Saturday, June 3, 2017

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे ---

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे ---

माझ्या मुलीची मैत्रीण गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आजाराने आजारी आहे, तिचे आईवडील डॉक्टर आहेत. त्यांची मुलगी असल्याने ते तिची काळजी घेत आहेतच. आपल्या मदतीची काही आवश्यकता आहे असे अजिबात नाही. मात्र माझ्यासारख्याला उगीचच वाटते की आपण काही करावे का, करू शकतो का ? शेवटी परमेश्वराला प्रार्थना ----- 'देवा, तुला मी काही सांगावे असे काही नाही. तुला सर्वच दिसते आणि समजते. तुला मी प्रार्थना करून सांगावे याचीही गरज नाही. हे मी फक्त एवढ्यासाठीच बोलतो, की जर काही माझे थोडेफार पुण्य साठलेले असेल आणि ते मला माझ्या या जन्मातील आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर, माझ्या पुण्यातील थोडा भाग काढून घे, तिला दे आणि तिला वाचव, तिला जीवनदान दे ! तू देव असल्याने, माझ्याजवळचे मी काही देऊ केल्याशिवाय तू घेणार नाही, याची खात्री आहे म्हणून हे मागणे !' देवाने तिला तिचे निरोगी आयुष्य भरभरून द्यावे, हीच इच्छा असल्याने !
हे येथे लिहिण्याचे कारण, यामुळे जुने प्रसंग आठवले - काही वर्षांपूर्वी माझ्यावर खूप विविध प्रकारची संकटे आलेली होती, या संकट निर्मितीच्या कर्तृत्वांत माझ्यापेक्षा इतरांचाच संबंध होता. या संकटांचा संबंध काही ज्योतिषी मला असलेल्या 'साडेसातीशी' जोडायचे ! माझा जोतिष्यावरील विश्वासापेक्षा आपल्या कार्यावर विश्वास आहे, 'तुम्ही काम करत रहा, फळाची अपेक्षाही करू नका, तुम्हाला फळ मिळणारच', ही माझी श्रद्धा ! मग मी बोलून जायचो की 'मला तर कायमच 'साडेसाती' असल्यासारखे वाटते, त्याला फार काही अर्थ नाही. ' माझा बालमित्र, डॉक्टरआठवले तर नेहमी म्हणायचा - 'तू तुझे काही सांगू नको. तुझे ऐकून इतरांना 'हार्ट अटॅक' यायचा !' मात्र येथे हे महत्वाचे नाही.
आज जशी माझी या माझ्या मुलीच्या मैत्रिणीबाबत भावना झाली, तशीच भावना त्यावेळी माझ्या पत्नीच्या आईची आणि तिच्या आजोबांची (तिच्या आईच्या वडिलांची) झाली असावी. तिचे आजोबा हे व्यवसायाने 'डॉक्टर', काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते आणि स्वातंत्र्याच्या कामांत सर्वार्थाने सहभागी झालेले ! अतिशय 'गणपतीभक्त' ! अगदी 'अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता', गणपतीचेच नामस्मरण ! त्यांना ही माझी अवस्था पहाविली नसावी, त्यांनी त्यांच्या मुलीसमोर आणि नातीसमोर (माझ्या पत्नीसमोर) प्रस्ताव ठेवला - 'मी, माझ्या गणपतीच्या आजपर्यंतच्या पूजेचे, तपस्येचे सर्व पुण्य 'नातजावयाला' देतो.' मी बोलून गेलो, 'जाऊ द्या, काही अर्थ नाही. माझी संकटे मलाच दूर करायला हवी.' माझ्या पत्नीला वाईट वाटले,'तुम्ही नकार देऊ नका, त्यांची भावना आहे ना आणि आपण काही मागितले का ?' असे म्हणाली. मी तयार झालो. मला पुण्य दिले काय आणि नाही दिले काय, काय फरक पडणार होता ? मांदारच्या झाडाखाली माझ्या पत्नीच्या आईने आणि आजोबांनी काही मंत्र उच्च्चारुन त्यांनी आपले 'गणपतीच्या तपस्येचे पुण्य' मला दिले आणि माझ्यावरील संकटे दूर करण्याची 'गणपतीला' प्रार्थना केली. माझ्यावरील संकटे ही हळूहळू कमी होत गेली, संपली असे कधीच होत नाही कारण 'जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे ' हे समर्थ रामदासांचे वचन सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. मात्र मला नेहमीच जनता जनार्दनाचा पाठींबा असतो आणि ते परमेश्वर जाणवूनही देतो - कारण 'ज्यांनी मदत करायची ते संकटे निर्माण करतात, नुकसान करतात आणि ज्यांचा काही संबंध नसतो, त्यांनी मदत करावी ही अपेक्षाही करता येत नाही, ते मात्र मदत करतात', याचा अर्थ मी नेहमीच आमच्या तुकाराम महाराजांनी लावलेलाचा लावतो - 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरूनिया' !
हे पुण्य मला दिल्याने त्यांचे पुण्य कमी झाले का वाढले हा मला नेहमीच पडणारा प्रश्न आहे त्याचे उत्तर अद्यापही मिळाले नाही, पण माझी नेहमीच अशी भावना आहे की - हे पुण्य मला देऊन त्यांनी अजूनच जास्त पुण्य मिळवले असावे, आणि मग तसे असेल तर ते नेहमीच आपण का मिळवू नये ? कविवर्य विंदा करंदीकर आम्हाला शाळेतच शिकवून गेले आहे -
देणा-याने देत जावे
घेणा-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावे.

८ ऑक्टोबर २०१६

No comments:

Post a Comment