Saturday, June 3, 2017

आठवण संगीताची

आठवण संगीताची

आज सकाळी औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर 'नाट्यसंगीत' लागलेले होते. दर रविवारी सकाळी प्रादेशिक बातम्या' झाल्यानंतर एक-दोन छोट्या कार्यक्रमानंतर असते. कार्यक्रमातील गाणी छानच होती.
या निमित्ताने एक जुनी आठवण झाली. जळगांवला बऱ्याच वर्षांपूर्वी 'युवक महोत्सव' हा पुणे विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा होता. त्यातील 'शास्त्रीय व सुगम संगीत' या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण करून ते 'जळगांव आकाशवाणी' केंद्राने प्रसारीत केले होते. अतिशय छान होता कार्यक्रम ! त्यातील त्यावेळचे असलेले नवोदीत कदाचित आजचे प्रतिथयश झाले असतील. त्यांच्या कार्यक्रमांचे पुन:प्रसारण केले तर त्यामुळे केवळ आठवणीच जाग्या होणार नाही तर हे नवीन पिढीस मार्गदर्शक ठरू शकते. हे जुने ध्वनीमुद्रण आकाशवाणीजवळ बहुतेक असेलच !
तसेच एक दुसरी आठवण - दूरदर्शनची ! दूरदर्शनवर त्यावेळी रात्री विश्वविख्यात तबलावादक पद्मविभूषण पं. किशन महाराज यांची काही भागांत मुलाखत घेतली होती. माझेकडे दूरदर्शन संच नव्हता. मला आठवण द्यायचे व आवर्जून ऐकायला निमंत्रण द्यायचे माझे जिव्हाळ्याचे मित्र आणि संगीताचे रसिक, जाणकार कै. अॅड. प्रकाश चावरे हे ! मी रात्री जायचो कार्यक्रम ऐकायचो आणि मग निवांत चर्चा व्हायची !
दोन दिवसांपूर्वीच पं. किशन महाराजांच्या तबलावादनाच्या कार्यक्रमाचा आनंद जुने ध्वनिमुद्रण ऐकून व पाहून घेतला. अशा नामवंत कलाकारांच्या कार्यक्रमांचा साठा हा आकाशवाणी व दूरदर्शन यांच्याकडे आहे. तो त्यांनी नियमितपणे श्रोत्यांना व प्रेक्षकांना सादर करावा. खूप उपयोग होईल, विविधप्रकारे !

२ नोव्हेंबर २०१६

No comments:

Post a Comment