Saturday, June 3, 2017

तपश्चर्या

तपश्चर्या

आज सकाळी एका गायिकेच्या आवाजात अलीकडील सिनेमातील गाणे ऐकले ! थोडे वाईट वाटले, 'नाकांत गात होती ! आपला आवाज हा कोमल असावा असे वाटणे ठीक आहे पण तो नाकांतून नसावा, अनुनासिक नसावा कारण हा संगीतशास्त्राप्रमाणे गायकाचा दोष मानला जातो. गायकाचा आवाज हा स्वच्छ, मोकळा आणि नैसर्गिक असावा, त्याने आवाजाला कोमल कृत्रिमपणा देवू नये किंवा कृत्रिम कोमलपणा देवू नये. आवाजाची साधना हे अवघड काम असते त्याला निसर्गदत्त प्रज्ञेसोबत निरंतर तपश्चर्येची साथ लागते तेंव्हा ती दगा देत नाही !
बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे साधरणतः १९८८ मध्ये मी 'विदुषी गंगुबाई हंगल' यांचा 'दुर्गा' राग मुंबईला ऐकला होता. दुर्गा, भूप, सारंग, बागेश्री, देस, खमाज, काफी, भीमपलास वगैरे राग प्राथमिक अभ्यासक्रमांत असतांत. वाटले 'दुर्गा' रागांत काय गातील ? पण त्यांनी गायलेले अजूनही कानांत आहे. आपल्याला माहित आहे, त्यांचा आवाजाचा पोट कसा होता मात्र त्या आवाजाच्या दर्जाबद्दल शंका त्यांच्या त्या वयातही घेत येत नव्हती !
हे आठवण्याचे कारण दोन-तीन दिवसांपासून लता मंगेशकर आणि सचिन तेंडूलकर यांच्या संबंधाने चर्चा सुरु आहे. त्याबद्दल अद्याप त्यांची काहीच प्रतिक्रिया नाही, साहजिकच आहे ! ते ज्या उंचीवर आहेत तेथून त्यांना कोणी दिसते आहे की नाही कोणास ठावूक ? प्रत्येकाच्या आवाजाची प्रत वेगळी असते, सर्वच लता मंगेशकर होणार नाहीत आणि ते अपेक्षीतही नाही. काही आशा भोसले असतील, काही गीता दत्त असतील, काही सुमन कल्याणपूर असतील तर काही वाणी जयराम असतील ! काही शमशाद बेगम असतील तर काही सुरैय्या असतील ! प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे पण दर्जाबद्दल बोलत येणार नाही. आपले नाणे खणखणीत असले तर त्याचा आवाज दूरपर्यंत जातो आणि मग आवाज शोधतशोधत लोक येतात.
जगातील सर्वकालीन क्रिकेटचा संघ बनवायचा असेल तर तुमची इच्छा असो व नसो, डावाचा प्रारंभ सुनील गावस्कर करणार आणि चौथ्या क्रमांकावर सचिन तेंडूलकर येणार, हे नक्की आहे ! त्यांच्या तपश्चर्येचे ते फळ आहे !
आता लता मंगेशकर यांचा आवाज ऐका आणि अलीकडील कुणाचाही ऐका !

१ जून २०१६

No comments:

Post a Comment