Friday, June 2, 2017

तेंव्हा तुझा धर्म कुठे गेला होता ?

तेंव्हा तुझा धर्म कुठे गेला होता ?

महाभारतात महर्षी व्यासांनी आपल्या दिव्य प्रतिभेने अठरा पर्व लिहीलेले आहेत आणि जगावेगळे, अजरामर महाकाव्य जन्माला घातले आहे. त्यातील कर्ण पर्वातील हा चितारलेला एक प्रसंग आहे. माझे महाभारतासंबंधी एक आकलन आहे, महर्षी व्यासांनी आपल्या या अद्वितीय लिखाणात कोणत्याही पात्रावर अन्याय केला आहे असे मला वाटत नाही. काही पात्रांच्या दु्र्दैवाने आपण आजही दु:खीत होतो, एवढे हे जिवंत चित्रण आज देखील आहे.
आयुष्यभर सतत पांडवांचा द्वेष करून आणि दुर्योधनाच्या दुर्व्यवहारांना कायम साथ देत आलेल्या कर्णावर, त्याच्या आयुष्यातील शेवटची परिक्षा पहाणारा प्रसंग येतो आणि त्याला दयेची भीक मागावी लागते; ज्याच्याकडे, की त्याचा त्याने आयुष्यभर द्वेष केला होता. आपल्या रथाचे चाक अर्जुनाशी युद्धाचे वेळी जमीनीत रूतल्यावर कर्णाला आठवतात ती 'धर्मयुद्धातील तत्वे' ! 'मी रथावर नसल्याने व तू रथावर असल्याने माझ्याशी युद्ध करू नको. असे युद्ध हा अधर्म आहे.' यांवर कर्णाने आयुष्यभर पांडवांशी केलेल्या दुर्वर्तनाची, त्याच्या अधर्माची आठवण भगवान श्रीकृष्णाने त्याला करून दिली. हा कर्ण पर्वातील 'क्व ते धर्मस्तदा गत:' या वचनाने पुन:पुन: कर्णाच्या पापाचा पाढा भगवान श्रीकृष्णाने वाचलेला अध्याय प्रसिद्ध आहे.
मोठी गंमत आहे, आयुष्यभर पांडवांशी अधर्माने चिंतणाऱ्या कर्णाला आयुष्याच्या शेवटी देखील पांडवाने मात्र त्याच्याशी धर्मानेच वागावे असे वाटते. असे अधर्माचरण करणाऱ्यालासुद्धा वाटणे हा धर्माचा विजय आहे; तर अशा वेळी कसे वागावे याचे अर्जुनाने आपल्या कृतीने दाखविले ते भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशावरून ! हे आहे धर्माचे वर्तन व खऱ्या धर्माचा अर्थ !
आपल्या पूर्वजांनी हे महान साहित्य निर्माण करून आपला रस्ता प्रकाशमान केला आहे. आपण डोळे उघडे ठेवून चालणे अपेक्षित आहे, तसे केले तर न ठेचकाळता लक्ष्यापर्यंत जावू; मात्र डोळे बंद करून चालायला लागलो तर भलत्याच वाटेने जावून भलतीकडेच पोहोचू !

१०फेब्रुवारी २०१७

No comments:

Post a Comment