Saturday, June 3, 2017

बालक दिन

बालक दिन

प्रत्येकाचे आवडते आणि नावडते असे काही असतेच. काहीच आवडत नाही अथवा सर्वकाही आवडते असे अपवादानेच शक्य असते. काहींच्या द्वेशाच्या यादीत संघ, संघविचारांची माणसे व संघटना तसेच हिंदुत्ववादी विचाराची माणसे व संघटना असतात; तर हे सर्व काहींच्या आवडीच्या यादीत असतात. काहींच्या दृष्टीने कॉंग्रेस, समाजवादी, साम्यवादी मंडळी ही आवडती असतात तर नेमकी हीच सर्व काहींच्या दृष्टीने तिरस्करणीय असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती !
हे सर्व आज आठवण्याचे कारण म्हणजे, आज पं. नेहरूंचा जन्मदिन ! पं. नेहरूंचे परमभक्त ते त्यांचेमुळे देशाची वाताहत झाली, या एवढ्या मोठ्या व्यापक परिघात ही जनता आहे. पं. नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते, त्यांनी देशासाठी नक्कीच काहीतरी केले आहे, हे मान्य करावेच लागते. त्यांनीच सर्वकाही केले व त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनच बाकीचे पुढे जात आहे हे जितके पूर्णांशाने सत्य नाही तीच स्थिती त्यांनी विविध समस्या निर्माण करण्याव्यतिरिक्त काहीही केले नाही, हे पण सत्य नाही.
याबाबतीत एक दृष्टांत सुचतोय - आमच्या गांवात दासनवमीचा उत्सव होतो. त्यावेळी समर्थ रामदासांच्या दासबोध या ग्रंथाचे पारायण करायचे असते. माघ वद्य प्रतिपदेपासून समर्थांचा दासबोध वाचण्यास सुरूवात होते. दर्शनाला येणारा प्रत्येक जण जसे शक्य असेल तसे वाचन करतो. काही एक पान वाचतात, तर काही फक्त काही ओव्याच वाचतात. दासनवमीला हा ग्रंथराज दासबोध वाचून पूर्ण होतो. आता या वेळी जर कोणी प्रश्न विचारला की या ग्रंथराज दासबोधाचे पारायण कोणी केले तर त्याला कोण, काय उत्तर देईल ? कोणालाच कोणा एकाचे नांव सांगता येणार नाही, मात्र त्याचवेळी हे भलेमोठे काम तर पार पाडलेले असेल, हे नाकारता येणार नाही.

१४ नोव्हेंबर २०१६

No comments:

Post a Comment