Friday, June 2, 2017

कहॉं गयें वो लोग ?

कहॉं गयें वो लोग ?
मला डॉक्टर म्हणजे नेमके काय असे निदान चौथीपर्यंत तरी समजत नव्हते, मात्र लौकीकार्थाने त्यांच्या म्हणजे डॉक्टरांच्या घरांत लहानपणापासून वावर ! रावेर येथील कै. के. एम्. आठवले त्यांना सर्व गाव 'भाऊ आठवले' म्हणून ओळखायचे ! त्यांचे व आमचे खूप जुने संबंध, निदान तीन पिढ्यांचे; मी स्वत: पाहिलेले आहे. ते मला डॉक्टरांपेक्षा आजोबा म्हणूनच जास्त परिचित. त्यांचा नातू, आताचा डॉ. राजेंद्र आठवले व मी अगदी लहानपणापासून बरोबर ! एखादे वेळी त्यांनी औषध दिले असेल, नाही असे नाही पण ते औषध देत नसून काहीतरी खाऊ देत आहेत असेच वाटायचे. त्यांच्यावरील जनतेच्या श्रद्धेची एक गोष्ट मी नेहमी ऐकत आलेलो आहे. एकदा असेच आमच्या शेजारी, आजोबांकडे ते आले होते. वेळ रात्रीची होती. तेथे पण एक पेशंट आला, 'पोट दुखते म्हणून सांगीतले.' त्यांनी तपासले व आतमध्ये जावून चुलीतील राख तीन पुड्यांत बांधून आणली व सांगीतले, 'घरी जा, आता लगेच पाण्यासोबत एक पुडी घे. झोपतांना दुसरी घे आणि सकाळी तिसरी घेवून मला सांगायला दवाखान्यात ये.' तेथे बसलेल्यांचे काहींच्या लक्षात आले असावे, त्यांवर 'डॉ. भाऊंचे' उत्तर आले, 'त्याला काही झाले नव्हते.' दुसऱ्या दिवशी तो पेशंट डॉ. भाऊंचे आभार मानण्यासाठी आला. 'भाऊ, काय रामबाण औषध दिले पण ?'
माझा जास्त संबंध आला, तो कै. प्रभाकरकाकांशी ! डॉ. प्रभाकर आठवले यांच्याशी, डॉ. भाऊ आठवले यांचा वारसा समर्थपणे चालविला तो डॉ. प्रभाकरकाका व डॉ. मधुकाका या त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी ! माझे वडील व प्रभाकरकाका हे बरोबरीचे ! प्रभाकरकाका हे त्यांच्या सडेतोड व स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध ! तेथे उपचार करणे शक्य नसेल तर ते अजिबात थांबवायचे नाही; रूग्णावर प्रयोग न करता त्याला शहरांत योग्य दवाखान्यात पाठवीत. माझे नवीन घर तसे गांवापासून बरेच लांब ! तेथून गांवात जायला बऱ्याच वेळी रिक्षा मिळत नसे, गांवात पायी यावे लागे. दवाखाना गांवात ! एकदा माझ्या मुलीला बरे नव्हते, ताप होता, त्यात उन्हाळ्याचे दिवस ! तो पण खानदेशमधील उन्हाळा ! पायी कडेवर घेवून मुलीला घेवून माझी पत्नी प्रभाकरकाकांकडे गेली ! जेव्हा माझ्या पत्नीला कै. प्रभाकरकाकांनी पाहिले, त्यांवेळी ते आंत घरात गेले, 'आजच्या काय पोरी आहेत, उन्हातान्हात येतात ! नवऱ्याने पाठविले का असे, बोलतो त्याला.' असे म्हणत कै. उषाकाकूंला सरबत करायला लावले. त्यानंतर मग जवळचे औषध दिले. हिने मला सांगीतल्यावर मला अजिबात आश्चर्य वाटले नाही कारण हा असा अनुभव माझ्या लहानपणापासूनचा !
एकदा माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावर गरम दूध पडले. चेहरा भाजला, ती प्रभाकरकाकांकडे गेली. त्यांनी औषध दिले आणि सांगीतले, 'तू येथे यायचे नाही. चेहरा भाजलेला आहे. इन्फेक्शन झाले तर त्रास होईल. मी घरी येत जाईल. मला काय कोणाचीही गाडी मिळेल.' आणि ही पूर्ण बरी होईपर्यंत प्रभाकरकाका तिची तब्येत पहायला एवढ्या लांब मिळेल त्या वाहनाने माझे घरी येत असत. त्यांच्या प्रॅक्टीसबद्दल औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींची प्रतिक्रिया म्हणजे - 'ते प्रॅक्टीसमधे रावेरचे वाघ होते.'
आम्ही त्या घरी नेहमीच जात असू वडिलांबरोबर, त्या वेळी जर बरे असेल तर खाऊ मिळायचा व बरे नसेल तर खाऊसारखे वाटणारे औषध ! त्यांचे औषध व रोगनिदान अत्यंत अचूक असे. रावेरसारख्या ठिकाणी कोणत्याही साधनाशिवाय इतके अचूक निदान पाहिले की आजच्या भरमसाठ चाचण्या केल्यावरही स्वत: घोटाळ्यात पडणारे व रूग्णालाही घोटाळ्यात पाडणारे डॉक्टर जास्तच उठून दिसतात.
