Saturday, June 3, 2017

गीता जयंती

गीता जयंती

आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी ! गीता जयंती !!
भगवद्गीता म्हटले की मी अगदी माझ्या पार लहानपणीच्या दिवसांत जातो. मी पाचवी-सहावीत असेल, माझे आजोळ जळगावचे ! उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुटीत मी नेहमी तेथे असायचो, परीक्षा पूर्ण होऊन सुटी लागायच्या अगोदरच तेथून पत्र आलेले असायचे. गावाला जायचा उत्साह, मात्र तेथे एकटेच राहावे लागायचे कारण आई तेथे उशीरा यायची; त्यामुळे जीवावरही यायचे ! तेथे गेलो की मला आजोबा स्वस्थ बसू देत नसत. सुटीत काहीतरी शिकले पाहीजे हे त्यांचे धोरण. मग सर्वात प्रथम शिकण्यासाठी नंबर लागला तो 'भगवद्गीतेचा' ! रोज पाच श्लोक शिकायचे म्हणजे त्यांनी एक श्लोक म्हणायचा, त्यांच्यानंतर मी म्हणायचो ! नंतर दुसरा असे करता करता पाच श्लोक ! मला श्लोक नीट म्हणता यायला लागला की मग पुढचा श्लोक म्हटला जायचा, असे करत करत पाचही श्लोक झाले की मग मी माझ्या मनाने म्हणू लागायचो. म्हणतांना उच्चार चुकले की तो श्लोक पुन्हा म्हणायचा ! मी म्हणत असतांना ते ऐकतच असायचे त्यामुळे -- 'हं हं हं 'झाले हे म्हणण्याची अजिबात सोय नव्हती. नंतर नंतर मला उच्चार व्यवस्थित जमायला लागले असावेत, कारण मग ते एखादे वेळी उठूनही जात. पण त्यामुळे एक झाले असावे, की मला नंतर कोणताही अभ्यास हा काटेकोरपणे करायची सवय लागली असावी, हवे तसे समाधान झाल्याशिवाय चैन पडत नाही, समाधान होत नाही. असे करत करत तीन-चार सुट्यांत माझी संपूर्ण भगवद्गीता तयार झाली. त्यानंतरही मग इतर स्तोत्रे, सूक्ते, सप्तशती वगैरे पण केले पण भगवद्गीतेची आठवण मनांत कायम कोरली गेली.
त्यावेळी शालेय जीवनांत मी न समजता पाठ केलेल्या भगवद्गीतेतील सौंदर्य पुढे अनुभवाने, वाचनाने, अभ्यासाने नित्यनवे समजू लागले, अजूनही समजतच आहे. मध्यंतरी महाविद्यालयीन जीवनांत एका वादविवाद स्पर्धेत बोलताबोलता चमकदारपणे बोलायचे म्हणून बोलून गेलो - भारतीय युद्धात काय होईल याचे भविष्य धृतराष्ट्राला त्याच्या प्रश्नावर संजयाने आपल्याला महर्षी व्यासांनी दिलेल्या दिव्यदृष्टीने अगोदरच सांगीतले होते. भगवद्गीतेतील फक्त दोनच श्लोक पहा - एक म्हणजे पहिला आणि शेवटचा !
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय।।1.1।। ----------- हा पहिल्या अध्यायातील धृतराष्ट्राने संजयाला विचारलेला पहिला श्लोक !
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।18.78।। ------आणि हा अठराव्या म्हणजे शेवटच्या अध्यायातील संजयच्या उत्तराचा शेवटचा श्लोक !
चमकदार वाक्य बोलले (ते कोणाच्याही बुद्धीने असो, येथे माझ्याच बुद्धीचे होते) की टाळ्यांचा कडकडाट होतो, ही सवय त्यावेळेपासूनचीच !

१० डिसेंबर २०१६

No comments:

Post a Comment