Friday, June 2, 2017

माझा आवडता - यमन

माझा आवडता - यमन

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांची संगीत शिकण्याची सुरुवात होते ती 'राग भूप किंवा भूपाली' अथवा 'राग यमन' या रागाने ! माझ्या अतिशय आवडता राग ! हे मी बऱ्याच रागांबद्दलही म्हणतो, अहो 'हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत' आणि त्यातील हे विविध राग म्हणजे श्रवणभक्ती करत रहा, करत रहा; पण आपली तृप्ती होणे कठीणच - 'अनंतहस्ते कमलावराने, घेता किती घेशील दो कराने' ! आपण घेत राहिलो, घेत राहिलो तरी ज्ञानाचा समुद्र समोर भरलेलाच उभा असतो आणि त्यातील थेंबही आपल्याला मिळालेला नाही असेच आपल्याला वाटते.
'सा रे ग प ध सा - सा ध प ग रे सा' या आरोह-अवरोहाने उभा मनांत उभा रहाणारा हा 'कल्याण थाटातील' ओढव जातीचा राग, 'प ग ध प ग रे ग' ही सर्वमान्य पकड म्हटल्यावर मनांतच ठाण मांडून बसतो, अगदी हलतच नाही. यात 'म' आणि 'नी' हे वर्ज्य स्वर आहेत. 'ग' हा वादी आणि 'ध' हा संवादी स्वर आहे. आता गेल्या तासभरापेक्षा जास्तच वेळ 'भूप राग' मी ऐकत आहे. कोणाकोणाचा ऐकला म्हणून सांगू - पं. डी. व्ही. पलुस्कर यांनी गायलेला 'जब ही सब नी' हा प्रसिद्ध ख्याल, डॉ. वसंतराव देशपांडे यांचा 'हे गुणवन' हा ख्याल, पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा 'सई मोरे लाल' हा ख्याल ! पं. कुमार गंधर्व याच्या आपल्या खास ठेवणीने नटलेला भूप तसेच विदुषी किशोरी आमोणकर यांच्या २३ जानेवारी १९८४ मधील उत्तरपूर येथील एका मैफिलीचे रेकॉर्डिंग ऐकले - त्यातील 'भूप', पं. महापुरुष मिश्रा होते तबला साथीला ! आणि बस, थांबलो, राग साक्षात उभा होता, अगदी आपण बोललो तर तो बोलेल आपल्याशी असे वाटत होते; पण बोलायचे भान कोणाला होते ? विदुषी किशोरी आमोणकर यांचा भूप राग ऐकावा, या पेक्षा जास्त काय सांगू ?
हिंदी-मराठी चित्रपटांत आणि इतरत्रही विविध गीतात याचा सढळ हस्ते उपयोग केलेला आहे. आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांना मानले जाते ते ग. दि. माडगूळकर यांच्या गीतरामायणातील पहीलेच गीत ! 'स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती' हे सुधीर फडके यांनी आपल्या स्वर्गीय आवाजाने अजरामर केलेले गीत ! 'आम्ही जातो आमच्या गावा' या चित्रपटातील 'जगदीश खेबूडकर' यांचे 'देहाची तिजोरी' हे नितांत सुंदर गीत ! शाहीर होनाजी बाळा यांची 'घनश्याम सुंदरा' ही वसंत देसाई यांच्या संगीताने आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाने अमर झालेली ही 'अमर भूपाळी' !
'आराधना' या इतिहास निर्माण केलेल्या हिंदी चित्रपटातील 'चंदा है तू मेरा सुरज है तू' हे सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले आनंद बक्षी यांची लता मंगेशकर यांनी गायलेले गीत, 'सेहरा' या चित्रपटही 'रामलाल' या संगीतकाराने सजवलेले 'पंख होती तो उड जाती रे' हे लता मंगेशकर यांनी गायलेले गीत ! 'तलत मेहमूद' यांच्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण हृदयकंपीत आवाजातील 'जिंदगी देनेवाले सून' हे 'शकील बदायुनी' यांचे गीत आणि 'गुलाम महंमद' या काहीश्या दुर्दैवी मात्र अप्रतिम संगीताने सजविणाऱ्या संगीतकाराचे संगीत !
हे लिहीण्यासाठी मला राहवले नाही ते - पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया या जोडीने 'शिव-हरी' या नावाने दिलेल्या 'सिलसिला' या चित्रपटातील गीत पाहिल्यावर ! 'देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए' या जावेद अख्तर यांच्या गीताला बोलते केलेल्या 'किशोर कुमार आणि लता मंगेशकर' यांच्या गीताने ! अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीच्या आणि त्यांच्या कामाबद्दल मी काही सांगावे असे नाही. आपण ते प्रत्यक्ष पहाच ---

https://www.youtube.com/watch?v=HpoU-s8zVc8

७ जानेवारी २०१७

No comments:

Post a Comment