Friday, June 2, 2017

वाद्यवृंद अर्थात ऑर्केस्ट्रा

वाद्यवृंद अर्थात ऑर्केस्ट्रा

आज असाच सकाळी जात होतो. गाडीचालकाने गाणी लावलीत. मी सहज विचारले, 'जुनी गाणी आहेत ? लाव जरा.' तो मोठ्या उत्साहाने म्हणाला, 'वा, वा ! आहे नं, ही पहा.' असे म्हणत त्याने लावली. तो मोठ्या मुष्कीलीने ७०-८० च्या काळांत गेला. त्याला जास्त मागे जाता येईना. त्याला 'बिनाका गीतमाला' आणि 'अमीन सयानी' माहीत नव्हते. मी सांगत असलेले त्याला काही वेगळेच वाटत होते. शुद्ध व सकस अन्न खायला मिळालेल्या आम्हाला अलिकडील बेचव व निकस अन्नाचा घास घेववत नाही, गिळवत नाही.
त्याने 'ज्युली' या चित्रपटाचे गाणे लावले. 'ज्युली, ओ ज्युली--' गाणे ऐकायला छानच होते. मी चित्रपट पाहिलेला नाही, बघायचा आहे. त्याला विचारल्यावर त्याला काहीच सांगता येईना.
निदान सत्तरीच्या दशकांत, वाद्यवृंद म्हणजे त्या काळातील आवडता शब्द म्हणजे - आॅर्केस्ट्रा ! काय लोकांना भारून टाकले होते ? 'मेलडी मेकर्स', 'प्रमिला दातार' यांचा वाद्यवृंद मी ऐकला आहे.
'मेलडी मेकर्स' हा खरंच सुंदर वाद्यवृंद होता. त्यांत एक कलाकार युगुलगीत एकट्यानेच म्हणायचा ! ज्या वेळी तो स्त्री आवाजात गाणे म्हणायचा त्यावेळी सर्व श्रोतृवर्गातून अविश्वासाचा चित्कार उमटायचा ! काय पण कलाकार होता ? संगीत नियोजन खूपच छान ! बहुतेक 'श्री. सुदेश भोसले' होते का नीट आठवत नाही. हा कार्यक्रम 'स्टेट बॅंकेच्या गणेशोत्सव मंडळातर्फे' झाला होते. त्यांचे कार्यक्रम छानच व्हायचे.
पहिल्या दिवशी रावेरचे प्रसिद्ध किर्तनकार कै. मुकीमबुवा यांचे किर्तन व्हायचे. त्या गणेश मंडळाने त्या काळात साक्षात 'जयवंत कुलकर्णी' यांना बोलावले होते, सोबत गायिका पुष्पा पागधरे पण होत्या. दादा कोंडके यांचा 'पांडू हवालदार' नुकताच प्रदर्शित झाला होता. आमच्या गांवातही 'पांडू हवालदार' तो पावेतो लागला नव्हता. काय गर्दी उसळली म्हणून सांगता !
सौ. प्रमिला दातार या त्यावेळच्या प्रतिथयश गायिका ! त्यांचा पण आॅर्केस्ट्रा होता, 'सुनहरी यादें' या नांवाचा ! त्यांचा आवाज हा चिरपरिचीत होता, त्यांनी चित्रपटातीलही बरीच गीते गायली आहेत. त्यांच्या सोबत कदाचित त्यांची मुलगी असावी, तिचा पण आवाज छान होता. तिने 'ज्युली' या चित्रपटातील 'माय हार्ट इज बिटींग' हे गीत म्हटले होते. सौ. प्रमिला दातार यांनी 'पाडाला पिकलंय आंबा' हे ज्या ठसक्यात म्हटले होते ते चित्र अजूनही डोळ्यांसमोर आहे.

५ मार्च २०१७

No comments:

Post a Comment