Friday, June 2, 2017

संक्रातीचे हळदी-कुंकू

संक्रातीचे हळदी-कुंकू

आता नुकतीच मकर संक्रांत झाली,सध्या महिलावर्गांचा हळदीकुंकू कार्यक्रम जोरात आहे. तो रथसप्तमी पर्यंत असतो. या निमित्ताने संध्याकाळी बऱ्यापैकी सजूनधजून महिला हळदीकुंकू जेथे असेल तेथे जातात. तेथे वेगवेगळ्या वस्तु या निमित्ताने वाटतात; त्या लुटल्या जातात असे म्हटले जाते. महिलांना संक्रांतीचे वाण दिले जाते, ओटी दिली जाते, तिळगूळ दिला जातो. ही सर्व महिलामंडळी आता जमल्यानंतर होणारा गलका याची आपण कल्पना करू शकतात किंवा अनुभव घेवू शकतात.
आपण त्यावेळी थोडे लक्ष दिले तर जाणवेल की कोणताही आगापिछा कोणाला मिळणार नाही असे होत असलेले संभाषण, पण त्यातही योग्य धागा त्यांना दिसते व तोच पकडून तितकेच समर्पक उत्तर दिले जाते; की त्यामुळे सगळ्या धागांचा गुंता होवून तो सोडवणे अशक्य होवून बसते. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' ही म्हण अनुभवायची असेल तर हा प्रसंग (दुरून) पहावा. दुरून डोंगर साजरे ! अगदी प्रत्येकाचे स्वतंत्र विचार व्यक्त होतात ! असो, प्रत्येकालाच व्यक्तीस्वातंत्र्य आहे.
आज विषय तो नाही. लहानपणच्या काही घटना आठवतात. बहुतांशपणे या हळदीकुंकवाला बोलावले जायचे ते ओळखीच्या सर्वांना, गरीबश्रीमंत, जातपात हा भेद अपवादानेच असायचा. इतकेच नाही तर पूर्वीचे असलेले मनातील किल्मीषही दूर करून या कार्यक्रमाला बोलावले तर जावेच लागे. हळदीकुंकू कोणाकडे आहे आणि तिने न बोलावणे हा अपमान करण्याचा गंभीर प्रकार समजला जाई; अजूनही समजला जात असावा ! अलिकडील मानापानाच्या कल्पना बदलल्या असल्या तरी ! मात्र तसे अपवादानेच होई कारण हेतू हाच - 'तिळगूळ घ्या, गोडगोड बोला' ! वर्षातील सर्व कटू स्मृती, भांडणतंटे दूर सारून नवीन गोड जगण्यास आनंदाने सज्ज व्हावे.
आमच्या गावी हळदीकुंकववाचे निमंत्रण देणाऱ्या एक काकू होत्या, त्या कोणत्या समाजातील होत्या हे महत्वाचे नाही; पण आजच्या काळात म्हणायचे तर 'भेदाभेद अमंगळ' ही उक्ती त्याचवेळी आमच्या गावाने अंमलात आणलेली होती. त्यांच्याजवळ निमंत्रणाची यादी नेहमी तयार असायची असे म्हटले जायचे. प्रत्येकीकडे त्या हळदीकुंकवाचे निमंत्रण मिळाल्याची सही घ्यायच्या. लहानपणी मला या त्यांच्या दक्षतेचे फारच आश्चर्य वाटायचे. एकदा मी त्यांच्या मागोमाग गेलो आणि मला त्यांच्या दक्षतेचं रहस्य समजलं. त्या प्रत्येकाच्या घरी जात आणि निमंत्रण देत, एवढंच नाही तर त्यांना वाटले की यंदा हे नवीन घर आले आहे गावात, त्यांनाही निमंत्रण द्यायला पाहीजे तर त्या त्यांनाही देत. इतकेच नाही तर जरा 'चौकस' बाईंना त्या काकू 'अजून कोणाला सांगावे लागेल का?' हे पण विचारायच्या ! आता त्या अशा पद्धतीने प्रत्येक घरी जात असल्याने त्यांची यादी आपोआपच तयार व्हायची. त्यामुळे आपोआपच त्या हळदीकुंकू करणारीचा हा कार्यक्रम चांगला भक्कम व्हायचा आणि पुढच्या वर्षीच्या निमंत्रण देण्याचा करार त्या काकूंशी व्हायचा.
सांगीतल्यापेक्षा जास्त अशा कितीही महिला हळदीकुंकवाला आल्या तरी वावगे वाटत नसे वा काही अंदाज चुकला अशी भावना नसे. त्यावेळी वाटले जाणारे वाण म्हणजे - तीळ, गूळ, भाजी, ज्वारी, ऊस वगैरे यांची बहुतेक जण शेतकरी असल्याने या मालाची तशी कमतरता नसायची. शक्यतोवर त्यावर्षी उपलब्ध असलेल्या वस्तुच वाण म्हणून वाटल्या जायच्या. काही सुधारक, नवीन विचारांची मंडळीपण होती मग त्यांच्याकडे पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र, आगपेटी, कंगवा, छोटा आरसा, कुंकवाची डबी अशा वस्तु असत ! पण बऱ्याचवेळा मग या काकूंच्या कामगिरीमुळे वस्तु कमी पडत तरी ती गृहीणीपद सांभाळणारी डगमगत नसे तर उपलब्ध असेल त्या दुसऱ्या वस्तू वाटणे सुरू करी ! सर्वांना एकच वस्तू नाही, त्यातही कोणाला काही फारसे वावगे वाटत नसे तर एकप्रकारचा आनंद असे किंबहुना त्या गृहीणीपद सांभाळणारीस थोडी मोठेपणाची पण भावना असे.
आता इकडे शहरी वातावरणात हळदीकुंकवाचे कार्यक्रम कसे होतात याची फार कल्पना माझेपर्यंत येत नाही. मात्र घरच्या कार्याप्रमाणे कोणांसही हळदीकुंकवाचे आमंत्रण देणारी ती काकू आता दिसत नाही, दिसणार नाही. माणसं बदलली, माझं गाव बदललं आणि माझं लहानपण व त्यातला आनंद पण कमी झाला.

१९ जानेवारी २०१७

No comments:

Post a Comment