Friday, June 2, 2017

रेल्वे प्रवास

रेल्वे प्रवास

आज बऱ्याच काळानंतर जळगांवहून मुंबईला रेल्वेने प्रवास करत आहे. मी जसा व्यवसायाच्या निमित्ताने औरंगाबाद येथे गेलो तसा रेल्वेने प्रवास करणे एकदम कमी झाले. आपण एकटे जरी कुठे स्थलांतरीत झालो तरी आपल्या संबंधीत असणारी कामे, आपली नातेवाईक व मित्रमंडळ यांची ठिकाणे तीच असतात. तिथे जायचे तर उपलब्ध रेल्वे जवळपास नाही, मग रेल्वे वाहतूकीऐवजी रस्ता वाहतूक, मिळेल त्या बसने; खाजगी वा महामंडळाच्या ! दिल्लीला जायचे तर जमले तर विमानाने ! मी इकडे माझ्या गांवी होतो, त्यावेळी दिल्लीला जरी जायचे असले तरी खूप गाड्या होत्या व आजही आहेत.
एकदा असेच दिल्लीहून घरी परतायचे होते, तिकीट काढायला रिझर्वेशन काउंटरवर गेलो. वेगवेगळ्या गाड्यांची परिस्थिती विचारली, काहींना शिल्लक होते पण वेळ सोयीची नव्हती तर काहींना वेळ सोयीची होती तर तिकीट शिल्लक नव्हते. शेवटी एक जरा बरी सोयीची गाडी दिसली आणि मी प्रश्न विचारला, 'भाई, लेकिन ये भुसावल रूकेगी ?' या माझ्या प्रश्नाने कडेलोट झाला आणि तो उत्तरला, 'ऐसी कौनसी गाडी हैं जो भुसावल होकर जायेगी और भुसावल नहीं रूकेगी ?' त्याच्या या उत्तराने मी खूष झालो ते भुसावळचे रेल्वेत किती महत्व आहे यामुळे ! मी त्याला म्हणालो पण - 'भाई आप तो त्रस्त हो गये, मेरे सवालसे; लेकिन मैं खूष हो गया अपने जबाबसे । अपने गावका बडप्पन किसको अच्छा नहीं लगेगा ?' यांवर त्याला पण हसू आले. हे मात्र खरे की भुसावळहून भारतात सर्व दिशांना जाण्यासाठी गाड्या मिळतात.
आता हे नेमके आठवले कारण आज माझा प्रवास सुरू आहे तो पण, मला आवडणाऱ्या 'अमृतसर दादर' या गाडीने ! ही गाडी तुलनेने स्वच्छ असते व सोबत प्रवासी बरे असतात. प्रत्येक गाडीचे असे भलेबुरे वैशिष्टय असते, ते त्या गाडीतून नेहमी प्रवास करणाऱ्यांच्या वर्तनावरून ठरत असते. फक्त महाराष्ट्रातूनच प्रवास करणाऱ्या रेल्वेला महाराष्ट्रीय लोकांचा रांगडा प्रेमळपणा असतो, तर अमृतसर वगैरे त्या भागातून येणारे प्रवासी सोबत खाण्यापिण्याचे जिन्नस बऱ्यापैकी सोबत घेवून येतात आणि शेजाऱ्याला सहजपणे विचारण्याचे औदार्य दाखवतात. काही गाड्यातील प्रवासी हे आढावूपणा, हेकेखोरपणा व आडदांडपणासाठी ओळखले जातात.
या गाडीचा आता शेवटचा थांबा दादरला नाही तर 'छत्रपती शिवाजी टर्मिनस'ला आहे, हे समजले. आता पूर्वीपेक्षा गाडीचा वेग वाढलेला वाटतो, मात्र ही आता पूर्वीच्या वेळेपेक्षा निदान एक तास लवकर येत असल्याने मुंबईला पहाटे बरीच लवकर पोहोचणार, यांत शंका नाही.
चाळीसगांवला धुळ्याहून चाळीसगांव पर्यंत येणाऱ्या गाडीचे काही डबे जोडले जायचे, आता पण जोडले जातात; त्यामुळे धुळे ते चाळीसगांव किंवा त्या भागातील लोकांना देखील ही गाडी सोयीची वाटते. रेल्वेइतका तुलनेने स्वस्त प्रवास अजूनही आपल्याला मिळतो आहे हे या व्यापारी विचार असणाऱ्या काळांत खरोखर धन्य आहे. आपण मात्र ही जनतेला सेवा देणारी जनतेची संपत्ती जपली पाहिजे, तिचे रक्षण केले पाहिजे, तिला विनाशापासून वाचवायला हवे !
या गाडीचे रिझर्वेशन तिकीट पूर्वी सहज मिळायचे, कारण 'रावेरला' संगणकीय पद्धत नव्हती, एकंदरीतच प्रसार कमी होता. आता कोणी कुठूनही कोठलेही तिकीट काढून तिथले तिकीट संपवतो. मात्र जसे संगणक युगाने चांगले बाळसे धरले, तसे त्याचे फायदे दिसू लागले. रेल्वेने प्रगती केली, आता भल्यामोठ्या रांगेत उभे राहून वेळ न घालवतां केवळ मोबाइलवरूनही तिकीट काढतां येते, भारतातील कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही ठिकाणापर्यंत !
पंचवीस-तीस वर्षांपूर्वी मिळेल त्या गाडीने रिझर्वेशन मिळाले आणि न मिळाले तरी मुंबईला किंवा कुठेही लांबवर ये-जा करणारा मी ! एवढेच नाही तर साधारण अठरा-वीस वर्षांपूर्वी अगदी आई-वडिल, लहान बाळं वगैरे यांच्या म्हणजे सातआठ जणांसोबत विना रिझर्वेशनने जवळपास महिनाभर प्रवास करणारा आणि तो पण उत्तरभारतात ! या भरवशावर की तेथे प्रत्येक ठिकाणी ऐनवेळी गेल्यावर सर्वांचे रिझर्वेशन काढणारा मी ! आता मात्र कुठेही, लांबवर जायचे असेल तर, पहिले गाडीच्या तिकीटाची काळजी घेतो, रिझर्वेशन करतो; मगच प्रवास करण्याचे निश्चित करतो.
कसे व किती बदल होत असतात नाही - गाडीच्या व्यवस्थेत व प्रवास करणाऱ्यांत !

२ एप्रिल २०१७


LikeShow more reactions
Comment

No comments:

Post a Comment