ही लवकर उठतात म्हणून सर्वच उठत नाही.' या मला दिलेल्या कायमस्वरूपी आदेशाचे स्मरण करून मी डोक्यात घोळत असल्याने श्री. प्रवीण बर्दापूरकरांना 'आज त्यांना भेटण्यास वेळेची विचारणा केली.' उत्तर आले, दुपारी त्यांचेकडे गेलो.
अगत्याने, नैसर्गिक स्वागत ! परकेपणा अजिबात नाही. आंतल्या खोलीत गप्पा सुरू झाल्या. राजकारण, समाजकारण, लोकसत्तातील दिवस ! नागपूर, मुंबई, दिल्लीचे पत्रकारीतील अनुभव, गमतीजमती आणि व्यथा ! मा. अटलजींपासून ते अलिकडील मा. देवेंद्र फडवणीस यांच्यापावेतो, विविध पक्षांतील व्यक्तींचे काम, अनुभव यांच्या गप्पा ! न्यायालयीन कामासंबंधी वर्तमानपत्रातील सदराचा विषय निघाल्यावर न्यायालय व वकिलमंडळी यांचेही विषय रंगले ! व्यासंग खूप व अनुभव भरपूर - साधारणत: दीडतास कसा गेला हे मला तर समजले नाही, त्यांचे काय झाले कुणास ठावूक ? बहुतेक ते त्रासले नसावेत असे वाटते कारण मी आपला फोटो काढूया का, म्हटल्यावर हंसतच शर्ट बदलून आले. येतांना त्यांच्या हातात पुस्तक होते - 'आई' ! ती प्रेमाची भेट मला दिली.
आज प्रवासात तेच पुस्तक वाचत होतो. त्यांची 'भूमिका' वाचली ! समाजाच्या निम्म्या, सृजनशील भागाची भूमिका व मानसिकता लिहीली आहे ! विविध लेखकांच्या मनोगताच्या स्वरूपात ! पहिला लेख होता - गिरीष कर्नाड यांचा ! वाचला आणि स्तब्ध झालो. सर्व लेख पचवायला सोपे नाहीत, हे लक्षात आले. स्वतंत्र लिहावे लागणार !
हे लिखाण --- खास श्री. प्रवीण बर्दापूरकर यांच्या सोबतच्या गप्पांसाठी !

१८ डिसेंबर २०१६

No comments:

Post a Comment