त्यानंतर आता माझा संबंध माझा डॉक्टर जास्त का मित्र जास्त असा असलेला डॉ. राजेंद्र आठवले ! हा व मी पहिलीपासून ते दहावी पर्यंत बरोबर नंतर आमच्या शिक्षणाच्या दिशा बदलल्या ! मी वकिली व्यवसाय स्विकारला तर त्याने त्याचा पिढीजात वैद्यकीय व्यवसाय ! मला त्याच्याकडे जायला माझी प्रकृती बिघडलीच पाहिजे असे कधीच नसते, आमच्या अवांतर गप्पा देखील सुरू असतात. गेल्या काही वर्षांपासून मी इकडे औरंगाबादला आलो. आईवडिल बहुतांशपणे रावेरला तिथेच असायचे, मला त्यांची वयोमानाप्रमाणे काळजी वाटायची ! 'मी आहे इथं, तू काय करणार आहे इथं येवून ?' हे इतरांच्या दृष्टीने डॉ. राजेंद्र आठवले यांचे उद्गार असतील पण माझ्या दृष्टीने माझ्या मित्राचा तो मला यथार्थ धीर असायचा. एकदा मी बोलताबोलता त्याला असाच म्हणालो, 'अरे, मी इथं नसतो, तुझे पैसे देणे वेळेवर जमते, नाही जमत ! ते खाते काही ठेवू नकोस, लगेच बील घेत जा.' त्यांवर - 'गेल्या तीन पिढ्यांपासून चालत असलेले खाते बंद करायला तू मला सांगतो आहे. हे पाप मी करू ? मी खाते बंद करणार नाही, तुला जमेल तेव्हा पाठवत जा. अरे, आपल्या पिढीपर्यंत हे संबंध टिकून आहेत, यापेक्षा काय हवे ? पुढे आपण काय सांगू शकतो ?' हे त्याचे उत्तर ऐकल्यावर मी पुन्हा असे बोलण्याची हिंमत केली नाही. आजही मी मला, माझी मुले यांना जर काही बरे वाटत नसले तर नि:संकोचपणे कुठूनही त्याला फोन करतात व हा आमचा मित्र असलेला डॉक्टर निश्चित औषधी सांगतो किंवा काही नाही 'ओवा घे, गरम पाणी घे.' असेही सांगतो, अगदी कोणताही कमीपणा न मानता. याचे इतरांना आश्चर्य वाटते पण मला नाही. असे या आठवले कुटुंबाचे वागणे फक्त माझ्यापुरतेच नाही तर सर्वांसाठी आहे.
मुंबईचे प्रख्यात डॉ. बी. डी. पिंपरकर ! त्यांच्या पदव्या संपूर्ण ओळ पूर्ण भरेल इतक्या, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे ते त्यावेळचे डॉक्टर ! त्याच्या लाउड मॅन्शन मधील खोलीतील माणसांचे व पदव्यांचे फोटो पाहिल्यावर समजायचे की आपण कोणाकडे आलो आहे. हे त्यांच्या वागण्यातून मात्र अजिबात जाणवत नसे. अलिकडे वयोमानाने त्यांनी व्यवसाय थांबविला आहे. यांचा आणि आमचा संबंध माझ्या आजीपासूनचा ! मुंबईला आजी जायची तर यांच्याकडे किंवा हे सांगतील त्यांच्याकडे ! त्यांची तपासणी फी भयंकर असे ऐकलेले, अनुभव नाही. एकदा सुमारे ४-५ वर्षांपूर्वी मला त्यांच्याकडे जाण्याचे काम पडले. त्यांच्याकडील कम्पाउंडर सरोदे ! ते पण पहिल्यापासून ! त्यांनी १९६९ सालातील केसपेपर काढला, त्यांचा नांव समजण्यात गोंधळ झाला. माझे नांव आजोबाचे ठेवलेले आहे. तो केसपेपर वडिलांचा होता. त्यानंतर १९७९ सालातील माझा केसपेपर काढला व तपासले. नेहमी मुंबईला जाणे व्हायचे नाही, मी फोनवर त्यांना विचारायचे ते पण सांगायचे. अलिकडे बहुतेक दोन वर्षांपूर्वी फोन केला तर 'मी आता काम पहात नाही, पण तुमची तब्येत कशी आहे ? काळजी घ्या व पथ्य पाळा !' हे सांगीतले.
अशा खूप डॉक्टरांच्या अशा आठवणी आहेत ! डॉ. उल्हास कडूसकर, डॉ. नंदिनी आठवले, कै. डॉ. एन्. पी. जोशी, माझा मित्र डॉ. रविंद्र वानखेडे, डॉ. विवेक तडवळकर अजून खूप आहेत ! देवांच्या वैद्यांकडून, धन्वंतरीचा वारसा सांगणारी ही मंडळी त्यांच्याकडून आपल्यासाठी अमृत घेवून आलेली आहेत. आपण ओळखले पाहिजे की यांच्याकडे अमृत आहे ते ! आपण दुर्दैवी - लोकशाहीत सर्वच आपल्याला आपले नोकर वाटतात कारण मतदार राजा असतो ना !
अलिकडच्या वर्तमान पत्रातील डॉक्टरांच्या व जनतेतील 'सुसंवादाच्या बातम्या' वाचल्या, ऐकल्या वेदना झाल्या ---- आणि हे सर्व आठवले !

२६ 
मार्च २०१७

No comments:

Post a Comment